मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. विजय तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

एक आठवण तेंडुलकरांची

- अभिनय कुलकर्णी

ND
तेंडुलकरांना शेवटचं पाहिल्याचं आठवतं ते नाशिकमध्ये. गेल्या वर्षी नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागुलांना जनस्थान पुरस्कार देण्यात आला. बाबूरावांसारख्या बंडखोर साहित्यिकाने कायम परिघाबाहेरचं जगणं मांडलं. साहित्यिकांच्या कंपूमध्ये ते कधीही सामील झाले नाहीत. म्हणूनही असेल कदाचित पण त्यांना कधीही तोलामोलाचे मानसन्मान मिळाले नाहीत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानने मात्र उत्तरायुष्यात बाबुरावांना जनस्थान पुरस्कार देऊन सन्मान करण्याचं ठरवलं.

अर्थात बाबुरावांना पुरस्कार द्यायचा तर हा पुरस्कार देणारा माणूसही तितक्याच तोलामोलाचा हवा. पण लगेच एकमताने नावही ठरलं. विजय तेंडुलकर. कारण दुसरं तितक्या उंचीचं नावही नव्हतंच. शिवाय बाबुरावांच्या बंडखोरीशी नाते सांगणारे तेंडुलकरही त्याच परंपरेतले. कायम परिघाबाहेर रहाणारे. त्यामुळे दोघांनाही कंपूबाज साहित्यिकांनी बहिष्कृत केल्यासारखेच केले होते. अर्थात दोघांनीही आपल्या कर्तृत्वाने आकाश कवेत घेतले हा भाग निराळा.

पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम नाशिकच्या कालिदास कलामंदिरात झाला. तेंडुलकर शब्द दिल्याप्रमाणे आले. शरीर थकल्यासारखे वाटत होते. पण चेहरा प्रसन्न होता. बोलण्यातला उत्साहही पूर्वीसारखाच होता. सभागृह गच्च भरलेले होते. सभागृहाबाहेरही गर्दी होती. ही गर्दी बाबुरावांसाठी होती, तशीच तेंडुलकरांसाठीही होती. कारण हा बंडखोर साहित्यिक दुसऱ्या बंडखोर साहित्यिकाविषयी काय बोलतो, याची सर्वांनाच उत्सुकता होती.

  बाबुरावांचे साहित्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानने प्रकाशित करावे अशी सूचनाही त्यांनी केली. कारण शेवटी लेखकाचे साहित्य हाच खरा त्याचा सन्मान असतो, असे त्यांनी सांगितले.      
त्यावेळी तेंडुलकरांनीच बाबुरावांविषयीची आठवण सांगितली. बाबुरावांची पहिली कथा तेंडुलकरांनीच छापली होती. थोडक्यात बाबुरावांच्या बंडखोर साहित्यिक प्रवासाची सुरवात तेंडुलकरांच्या साथीनेच झाली. तेंडुलकरांना बाबुरावांविषयी आणखी एक छान सांगितले. ते म्हणाले होते, बाबुराव मराठी साहित्यविश्वाला समजलेच नाही. झेपलेच नाहीत. एवढ्या विविध स्तरावरचं जीणं बाबुरावांच्या साहित्यात आलंय तरीही त्यांचं साहित्य फार मोठ्या समाजापर्यंत पोहोचलंच नाही. त्याचवेळी साहित्यिक सन्मानाच्या पातळीवरही बाबुरावांना योग्य प्रकारे जोखलं गेलं नाही.

याचवेळी बाबुरावांची साहित्य संपदा बाजारात उपलब्ध होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. बाबुरावांचे साहित्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानने प्रकाशित करावे अशी सूचनाही त्यांनी केली. कारण शेवटी लेखकाचे साहित्य हाच खरा त्याचा सन्मान असतो, असे त्यांनी सांगितले. प्रतिष्ठाननेही तेंडुलकरांची ही सूचना मान्य करत बाबुरावांचे साहित्य प्रकाशित करण्याचे जाहीर केले होते.

तेंडुलकरांनी या कार्यक्रमात जास्त बोलण्याचे टाळले. कारण बाबुरावांनी व्यक्त व्हावे असे त्यांना वाटत होते. कारण एवढी वर्षे दबून राहिलेला, सार्वजनिक कार्यक्रमात फारशी बोलण्याची संधी न मिळालेल्या बाबुरावांना आता आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना बोलायची संधी मिळाली आहे, ती त्यांना द्यायला पाहिजे, असे त्यांना प्रामाणिकपणे वाटत होते. त्यावेळीही बाबुरावांनी लिहिलेले भाषण दुसरे कोणी तरी वाचणार होते. पण तेंडुलकरांनी स्वतः जे वाटेल ते बोलावे, असे बाबुरावांना सुचविले. त्यानंतर मग बाबुराव मुक्तपणे बोलले. त्रास होत असतानाही मनातल्या भावनांचा निचरा करत होते.

तेंडुलकरांमुळे जमलेल्या श्रोत्यांना बाबुराव ऐकायला मिळाले. मुख्य म्हणजे बाबुरावांना ऐकायला स्वतः तेंडुलकरही उत्सुक होते. त्यांच्या एका सूचनेमुळे त्यांची आणि लोकांचीही इच्छा पूर्ण झाली. त्याचवेळी तेंडुलकरांच्या मोठ्या मनाचेही दर्शन घडले.