बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. विजय तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

परखड नाटककार

- अभिनय कुलकर्णी

ND
मराठी नाट्यसृष्टी समृद्ध करणारे नाटकककार म्हणून विजय तेंडूलकरांचे योगदान फार मोठे आणि महत्त्वाचे आहे. आशयघन, सकस आणि काही विचार मनात पेरणारी त्यांची नाटके आहेत. त्यांची घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर, गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे ही नाटके पाहून कोरड्या मनांनी प्रेक्षक बाहेर पडूच शकत नाही. त्याला अस्वस्थ करण्याशिवाय तेंडूलकर रहात नाही. हेच तेंडूलकरांच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तेंडूलकरांशिवाय मराठीच नव्हे भारतीय नाटकांचा इतिहासच पूर्ण होऊ शकणार नाही.

तेंडूलकरांनी वयाच्या सहाव्या वर्षी पहिली कथा लिहिली. त्यानंतर अकराव्या वर्षी पहिले नाटक लिहून अभिनयासह दिग्दर्शनाची भूमिकाही पार पाडली होती. १९२८ मध्ये जन्मलेल्या तेंडूलकरांचा नाटककार हा प्रवास प्रिंटीग प्रेसचा व्यवसाय, पत्रकारिता, जनसंपर्क अधिकारी असा झाला. आतापर्यंत त्यांनी २८ नाटके, सात एकांकिका, सहा बालनाट्य, चार कथासंग्रह, दोन कादंबर्‍या एवढी साहित्यसंपदा निर्णाण केली आहे. त्यांच्या घाशीराम कोतवाल या नाट्यकृतीने खूपच खळबळ माजवली.

पेशव्यांच्या काळात कोतवाल असणार्‍या घाशीरामने त्यावेळी खूप अत्याचार केले होते. बावनखणीत जाणार्‍या कोतवालाचे आयुष्य अगदी रगेल आणि रंगेल होते. तेच तेंडूलकरांनी या नाटकात मांडले होते. सांगितिक सादरीकरणाने नाटकही छान जमले होते. सुरवातीच्या वादानंतर मात्र हे नाटक धोधो म्हणजे सहा हजार प्रयोगांइतके चालले. आजही एखादा ग्रूप ते सादर करतो तेव्हा पहाण्यासाठी नक्कीच गर्दी होते. तेंडूलकरांचे आणखी गाजलेले व खळबळजनक नाटक म्हणजे सखाराम बाईंडर.

स्त्रियांना कचरा मानून त्यांचा येथेच्छ उपभोग घेणार्‍या सखारामच्या माध्यमातून तेंडूलकरांनी पुरूषी मानसिकेतेचेही विश्लेषण केले. या नाटकाला कुठेही काळाच्या मर्यादेत बांधता येणार नाही. कारण अशा प्रकारची मानसिकता ही कुठल्याही काळात असू शकते. पण एकूणच हे नाटक आल्यानंतर खूपच वादळ उठले. शिवसेनेने नाटकाविरोधात आंदोलन केले. सरकारनेही त्यावर बंदी घातली होती. नंतर ती उठवलीही. पण नाटकापुढची गर्दी ओसरली नाही. आता मराठीतील एक माईलस्टोन नाटक म्हणून ते ओळखले जाते.

  गुजरातमध्ये मुस्लिमांच्या हत्येसाठी तेथील मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जबाबदार असल्याने 'माझ्या हातात बंदूक असती तर मी नरेंद्र मोदींना मारले असते,' असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.      
अनेक भाषांमध्ये हे नाटक गेले आहे. त्याची शांतता कोर्ट चालू आहे, गिधाडे, कमला, कन्यादान ही अन्य काही नाटके. तेंडूलकरांनी लिहिलेल्या अनेक नाट्यकृती भारतीय नाट्य परंपरेतील ठेवा ठरल्या आहेत. तेंडूलकरांनी चित्रपटक्षेत्रातही ठसा उमटवला आहे. सामना, सिंहासन आक्रित, उंबरठा, निशांत, अर्धसत्य (हिंदी) या चित्रपटांच्या पटकथा तेंडूलकरांच्याच. हे सर्व चित्रपट गाजले. गिरीश कर्नाड, बादल सरकार आणि विजय तेंडूलकर या सर्वकालीन महान नाटककारानी आधुनिक भारतीय नाट्यपरंपरेचा पाया रचला आहे.

तेंडूलकरांच्या नाटकांचे महोत्सव महाराष्ट्राबाहेर तर झालेच पण गेल्यावर्षी अमेरिकेतही झाला. विशेष म्हणजे तेथे सादर झालेल्या बाइंडरमध्ये इंग्रजी कलावंतांच्या भूमिका होत्या. तेथील नामांकित वृत्तपत्रात त्याची कौतुक करणारी परीक्षणे छापून आली. तेंडूलकरांचे मोठेपण सांगायवयास एवढे पुरेसे. अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे. तेंडूलकर गेल्या काही दिवसांतील बदलत्या राजकीय स्थितीनेही अस्वस्थ होते. त्यांची अस्वस्थता ते शब्दातून परखडपणे व्यक्त करतात. गुजरातमध्ये मुस्लिमांच्या हत्येसाठी तेथील मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जबाबदार असल्याने 'माझ्या हातात बंदूक असती तर मी नरेंद्र मोदींना मारले असते,' असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. एरवी कायम अशा परिस्थितीविरोधात विरोधात शब्दांची शस्त्रे चालविणार्‍या तेंडूलकरांवर हाती शस्त्र उचलण्याची वेळ का आली यावर वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने त्यानंतर भरले होते.

गेल्या काही दिवसांपासून तेंडूलकरांची प्रकृतीही ठीक नव्हती. विशेषतः त्यांची मुलगी साहित्यिक व अभिनेत्री प्रिया तेंडूलकरचे कर्करोगाने निधन झाल्याने तेंडूलकर खचले होते. यातून ते पूर्णपणे सावरलेच नाही.

विजय तेंडूलकरांचे लेख
नाटक : शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाईंडर, कमला, कन्यादान, गिधाडे, मित्राची गोष्ट, द सायकलिस्ट, माझी बहिण, झाला अनंता हनुमंता, श्रीमंत, मी जिंकलो मी हरलो

चित्रपट पटकथा : निशांत, सामना, मंथन, सिंहासन, गहराई, अंकीत, आक्रोश, उंबरठा, अर्धसत्य.