गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जानेवारी 2021 (17:14 IST)

उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी गुजराती मतदारांची गरज का भासली?

'मुंबई मा जलेबी ने फाफड़ा उद्धध ठाकरे आपडा' ही आहे शिवसेनेची नवी मोहीम. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी या मोहिमेला सुरूवात केली आहे.
 
मराठी माणसासाठी म्हणून उदयास आलेली शिवसेना आता गुजराती मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न करत आहे.
 
2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भारतीय जनता पार्टीसोबत फारकत घेतल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची लढाई आहे.
 
मुंबईत जवळपास 30 लाख गुजराती मतदार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी 50-55 प्रभागांमध्ये गुजराती मतदारांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
 
शिवसेनेला गुजराती मतदारांसाठी अभियान सुरू करण्याची आवश्यकता का भासली? गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करून शिवसेना काय साध्य करू पाहतेय? शिवसेनेच्या या राजकीय खेळीमुळे भाजपच्या मतदारांमध्ये फूट पडेल का? गुजराती मतदारांनी शिवसेनेला साथ दिली नाही तर शिवसेनेच्या हातातून मुंबई जाईल का? अशा सर्व प्रश्नांचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
काय आहे ही मोहीम?
शिवसेना 10 जानेवारीला गुजराती बांधवांसाठी एक खास मेळावा आयोजित करत आहे. 'मुंबई मा जलेबी ने फाफड़ा उद्धव ठाकरे आपडा' या मथळ्याखाली हा मेळावा होणार आहे. शिवसेनेने एक पत्रक जारी करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.
 
या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 'भाजपच्या हातातील सत्ता हटवादी गुजराती नेतृत्त्वामुळे आणि मराठी नेतृत्त्वाला संधी न देण्याच्या संकुचित मनोवृत्तीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिरावून घेतली असल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत.'
 
'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचे न पाहावल्याने भाजपचे नेते अस्वस्थ झाले असून मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा झेंडा खाली खेचण्याच्या वल्गना करत आहेत,'
 
हा मेळावा जोगेश्वरी येथे होणार असून शिवसेनेचे राष्ट्रीय संघटन हेमराज शाह या मेळाव्याचे आयोजन करत आहेत.
 
या मेळाव्यासाठी 100 लोकांना सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी मराठी आणि गुजराती भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. या मेळाव्यात शिवसेनेत जाहीर प्रवेशदेखील पार पडतील असं सांगितलं जात आहे.
 
हेमराज शाह यांनी सांगितले, "गुजराती लोकही शिवसेनेचे समर्थक आहेत. जेव्हापासून बाळासाहेबांनी गुजराती लोकांना वाचवले तेव्हापासून आम्ही बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आहोत. आता सर्व धर्म समभाव आहे. शिवसेना आपले रक्षक आहेत आणि त्यांना मतदान केले पाहिजे असे आवाहन आम्ही करणार आहोत.
शिवसेनेचे गुजराती कार्ड?
1996 पासून मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. 19 जून 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. मराठी लोकांनी या 'संघटना' म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचं सदस्यत्व मिळावं यासाठी धडपड सुरू केली.
 
शिवसेनेने 1967 साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही केला. त्याच्या पुढच्याच वर्षी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेच्या शाखा सर्वत्र दिसू लागल्या.
 
1968 साली मुंबई पालिकेत प्रवेश मिळाला असला तरी सेनेचे पहिले महापौर खुर्चीत बसायला 1971 साल उजाडलं. दादरचे डॉ. हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर झाले.
 
सर्व काही मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी या मूळ हेतूने जन्माला आलेल्या शिवसेनेने 1980 पासून हिंदुत्ववादाची भूमिका जाहीरपणे घ्यायला सुरुवात केली. तेव्हापासून अगदी गेल्या वर्षभरापर्यंत शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी पक्ष आहे हे लोकांच्या मनात बिंबवण्यात सेनेला यश आलं.
 
ज्येष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "शिवसेनेचा सामाजिक पाया घट्ट आहे. चाळी,झोपडपट्टी, वाड्यांमध्ये शिवसेनेचा दांडगा जनसंपर्क आहे. लहान-मोठ्या कामासाठी शिवसेनेला हाक दिली जाते."
 
हिंदुत्ववादी शिवसेनेने 2003 मध्ये मी मुंबईकर अभियान सुरु केले. मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या पलीकडे जाऊन पक्षाचा सामाजिक विस्तार करण्याचा हेतू होता. "शिवसेनेच्या स्थापनेपासून पाहिलं तर पक्षाने कधीही गुजराती, मारवाडी, जैन लोकांच्या मुंबईतील वास्तव्यावरून प्रश्न उपस्थित केले नाहीत. दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय लोकांनी मुंबईत राहण्यावरून शिवसेनेने भूमिका घेतल्या आहेत. पण गुजरात्यांबाबत शिवसेना कायम मवाळ दिसली." असंही धवल कुलकर्णी सांगतात.
 
यामागे एक अर्थकारणसुद्धा आहे. मुंबईत सत्ताधारी असताना व्यापारी वर्गाला दुखावणे शिवसेनेला फारसे परवडणारेही नव्हते.
विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बॅनर लावण्यात आले होते. वरळीत लावण्यात आलेल्या या बॅनरमधून मराठीसोबतच इतर भाषेतील मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला होता. यामध्ये 'केम छो वरळी' असं पोस्टरही लावण्यात आलं होतं.
 
ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्कीन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "शिवसेना पूर्वी संघटना होती. आता त्यांना सर्वसमावेशक धोरण असणारा राजकीय पक्ष असल्याची भूमिका वठवायची आहे. त्यासाठी असे कार्यक्रम होतीलच. सेनेला यातून समस्त मुंबईकरांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करायचाय. सर्व जाती-धर्मियांना, भाषिकांना एकत्र आणण्याची ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे."
 
आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी गुजराती मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेने विशेष मोहीमच हाती घेतली आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेला संघर्ष.
 
भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. तीन पक्षांचे सरकार दोन महिनेसुद्धा टिकणार नाही अशी टीका विरोधकांनी केली. पण शिवसेना नेतृत्त्वाअंतर्गत महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली.
 
आता शिवसेनेचे पुढील लक्ष्य मुंबई महानगरपालिकेतील सत्ता कायम राखण्याचे आहे.
आपल्याकडे काही संशयास्पद संदेश असल्यास आपण करोना हेल्पलाईनवर कॉल करून तिची सत्यता तपासू शकता. त्यानंतरच ते शेअर करा", असं आवाहन त्यांनी केलं.
शिवसेनेसमोर भाजपचे कडवे आव्हान?
2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला 93 जागा, भाजपला 82 जागा, कॉंग्रेसला 31 जागा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 9 जागा मिळाल्या. त्यावेळी शिवसेना आणि भाजप ही निवडणूक वेगवेगळी लढले असले तरी राज्यात असलेल्या युतीमुळे ते निवडणूकीनंतर मुंबई महापालिकेच्या सत्तेत एकत्र आले.
 
शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याने राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपा सरकार स्थापन करु शकला नाही. त्यामुळे आता भाजपाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
 
2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्तीदेखील जाहीर केली आहे.
 
त्यादृष्टीने आता शिवसेनेनेही तयारीला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शिवसेनेकडून 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' मोहीम सुरु करण्यात आली आहे.
 
यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सांगितले, "यापूर्वी बहुतांश गुजराती समाज भाजपसोबत होता. युती असल्यामुळे त्यांची मतंही सेनेला मिळत असत. पण आता शिवसेनेला भाजपचंच कडवं आव्हान असेल. त्यात काँग्रेसची भूमिका एकला चलो रेची असल्याने शिवसेनेला मुंबईतल्या इतरांना सोबत घ्यावंच लागेल."
 
ही पहिली वेळ नाही जेव्हा शिवसेना स्वतंत्र ही निवडणूक लढत आहे. 1984 साली शिवसेनेने भाजपबरोबर युती केली. परंतु भाजप पुलोदमध्ये सहभागी झाल्यानंतर ही युती तुटली. तेव्हा कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या अशी प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती.
1989 साली भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा युती झाली ती 25 वर्षे टिकली. 2014 साली भाजप आणि शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या. त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले. 2019 साली शिवसेना आणि भाजप यांची युती निवडणुकीनंतर तुटली.
 
1995 साली शिवसेना आणि भाजपा युतीची पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्ता आली. शिवसेनेचे मनोहर जोशी या पक्षाचे आणि या युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी यांच्यानंतर अल्पकाळासाठी नारायण राणे मुख्यमंत्री झाले.
 
2014 साली भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस या युतीचे तिसरे मुख्यमंत्री झाले. मात्र 2019 साली शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले.
 
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "कुठलाही समाज एकगठ्ठा एकाच पक्षाला मतदान करत नाहीत हे स्पष्ट आहे. गुजराती मतदार उमेदवाराच्या कामावर समाधानी असेल तर ते त्याला मतदान करू शकतील. यासाठी शिवसेनेचा हा प्रयत्न आहे. मोदी-शहांमुळे गुजराती मतदार भाजपकडे अधिक झुकलेला आहे. हे खरे आहे पण पूर्वीपासून गुजराती वर्ग शिवसेनेलाही मतदान करत आलेला आहे."
 
ते पुढे सांगतात, "मुंबईत दंगली झाल्या होत्या तेव्हा गुजराती व्यापारी वर्गाचे संरक्षण शिवसेनेने केले होते. त्यावेळीही गुजराती समाजाची सहानुभूती मिळवण्यात शिवसेनेला यश आले होते. त्यामुळे शिवसेना हा पर्याय आहे आणि हा पक्ष आपल्या विरोधात नसून आपले संरक्षण करू शकतो याची कल्पना गुजराती मतदारांनाही आहे. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि भाजपशी युती तुटल्याने त्याचा प्रचार अधिक तीव्रपणे केला जात आहे असे म्हणता येईल,"
 
शिवाय, शिवसेना राज्यात आणि मुंबई महानगरपालिकेत सत्तेत आहे. गुजराती मतदारांमध्ये सर्वाधिक वर्ग हा व्यापार क्षेत्रातील आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग आणि शिवसेनेचे नाते जुने आहे.
मुंबईतला मराठी टक्का घसरला
मुंबईत सत्ता कायम राखायची असेल तर केवळ मराठी मतदारांचा विचार करून चालणार नाही हे उद्धव ठाकरे यांनी फार पूर्वीच ओळखले होते.
 
2003 मध्ये शिवसेनेने 'मी मुंबईकर' या मोहिमेला सुरुवात केली होती. मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसासह इतर भाषा आणि धर्माच्या लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता.
 
संदीप प्रधान सांगतात, "मुंबई महानगर असल्याने देशभरातील लोक याठिकाणी आले आणि कालांतराने त्यांचे वास्तव्य मुंबईत झाले. हे वास्तव शिवसेनेने स्वीकारले आहे. शिवाय, मराठी माणसाचा टक्का मुंबईत कमी होत चालला आहे. हे सुद्धा शिवसेनेच्या लक्षात आले आहे."
 
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अनेक मतदारसंघात गुजराती, हिंदी, तमिळ भाषेत प्रचार केला होता. दक्षिण भारतीयांना मुंबई बाहेर जा असं एकेकाळी म्हणणारी शिवसेना विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघात पुंगी वाजवत प्रचार करताना दिसली.
 
हेमंत देसाई सांगतात, "शिवसेनेची यापूर्वीची भूमिका महाराष्ट्रवादी होती. मराठीचा पुरस्कार त्यांनी प्रबोधनकारांच्या काळापासून केला होता. मात्र, आता बदलत्या काळानुसार मुंबईतला मराठी टक्का कमी होतोय. त्यामुळे इतर भाषिकांना सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. "
काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने
"कॉंग्रेस मुंबई महापालिकेसाठी 227 जागांची तयारी करतेय. याआधीही आम्ही आघाडीत होतो पण जिथे शक्य नव्हतं, तिथे वेगवेगळे लढलो आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही 227 जागांची तयारी करतोय," अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी बीबीसीशी बोलताना दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गणितं वेगळी असतात असंही ते म्हणाले.
 
महाविकास आघाडी राज्यात सत्तेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार असा प्रश्न होता. पण मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे भाई जगताप यांनी स्पष्ट केले.
 
त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपप्रमाणेच काँग्रेसचेही आव्हान असणार आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, "मुंबईमधला जो श्रमिक वर्ग आहे तो शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये विभागला गेलाय. त्यामुळे दोघांचा मतदार काही विभागात सारखा आहे. पण अर्थात शिवसेनेचं पारडं जड आहे. पण मुंबईतले उत्तर भारतीय हा कॉंग्रेसचा मतदार आहे. मागच्यावेळी कॉंग्रेसचा हा उत्तर भारतीय मतदार भाजपकडे गेला. त्याचा फटका कॉंग्रेसला बसला. जर कॉंग्रेसने आतापासूनच महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची तयारी दाखवली तर हा उत्तर भारतीय मतदार आतापासूनच भाजपच्या बाजूने जाऊ शकतो. यासाठी कॉंग्रेसने 227 जागांवर तयारी करत असल्याचं जाहीर केलय."
 
मुंबईतला उत्तर भारतीय मतदार हा काँग्रेसची वोट बँक आहे. त्यामुळे गुजराती मतदारांप्रमाणेच शिवसेना उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार करणार का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
 
शिवसेनेनं सुरुवातीच्या काळात काँग्रेसशी अनेक निवडणुकांत मैत्री ठेवली होती. 1980 साली काँग्रेसला मदत केल्याबद्दल शिवसेनेला विधान परिषदेवर दोन जागा देण्यात आल्या.