मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (16:11 IST)

साईसच्चरित - अध्याय ५२

sai satcharitra chapter 52
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
आतां करूं सिंहावलोकन । तदनंतर ग्रंथ संपूर्ण । करूं अवतरणिका देऊन । सारांश निवेदन ग्रंथाचा ॥१॥
देहीं असतां निजभक्तांला । वेळोवेळीं जो अनुभव दिधला । त्याचा ग्रंथ ही “साईलीला” । ग्रंथ लिहविला स्मरणार्थ ॥२॥
“साईलीला” परम पवित्र । त्यांतील सच्चरितकथासत्र । वाचा हें निजगुरुचरित्र । इहपरत्रप्रबोधक ॥३॥
संग्रहीं ज्या ते असंख्यात । परी व्युत्पत्तिविद्यारहित । करीं धरूनि हेमाडपंत । हें निज सच्चरित लिहविलें ॥४॥
कांहीं आपण आपुली ख्याती । स्वमुखें शिष्यां श्रवण करविती । तेही गेलिया निजधामाप्रती । या ग्रंथा स्फूर्ती तैंपासून ॥५॥
परोपरीच्या वार्ता गहन । साई जेव्हां करीत कथन । श्रोते होत अत्यंत तल्लीन । भूक तहान विसरत ॥६॥
जिंहीं पाहिलें साईस्वरूप । हरले तयांचे त्रिविध ताप । ऐसा ज्यांचा तेज:प्रताप । साद्यंत केवीं वर्णावा ॥७॥
ऐसा साई उदारकीर्ति । जे जे लागले त्याच्या भक्तीं । तयांचिया उद्धाराप्रति । ठेविली निजख्याती लिहून ॥८॥
गोदावरीचें पवित्र स्नान । पुढें घेवोनियां समाधिदर्शन । करावें हें सच्चरित श्रवण । त्रिताप शमन होतील ॥९॥
सहज बोलतां जयाच्या गोष्टी । नकळत पडे परमार्थमिठी । प्रेमें घाला या ग्रंथीं दिठी । पापांच्या कोटी निरसतील ॥१०॥
जन्ममरण - यातायाती । चुकवाव्या जे मनें इच्छिती । तिंहीं अखंड स्मरणभक्ति । गुरुपदासक्ति जोडावी ॥११॥
प्रमाद मिथ्या ज्ञानाचें कारण । आत्मरूपीं अनवधारण । जेथूनि उद्भवे जनन - मरण । सर्वानर्थ - निदान जें ॥१२॥
मोह म्हणजे मिथ्या ज्ञान । अनात्मठायीं आत्माभिमान । तोच मृत्यु विद्वज्जन । लक्षण करितात ॥१३॥
साई - कथासागरमंथन । करितां साईकथाकथन । गोडी जिची नित्य नूतन । श्रोत्यांचें अध:पतन चुकेल ॥१४॥
साईचें गुणमय स्थाळखरूप । त्याचें करितां ध्यान अमूप । प्रकटेल सूक्ष्मतम आत्मस्वरूप । होऊनि लोप सगुणाचा ॥१५॥
न होतां सगुणरूपीं प्रवेश । कळेना आत्म ज्योतीश । परब्रम्हा जें निर्विशेष । दुर्बोध नि:शेष जाणावया ॥१६॥
जेणें दावूनि आपुलीं पाउलें । प्रेमें निजभक्त भाविक बळें । देहींच असतां विदेही केलें । परमार्था लाविलें अकळपणें ॥१७॥
सागरासी देतां आलिंगन । सरिता विसरते सरितापण । तैसा भक्ता येतां शरण । नुरविसी दुजेपण भक्ताचें ॥१८॥
दोनी दीप एक होती । एकमेकां आलिंगन देती । तात्काळ हारपे द्वैतस्थिति । एकचि दीप्ति एकत्वें ॥१९॥
कर्पूर सोडूनि त्याची द्दति । सूर्या सोडूनि त्याची दीप्ति । कनका सोडूनि त्याची कांति । राहील कां निश्चिती वेगळी ॥२०॥
जैसी सागरीं रिघे सरिता । सागरचि होऊनि ठाके तत्त्वतां । अथवा लवण सागरीं रिघतां । सागरीं समरसता तत्काळ ॥२१॥
तेणेंपरी येतां साईपदीं शरण । भक्तांमाजी नुरे दुजेपण । भक्त होती समसमान । त्यागूनि मीपण आपुलें ॥२२॥
जागृति स्वप्न अथवा सुषप्ति । तिहींमाजील कवण्याही स्थितीं । जाहलिया साईमय वृत्ति । संसारनिवृत्ति काय दुजी ॥२३॥
असो आतां येऊनि लोटांगणासी । हेंचि मागतों पायांपाशीं । तुजवीण अन्यत्र या वांछेसी । जाऊं न देसी एकसरीं ॥२४॥
ब्रम्हादिस्तंबपर्यंत । घटमठीं सबाह्य आकाशवत । परिपूर्ण जो सर्व भूतांत । विषमता यक्तिंचित जो नेणे ॥२५॥
सकळ भक्त ज्या समसमान । जो नेणे मानावमान । प्रियाप्रिय नेणे जयाचें मन । जया न विषमपण तिळभर ॥२६॥
शरण रिघूं त्या साईसमर्था । जो निजस्मरणें दे सर्वार्था । त्याच्या चरणीं अखंड माथा । ठेवूनि कृतार्था होऊं कीं ॥२७॥
आतां श्रोते सज्जन भक्तप्रवर । सर्वां माझा नमस्कार । तुम्ही थोर मित्राचार । विनवितों साचार तें परिसा ॥२८॥
मासोमासीं काढूनि अवसर । कथा परिसल्या ज्या हा काळवर । त्या जयाच्या, तयाचा विसर । नेदा क्षणभर पडावया ॥२९॥
आपण जों जों सप्रेम चित्ता । परिसतां या साईच्या कथा । तों तों मी जो येथील वक्त । तया उल्हासता दे साई ॥३०॥
तैसें जैं श्रोते न दत्तावधान । वक्ता न केव्हांही सुप्रसन्न । परस्परांच्या प्रसन्नतेवीण । वाउगा शीण श्रवणाचा ॥३१॥
परम दुस्तर भवसागर । उसळती मोहाच्या लाटा अनिवार । आदळती अविचार - तटावर । पाडिती तरुवर धैर्याचे ॥३२॥
वाजतो अहंकाराचा वारा । तेणें हा डहुळे सागर सारा । क्रोधद्वेषादि महामगरां । मिळे जैं थारा निर्भयपणें ॥३३॥
‘मी माझें’ हा मगर । वासना विकल्प भंवरे अपार । निंदा - असूयादि जेथें तिरस्कार । असंख्य जलचर तळपती ॥३४॥
ऐसा जरी हा सागर भयंकर । अगस्तिरूपें प्राशी गुरुवर । तयांचे जे चरणरजकिंकर । तयां न लवमात्र भय त्यांचें ॥३५॥
म्हणोनि साई समर्थ सद्नुरु । होऊनियां भवाब्धीचें तारूं । आम्ही जे केवळ कासधरू । त्यां सर्वांस उतरू पैलपार ॥३६॥
महादुस्तर हा भवार्णव । करा साई चरणांची नाव । दावील निर्भय पैल ठाव । पहा नवलाव निष्ठेचा ॥३७॥
पाळितां या ऐशा व्रता । भासे न संसारदु:ख - तीव्रता । लाभ न अन्य येणेंपरता । सेव्य समर्थता ती हीच ॥३८॥
साईचरणीं अत्यंत भक्ती । नयनीं कोंदो साईमूर्ती । साईच दिसो सर्वांभूतीं । ऐसी ही स्थिती भक्तां येवो ॥३९॥
होऊनियां स्वच्छंदवर्ती । पूर्वजन्मीं पावलों च्युती । आतां तरी लाभो सद्नती । संगनिर्मुक्ति ये अर्थीं ॥४०॥
पाठीसी असतां श्रीसमर्थ ।  कोणीही लावूं न शके हात । ऐसिया निर्धारें जे निर्धास्त । धन्य ते भक्त साईंचे ॥४१॥
असो आतां येतें मना । धरूनियां  बाबांच्या चरणां । करावी तयांस एक प्रार्थना । सकल भक्तजनांकारणें ॥४२॥
कीं हा ग्रंथ सर्वां घरीं । असावा नित्य पाठांतरीं । नियमें प्रेमें पारायण करी । संकटें वारी तयांचीं ॥४३॥
होवोनियां शुचिर्भूत । प्रेम आणि श्रद्धायुक्त । वाचील जो हा सात दिसांत । अनिष्टें शांत तयाचीं ॥४४॥
तो हा अध्यात्मतंतूंनीं विणिला । कृष्णब्रम्हाकथांहीं भरला । ब्रम्हात्मैक्यरसीं तरतरला । अपूर्व उथळला अद्वैतीं ॥४५॥
या नाथकाव्यनंदनवनीं । बत्तीस खणांचिया वृंदावनीं । या गोड मनोहर सदुग्धानी । ज्ञानी अज्ञानी रमताती ॥४६॥
करितां हें सच्चरित श्रवण । अथवा नेमें पारायण । करितील साई समर्थचरण । संकटनिवारण अविलंबें ॥४७॥
धनेच्छूसी लाभेल धन । शुद्ध व्यवहारीं यश पूर्ण । फळ येईल निष्ठेसमान । येईना भावावीण अनुभव ॥४८॥
आदरें करितां ग्रंथवाचन । साईसमर्थ सुप्रसन्न । करी अज्ञानदारिद्य विच्छिन्न । ज्ञानधनसंपन्नता देई ॥४९॥
ग्रंथरचनीं साईसंकेत । तैसेंच तयाचें गुप्त मनोगत । होईल जो तच्चरणानुरक्त । धन्य त्या जीवित भक्ताचें ॥५०॥
चित्त करूनियां सुसमाहित । नेमनिष्ठ हें सच्चरित । वाचावा एक तरी अध्याय नित । होईल अमित सुखदायी ॥५१॥
जया मनीं स्वहितविचार । तेणें हा ग्रंथ वाचावा साचार । जन्मोजन्मीं साईंचे उपकार । आनंदनिर्भर आठवील ॥५२॥
गुरुपौणिमा गोकुळअष्टमी । पुण्यतिथी रामनवमी । या साईंच्या उत्सवीं नियमीं । ग्रंथ निजधामीं वाचावा ॥५३॥
जैसा जैसा संग चित्तीं । तैसी तैसी जन्मप्राप्ती । अंते मती तैसी गती । शास्त्रसंमती यालागीं ॥५४॥
भक्तांचा आधार श्रीसाई । त्यावीण विन्घें न पडती ठायीं । लेंकुरालागीं कनवाळू माई । येथ नवलाई काय ती ॥५५॥
काय वानूं कथा यापरती । शब्दचि जेथें पावती उपरती । वाटे रहावें मौनवृत्तीं । योग्य स्तुति ती हीच ॥५६॥
तरी तीव्र मोक्षेच्छा मनीं धरून । शुभ कर्मेंच नित्य करून । श्रवणादि नवविध भक्तीचें सेवन । केलिया शुद्धांत:करण होईल ॥५७॥
हें न सद्नुरुप्रसादावीण । तयावीण ना परतत्त्वज्ञान । ‘ब्रम्हौवाहं’ नित्य स्मरण । गुरुनिष्ठाप्रवण तो होय ॥५८॥
संबंध जैसा पितापुत्र । गुरु हे उपमा नाममात्र । पिता करी इहसुखा पात्र । गुरु इहामुत्र - सुखदाता ॥५९॥
पिता अर्पील क्षणिक वित्त । गुरु अर्पील क्षयातीत । अविनाशवस्तु करील प्रतीत । अपरोक्ष हातांत देईल ॥६०॥
माता नऊ मास पोटीं धरी । जन्म देतां घाली बाहेरी । गुरुमातेची उलटी परी । बाहेरील भीतरीं घालील ॥६१॥
अंतीं ‘गुरु गुरु’ स्मरण करितां । शिष्य नि:शंक लाधेल सायुज्यता । मग तो स्वयें गुरूनें हाणितां । पूर्ण ब्रम्हाता लाधेल ॥६२॥
गुरुकरींचा आघात । करील जन्ममरण - नि:पात । गुरूकरितां देहाचा अंत । कोण मग भाग्यवंत यापरता ॥६३॥
खड्ग तोमर फरश शूल । इत्यादि हातीं घ्यावें लागेल । आघात पडतां शुद्धि असेल । मूर्ति मग दिसेल सद्नुरूची ॥६४॥
कितीही करा देहाचें जतन । केव्हां तरी होणार पतन । मग तयाचें गुरुहस्तें हनन । पुनर्जननहारक ॥६५॥
मारा मरेमरेंतों मार । छेदा माझा समूळ अहंकार । जेणें न पुनर्जन्म येणार । ऐसा मज दुर्धर द्या मार ॥६६॥
जाळा माझें कर्माकर्म । निवारा माझें धर्माधर्म । जेणें मज होईल सुख परम । ऐसा मोहभ्रम छेदावा ॥६७॥
घालवा माझे संकल्प विकल्प । करावें मज निर्विकल्प । पुण्यही नको नको मज पाप । नको हा उपव्द्याप जन्माचा ॥६८॥
जातां शरण रिघावयास । तंव तूं उभा चौंबाजूंस । पूर्व पश्चिम अवघ्या दिशांस । अधोर्ध्व आकाशपाताळीं ॥६९॥
अवघ्या ठायीं तुझा वास । तरी मजमाजीही तुझा वास । किंबहुना ‘मी - तूं’ हा भेदाभास । मानितां सायास मज वाटे ॥७०॥
म्हणूनि  हेमाड अनन्य शरण । द्दढ धरी सद्नुरुचरण । चुकवी पुनर्जन्ममरण । ऐसें निजोद्धरण संपादी ॥७१॥
ही काय थोडी कृति अघटित । भक्त उद्धराया असंख्यात । निर्माण केलें हें निजचरित । हेमाड निमित्त करूनियां ॥७२॥
हें श्रीसाईसमर्थचरित । व्हावें मज हातें हें अघटित । ना तों साईकृपेविरहित । पामरा मज अघटित हें ॥७३॥
नाहीं फारा दिसांचा सहवास । नाहीं संत ओळखण्याचा अभ्यास । अंगीं न शोधक द्दष्टीचें साहस । देखणें अविश्वासपूर्वक ॥७४॥
कधीं न केली अनन्यभावें उपासना । कधीं न क्षणभर बैसलों भजना । ऐसिया हस्तें चरितलेखना । करवूनियां जना दावियलें ॥७५॥
साधावया निजवचनार्थ । साईच आठवूनि देती हा ग्रंथ । पुरवूनि घेती हा निजकार्यार्थ । हेमाड हा व्यर्थ नांवाला ॥७६॥
मशकें काय उचलावा मेरू । टिटवी जैं उपसावा सागरू । परी पाठीं असतां सद्नुरू । अद्भुत करणी घडवितो ॥७७॥
असो आतां श्रोतेजन । करितों तुम्हांस अभिवंदन । जाहला हा ग्रंथ संपूर्ण । साईसमर्पण साईंचा ॥७८॥
श्रोतृवृंदां सानथोरां । माझें लोटांगण एकसरा । तुमचेनि धर्में या कथासत्रा । साईचरित्रा संपविलें ॥७९॥
मी कोण येथें संपविणार । हा तरी व्यर्थ अहंकार । जेथें साई सूत्रधार । तेथें हें म्हणणार मी कोण ॥८०॥
तरी त्यागूनि अभिमान मूल ब्याद । गावे निजगुरुगुणानुवाद । मनोज्ञा त्या या बोधप्रद । ऐसिया बाग्यज्ञा संपवितों ॥८१॥
येथें पूर्ण झाला हा ग्रंथ । पूर्ण झाला माझा मनोरथ । पूर्ण झाला साईकार्यार्थ । मीही कृतार्थ जाहलों ॥८२॥
ऐसा ग्रंथ अध्ययितां संपूर्ण । मन:कामना होतील पूर्ण । ह्रदयीं धरिल्या सद्नुरुचरण । होईल उत्तीर्ण भवसागर ॥८३॥
रोगिया होय आरोग्य । दरिद्री होय धनाढय । संकल्प - विकल्पा येईअ स्थैर्य । दीना औदार्य लाभेल ॥८४॥
पिशाच - बाधा अपस्मार । ग्रंथावर्तनें होतील दूर । मूक अपंग पंगू बधिर । तयांही सुखकर हें श्रवण ॥८५॥
जो शक्तिमान् परमेश्वर । तयाचा जयांसी पडला विसर । ऐसे जे अविद्यामोहित नर । होईल उद्धार तयांचा ॥८६॥
नर असूनि असुराचार । करूनि मिथ्या दवडिती शरीर । संसार मानिती सुखाचें आगर । होईल उद्धार तयांचा ॥८७॥
अगाध साईनाथांची करणी । हेमाड नितान्त स्थापिला चरणीं । तयाला निजसेवेसी लावुनी । सेवा ही करवुनी घेतली ॥८८॥
शेवटीं जो जगच्चालक । सद्नुरु प्रबुद्धिप्रेरक । तयाच्या चरणीं अमितपूर्वक । लेखणी मस्तक अर्पितों ॥८९॥
 
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥