मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. जाणता राजा
Written By वेबदुनिया|

बहूजनांसी आधारू

MH GovtMH GOVT
शेतकरी हा राज्याचा अन्नदाता आहे, असा विचार छत्रपती शिवरायांनी रयतेला दिला. छत्रपतींच्या सैन्यात सर्वाधिक शेतकर्‍यांची मुले होती, हे जाणूनच शेतकर्‍यांचे हित जपणे हे ते आद्यकर्तव्य मानत. शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिवबा सर्वाधिक उत्पन्न काढणार्‍या शेतकर्‍यांना पुरस्कार देऊन गौरवित असत. अल्पभूधारक व कमी उत्पन्न असणार्‍या शेतकर्‍यांना शिवकाळात मोफत बी-बीयाणे पुरविली जायची. याशिवाय शेतीमालाला योग्य किंमत देऊन शेतसाराही किफायतशीर प्रमाणात आकारला जात असे.

पडिक जमिनीची मशागत करणार्‍या शेतकर्‍यांना राज्याकडून अर्थपुरवठा केला जात असे. दलालांची प्रथा तर छ‍त्रपतींनी पुर्णत: नष्ट केली होती. बहुजन समाजातील लायक व्यक्तिंना महसूल अधिकारी म्हणून नेमण्याची पद्धत शिवरायांच्या कारकिर्दीतच सुरु झाली. दुष्काळाच्या काळात शिवकाळात शेतकर्‍यांना शेतसारा माफ करुन त्यांच्या गुरांसाठी मोफत चारा पुरविला जात असे. शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही हात लाऊ नये, मोबदला दिल्यशिवाय फळे घेऊ नका, झाडे तोडू नका, असे कडक फर्मान छत्रपतींनी महसूल अधिकार्‍यांना काढले होते. शेतकर्‍यांची आर्थिकस्थिती सुधारली तर देशाला संपन्नता येईल, असे मत राजेंचं होतं. म्हणूनच छत्रपती हे रयतेचा राजा म्हणून जनमानसात संबोधले गेले.

परस्त्रीप्रति आद
स्त्री ही कुठलीही असो, प्रत्यक्ष शत्रुच्या मुलखातील जरी असली तरी ती अखेर मातेसमानच असते, असा विचार छत्रपतींनी रयतेला दिला. शत्रुच्या स्त्रियांना सन्मानाने वागवणारा शिवबा अशी जनमानसात त्यांची ख्याती होती. त्यांच्या कारकिर्दीत स्त्रियांना सैन्यापासून तसूभरही भय नसे. एक चारित्र्यसंपन्न राजा म्हणून त्यांची ओळख होती. परस्त्रीचा आदर-सन्मान करणे, हा आमचा राजधर्म आहे, असे हे म्हणत. स्त्रिचा अनादर केल्याबद्दल शिक्षा म्हणून शिवबांनी एका गावप्रमुखाचे हातपाय तोडण्याचे हुकूम बजावले होते. आबाजी सोनदेवने कल्याणच्या सुभेदारची सून महाराजांसमोर पेश केली असता, महाराजांनी लगेचच त्या स्त्रीला सन्मानपूर्वक घरी पोहोचविण्याचे आदेश जारी केले. परस्त्रीविषयी महाराजांच्या मनात नितांत आदर होता.

सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्त
शिवकालीन इतिहासात देवळांप्रमाणे मशिदांनाही सरकारी तिजोरीतून अर्थसहाय्य देण्यात येत असे. शिवकालीन धर्म म्हणजे स्वराज्याचे व परंपरेचे रक्षण करुन, रयतेत आत्मविशवास व चैतन्य निर्माण करणे होय. मोहिमेवर असताना मुसलमानांच्या तसेच अन्य धर्मियांचे धर्मग्रंध व धर्मस्थळांचा आदर करावा, असा छत्रपतींचा सैन्यांना हुकूम असायचा. शिवरायांचे धार्मिक धोरण खर्‍या अर्थाने उदार होते. महाराजांच्या आरमारात दर्यासारंग दौलतखान, इब्राहिम खान सारखे अनेक मुस्लीम अधिकारी होते. इतकेच नव्हे तर, त्यांच्या लष्करात विविध पदांवर 700 हून अधिक पठान कार्यरत होते. राजधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म होय, असे ते म्हणत. युद्धभूमीवर सापडलेली कुराणाची प्रत त्यांनी मौलवीकडे सोपविण्याची घटना सर्वश्रुत आहे.

शिवबा हे एक चारित्र्यसंपन्न व परधर्माप्रति सहिष्णुता बाळगणारे राजे होते. उच्च पदावर नेमणूक करताना त्या व्यक्तिची जात-धर्म न पहाता देशप्रेम, राजाप्रती आदर, निष्ठा, युद्धनैपुण्य हे गुणवैशिष्टये परखूनच ते त्या व्यक्तीची नियुक्ती करित असत. सर्वधर्मसमभाव हा मूलमंत्र छत्रपतींनी आयुष्यभर जोपासला. त्याचबरोबर छत्रपतींनी धर्म व राजकारण याची फारकत करुन सर्वधर्मसमभावाची रयतेला शिकवण दिली.