शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. अष्टगणेश
Written By वेबदुनिया|

अष्टगणेश : धुम्रवर्ण

धूम्रवर्णावताराश्चभिमानसुरनाशक:।
आखुवाहन एवासौ शिवात्मा तु स उच्यते:।।

धुम्रवर्ण अवतार अभिमानासुराचा नाश करणारा आहे. तो शिवब्रह्म स्वरूप आहे. त्याला मूषक वाहन असेही म्हटले जाते. लोक पितामहाने सहस्त्रांशुला कर्मराज्याच्या अधिपती पदावर नियुक्त केले. राज्यपद प्राप्त झाल्यावर सूर्यदेवाच्या मनात अहंकार उत्पन्न झाला. ते विचार करू लागले की, 'कर्माच्या प्रभावाने पितामह सृष्टीची रचना करतात, कर्मामुळेच विष्णू जगताचे पालन करतात, कर्माद्वारे शिवसंहार समर्थ आहे. संपूर्ण जग कर्माधीन आहे आणि मी त्यांचा संचालक आहे.

सर्वजण माझ्या अधीन आहेत'. असा विचार करता करता त्यांना शिंक आली आणि त्या शिंकेमधून एक महाकाय पुरूष उत्पन्न झाला. तो पुरूष दैत्यगुरू शुक्राचार्याकडे गेला. तेव्हा शुक्राचार्यांनी त्याला परिचय विचारला असता त्याने सांगितले की माझा जन्म सूर्यदेवाच्या शिंकेपासून झाला आहे. मी अनाथ व अनाश्रित असून मला तुम्ही आश्रय द्या. आपल्या प्रत्येक आज्ञेचे मी पालन करील.

हे ऐकून शुक्राचार्य थोडा वेळ ध्यानग्रस्त झाले आणि म्हणाले 'तुझा जन्म सूर्याच्या अहंभावामुळे झाला आहे म्हणून तुझे नाव 'अहम' असे ठेवण्यात आले आहे. तू तपस्या करून शक्ती प्राप्त कर एवढे सांगून दैत्य गुरूने त्याला गणेशाचा षोडाशाक्षर मंत्र आणि जप विधी दिला.

अहम् जंगलात जाऊन उपवास करत गणेशमंत्राचा जप करू लागला. त्याची कठोर तपस्या पाहून प्रत्यक्षात मूषक वाहन, गजानन, त्रिनेत्र, एकदंत प्रकट झाले. त्यांना आपल्या समोर पाहून त्याने प्रणाम केला. संतुष्ट होऊन लंबोदर त्याला म्हणाले, 'मी तुझे तप आणि स्तवन पाहून प्रसन्न झालो. तुला जो वर मागायचा असेल तो वर मला माग!'.

अहम् ने प्रभूला हात जोडून ब्रम्हांडाचे राज्य आणि आरोग्याचा वर मागितला. 'तथास्तू' म्हणत गणराय अंतर्धान पावले. अहम् आनंदाने आपल्या गुरूकडे गेल्यावर त्यांनी त्याचे कौतुक केले. गुरू शुक्राचार्यांनी त्याला दैत्यधीशपदी नियुक्त केले. त्याने विषयप्रिय नावाचे एक सुंदर नगर निर्माण केले. अहम् तिथेच असुरांबरोबर राहू लागला. नंतर प्रमादासुराची कन्या ममताशी त्याचा विवाह झाला.

काही दिवसांनतर त्याला गर्व आणि श्रेष्ठ नावाचे दोन मुले झाले. त्याचे सासरे प्रमादासुर यांनी ब्रह्मांडावर विजय प्राप्त करून सुख उपभोगायचे त्याला सांगितले. अहम्ला आपल्या सासर्‍याचे म्हणणे पटले. मग शुक्राचार्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सैन्यासह विजयी घोडदौड सुरू केली.

त्याने पाताळावरही आक्रमण केले. परम प्रतापी अहंतासुराच्या भीतीपोटी शेषाने त्याला कर देण्यास सुरवात केली. नंतर स्वर्गावर आक्रमण केले विष्णूला असुरांच्या अमोघास्त्रासमोर पराभूत व्हावे लागले. सर्वत्र अहंकासुराचे अधिपत्य झाले होते. देव, ऋषी जंगलात लपून राहत होते. अहंतासुर मद्य आणि मांस सेवन करत असे.
WD
तो मनुष्य, नाग आणि देवतांच्या कन्यांवर बलात्कार, अपहरण करून त्यांचे शीलहनन करत असे. अशा प्रकारे सगळीकडे पापाचे राज्य निर्माण झाले होते. जंगलात लपलेल्या देवता, ऋषी यांचे यज्ञ मोडून काढणे. तसेच जंगल नष्ट करण्याचा आदेश त्याने दिला. त्यामुळे देवता, ऋषी, मनुष्य सर्वजण भयभीत झाले. मंदिरामध्ये देवाच्या जागी असुरांच्या मूर्ती बसविण्यात आल्या होत्या.

या भयानक त्रासाला कंटाळून ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी एकत्र येऊन गणेशाची आराधना करण्यास सुरवात केली. त्यांची आराधना पाहून धूम्रवर्ण प्रकट झाले. सर्व देवतांनी त्यांना प्रणाम केला आणि अहंतासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवून देण्याची विनंती केली. दुसर्‍या दिवशी रात्री धूम्रवर्ण अहंतासुराच्या स्वप्नात गेला. आपल्या दिव्य रूपाची जाणीव त्याला करून दिली.

नंतर त्याने सकाळी अहंतासुराने असुरांना आपल्या स्वप्नाविषयी सांगितले. तो म्हणाला, की मी धूम्रवर्णाला प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांचे डोळे रागाने लालबुंद झालेले होते. आपले संपूर्ण राज्य जाळून भस्म केले आणि आपण सर्व अशक्त झाल्याचे पाहिले. देवगण स्वतंत्र होऊन धर्ममय जीवन व्यतीत करू लागले आहेत. असुरांनी त्याला स्वप्नावर विश्वास ठेवू नका.

तुम्हाला वर प्राप्त झालेला आहे. तुम्हाला घाबरायचे काहीही कारण नाही, असे सांगितले. स्वप्नाचा प्रभाव न पडल्याचे पाहून धूम्रवर्णाने महर्षी नारदाला संदेश घेऊन अहंतासुराकडे पाठविले. नारदाने अहंतासुराला धूम्रवर्ण गणेशाला शरण येण्याचे सांगितले अन्यथा तुझा सर्वनाश केला जाईल, असा इशाराही दिला. तेव्हा अहंतासुर अत्यंत क्रोधित झाला. तिकडे देवगण धूम्रवर्णाजवळ प्रार्थना करू लागले. तेव्हा धूम्रवर्णाने देवतांना सागितले तुम्ही इथेच बसून माझी लीला पाहा. मी अहंतासुराचा वध करतो.

प्रभूने आपले उग्र रूप धारण केले आणि जिथे असुर दिसेल तिथे त्याला ठार करत असे. हे पाहून सर्व असूर भयभीत झाले. अहंतासुर अत्यंत व्याकूळ झाला. त्याच्या पुत्राने त्याला धीर दिला आणि म्हणाले आम्ही असताना तुम्हाला काळजी करायची गरज नाही. मायायुक्त धुम्रवर्ण काहीच करू शकणार नाही? एवढे म्हणून गर्व आणि श्रेष्ठ दोघांनी ‍पित्याच्या चरणी प्रणाम केला आणि आपल्या सशस्त्र सैनिकांसह युद्धभूमीवर पोहचले.

अमित तेजस्वी ज्वाळात ते सर्वजण जळून गेले. हे सर्व पाहून अहंतासुर अत्यंत व्याकूळ झाला. तो शुक्राचार्याकडे गेला आणि त्यांना धूम्रवर्णापासून रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा शुक्राचार्यांनी त्याला समजाविले व धूम्रवर्णाला शरण जाण्याचे सांगितले. नं‍तर अहंतासुर धूम्रवर्णाला रणांगणात शरण आला आणि क्षमेची याचना करू लागला. प्रभूने त्याला क्षमा करून त्याला आपला भक्त मानले. त्याने प्रभुला प्रणाम केला आणि शांत जीवन व्यतीत करण्यासाठी पाताळात निघून गेला.