Last Modified: वॉशिंग्टन , बुधवार, 21 जानेवारी 2009 (11:11 IST)
अमेरिकेचे नवनिर्माण करणार-ओबामा
अमेरिकेतील राजसत्तेने मंगळवारी रात्री ऐतिहासिक कूस बदलली आणि इतिहास घडला. गौरवर्णीयांचे वर्चस्व असलेल्या अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बराक ओबामा या कृष्णवर्णीयाने अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अतिशय कसोटीच्या वेळी देशाचे अध्यक्षपद हाती घेतलेल्या ओबामांनी देशावर ओढवलेल्या संकटाची जाणीव ठेवून अमेरिकेचे नवनिर्माण करण्याची घोषणा यावेळी केली. आर्थिक संकटातून देशाची मुक्तता करण्यासाठी आणि अमेरिकेबाहेर आपल्या देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्याला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
वॉशिंग्टनच्या नॅशनल मॉल ग्राऊंडवर लाखो लोक ओबामांच्या शपथविधीचा यादगार समारंभ पाहण्यासाठी जमलेले होते. ओबामांनीही हात उंचावून या समुदायाला मानवंदना दिली. एक हात उचांवलेला आणि एक हात बायबलवर ठेवून त्यांनी अमेरिकेचे 44 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अब्राहम लिंकन यांनी 1861 मध्ये ज्या बायबलवर हात ठेवून शपथ घेतली, त्यावरच हात ठेवून ओबामांनीही शपथ घेतली. तेव्हा काळाचे एक वर्तुळ जणू पूर्ण झाले.
शपथ घेतल्यानंतर त्यांनी फर्स्ट लेडी मिशेल आणि त्यांच्या दोन मुली मालिया आणि साशा यांचे चुंबन घेतले. त्यानंतर त्यांनी जमसमुदायाच्या दिशेने हात उंचावला आणि समोरच्या मानवी समुद्रातून ओबामा, ओबामा असा आसमंत दणाणून टाकणारा हुंकार सुरू झाला.
अगदी आजपासून, आपल्याला स्वतःचे उत्थान करायचे आहे. आपल्यावरची धुळ झटकायची आहे आणि एका नव्या अमेरिकेचे निर्माण करण्यासाठी कटिबद्ध व्हायचे आहे, अशा शब्दात ओबामांनी नवनिर्माणाचे इरादे जाहीर केले. ओबामांनी नवनिर्माणाचा उच्चार करताच समोर उपस्थित लाखो श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्या या निश्चयाला कृतीचे पाठबळ देण्याचा जणू हुंकार केला. ओबामांच्या भाषणात आशावाद जाणवत असला तरी वस्तुस्थितीच्या जाणीवेवरच तो आधारलेला होता.
अमेरिकी अर्थव्यवस्थेत नवे प्राण फुंकण्यासाठी धडक आणि वेगवान कृतीची गरज असल्याचे सांगतानाच या जगाचे नेतृत्व करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा तयार आहोत, असा संदेशही हा सोहळा पहात असलेल्या अमेरिकेबाहेरच्या जगतालाही दिला.
ओबामा आर्थिक अरिष्टातून देशाला बाहेर काढण्याचे वचन देत असताना शेअर बाजारात मात्र विक्रमी पडझड होत होती. जणू बॅंकांवरचे आर्थिक अरिष्ट अजूनही संपलेले नाही हा इशाराच तो देत होता.