राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. यासाठी राज्य शासनाने आता पदव्युत्तर पदवी, पदविका तसेच पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्यू वर्ल्ड रँकिंगमध्ये 200 च्या आत रँकिंग असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेणाऱ्या मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे 75 विद्यार्थ्यांसाठी सन 2023 -2024 पासून छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी ) पुणे या संस्थेमार्फत सयाजीराव गायकवाड- सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यास मान्यता दिली आहे.
अभियांत्रिकी पदवी, पदविकेसाठी 20 तर पीएचडीसाठी 5, वास्तुकलाशास्त्र पदवी, पदविकासाठी 4 पीएचडीसाठी 2, व्यवस्थापन पदवी, पदविकेसाठी 2 पीएचडीसाठी 1, विज्ञान पदवी, पदविकासाठी 10 पीएचडीसाठी 5, वाणिज्य /अर्थशास्त्र पदवी, पदविकासाठी 4 पीएचडीसाठी 5, कला पदवी, पदविकासाठी 4 पीएचडीसाठी 5, विधी अभ्यासक्रम पदवी, पदविकासाठी 4 पीएचडीसाठी 1 तसेच औषध निर्माण शास्त्र पदवी, पदविकासाठी 2 तर पीएचडीसाठी 1 असे 50 पदवी, पदविका अभ्यासक्रमासाठी तर 25 पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षासाठी शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अशा आहेत अटी व शर्ती
लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी व भारतीय नागरिक असावा.
विद्यार्थ्यांला परदेशातील क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये 200 च्या आत रॅकींग असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.
विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना, पीएचडीसाठी यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र सरकारची परदेशी शिष्यवृती घेतलेली नसावी, तसेच त्यांने अन्य प्रशासनिक विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.
परदेशातील विद्यापीठ, शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.
एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी व योजनेसाठी पात्र असणार नाही.
प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना नमूद केलेल्या विहीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक राहील. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मान्य केली जाणार नाही.
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थींना 35 वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी कमाल 40 वर्ष वयोमर्यादा असावी.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे ,कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वत:चे उत्पन्न धरुन सर्व मार्गानी मिळणारे मागील आर्थिक वर्षांतील वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉम नंबर 16 व सक्षम प्राधिकारी यांच्याकडील मागील आर्थिक वर्षांचे कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान 75 टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 75 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावी.
या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल.
एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त मुलांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल.
असा असेल अभ्यासक्रम कालावधी
पीएचडी-4 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो.
पदव्युत्तर पदवी 2 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेत तो.
पदव्युत्तर पदविका 1 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो.
विद्यार्थ्यास मिळणारे लाभ
परदेशातील शैक्षणिक संस्थेने पत्रामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीपासून लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गानी इकॉनॉमी क्लास विमान प्रवास भाडे (परतीच्या प्रवासासह) निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्याने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शुल्क भरणा पावती, प्रवासाचे मूळ तिकिट, मूळ बोर्डिंग पास, परतीच्या प्रवासाचे तिकिट इत्यादी तपासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर भारतीय रुपयांमध्ये प्रतिपूर्ती सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या १५ कार्यालयीन दिवसाच्या आत जमा करण्यात येईल.
सर्वसाधारण पदव्युत्तर पदवीसाठी २ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल व पदव्युत्तर पदविकासाठी १ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कभी असेल त्या अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लास विमान भाडे परतीच्या भाड्यासह, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यासह एका विद्यार्थ्यामागे प्रतिवर्षी रु. 30 लाखाच्या मर्यादेत, तर पीएचडीसाठी 4 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्यासाठी प्रतिविद्यार्थी प्रतिवर्षी रु. 40 लाखाच्या मर्यादेत शाखा/अभ्यासक्रम निहाय मार्गदर्शक तरतूदीनुसार परदेशी शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल.
प्रवेश घेतलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने विदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे येणारा खर्च भारत सरकारच्या इंडियन ओव्हरसिज स्कॉलरशिप या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या दरवर्षी युएसए व इतर देशांसाठी (युके वगळून) 15400 युएस डॉलर्स आणि युकेसाठी 9900 जीबीपी इतक्या रकमेच्या मर्यादेत निर्वाह भत्ता संबंधित विद्यार्थ्याच्या परदेशातील वैयक्तिक खात्यामध्ये जमा केला जाईल. सदर निर्वाह भत्याची रक्कम ही उपरोक्त नमूद पदव्युत्तर पदवी / पदविका असलेल्या प्रतिवर्षी रु.30 लाखाच्या व पीएचडीसाठी असलेल्या प्रतिवर्षी रु. 40 लाखाच्या मर्यादेमध्ये अंतर्भूत आहे.
विद्यार्थ्यास परदेशी शिक्षण संस्थेमार्फत किंवा इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत मिळणारी शिष्यवृत्ती, इतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ किंवा शिकविण्याबाबतचे मानधन किंवा फेलोशिप किंवा रिसर्च असोशिएट म्हणून मिळणारी ही रक्कम देय होणाऱ्या शिक्षण शुल्क वा एकूण देय रकमेमधून कपात करण्यात येईल.
सुरुवातीस परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणे आणि विहीत कालावधीत अभ्यासक्रमपूर्ण केल्यानंतर त्वरीत कालमर्यादेत भारतात परत येण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नजिकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लास विमानप्रवासभाडे देण्यात येईल. त्यासाठी विमान प्रवासाचे मूळ तिकीट, मूळ बोर्डींग पास, परतीचे प्रवास भाडे मिळण्यासाठी अभ्यासक्रम विहीत कालावधीत यशस्वीपणे पूर्ण केल्याच्या पुरावा इ. कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
विद्यार्थ्यांस परदेशात राहण्याच्या कालावधीसाठी विद्यापीठाने ठरवून दिल्यानुसार वैयक्तिक आरोग्य विमा काढणे अनिवार्य राहील. यासाठीचा संबंधीत विद्यापीठाच्या निकषानुसार किमान खर्च सारथी संस्थेकडून अनुज्ञेय राहील.
वरीलप्रमाणे शिक्षण शुल्क, निर्वाहभत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा आणि यासाठी निर्धारीत केलेल्या दरापेक्षा होणारा जास्तीचा खर्च विद्यार्थी / उमेदवारास स्वतः सोसावा लागेल व अशा प्रकारचे हमीपत्र विद्यार्थ्यास व पालकास अर्जासोबत द्यावे लागेल.
हा खर्च अनुज्ञेय नाही
व्हिसा अर्जावरील खर्च.
विद्यार्थ्याच्या कुटुंबातील सदस्यांचा प्रवास व इतर खर्च
नियमित शिक्षणाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अभ्यासक्रम अथवा प्रशिक्षणावरील खर्च.
भाषा प्रशिक्षणावरील खर्च.
नियमित अभ्यासक्रमाच्या कालावधीत अतिरिक्त प्रवासाचा खर्च. संशोधन, पुरक शैक्षणिक साहित्य, क्षेत्र भेटी, कार्यशाळा/ सेमिनार, आंतरवसियता यामधील सहभागाचा खर्च.
संगणक व तत्सम शैक्षणिक साहित्य.
विद्यार्थ्यास वरील लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून, तसे शैक्षणिक संस्था / विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे.
अपवादात्मक प्रसंगी, निवड समितीमार्फत निवड झालेल्या विद्याथ्र्यांनी / पालकांनी, परदेशी शिक्षण संस्था / विद्यापीठ, शिक्षण फी / इतर अनुज्ञेय फी स्वतः भरलेली असेल, अशा वेळी आवश्यक त्या पावत्या व पुरावे सादर केल्यानंतर, अशी रक्कम विद्यार्थ्यास देय होणाऱ्या शिष्यवृत्तीमधून विद्यार्थ्यांच्या परदेशातील खात्यावर जमा करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांने भारतात राष्ट्रीयकृत बँकेत व परदेशात अधिकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य आहे. त्याच खात्यावर त्यांना देय होणारी शिष्यवृत्ती सीएमपी किंवा आरटीएसजीने अदा केली जाईल. या खात्याचा तपशिल त्याने परदेशात जाऊन प्रवेश घेतल्यानंतर तात्काळ व्यवस्थापकीय संचालक सारथी पुणे यांना सादर करावा.
सदरची योजना नियमावली, अटी व शर्ती नुसार राबविण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांच्या मार्फत राबविण्यात येईल. परदेशी शिष्यवृत्ती अभ्यासक्रमासाठी गुणवत्ता यादी व निवड यादी तयार करुन विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
Edited By - Ratnadeep Ranshoor