गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (22:12 IST)

बुल्ली बाई प्रकरणातील अटक आणि तीन महिलांची कहाणी

बुल्ली बाई अॅप प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं गुरुवारी आसामहून 21 वर्षांच्या नीरज बिश्नोईला अटक केली आहे.
पोलिसांच्या मते, नीरज बिश्नोई हा याप्रकरणी प्रमुख आरोपी आहे, कट रचणारी प्रमुख व्यक्ती आहे. याच माणसानं हे अॅप डिझाईन केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
याप्रकरणात यापूर्वी बुधवारपर्यंत 3 जणांना अटक केल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली होती.
त्यांनी सांगितलं होतं की, "हा एक संवेदनशील विषय आहे. यात काही लोकांनी एका समाजातील महिलांचा अपमान केला आणि त्यांच्या भावनांना दुखावलं."
नगराळे यांच्या मते, "या लोकांनी हे अॅप अपलोड केलं आणि याच नावानं ट्विटर हँडल बनवलं. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली."
त्यांनी पुढे सांगितलं, "याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यातील दोन जण उत्तरांखडचे आहेत, ज्यात एक महिला आहे. आणि तिसरा व्यक्ती मंगळूरचा आहे. तो इंजिनियरिंगचा विद्यार्थी असून त्याचं नाव विशाल झा असं आहे."
1 जानेवारी 2022 रोजी बुल्ली बाई अॅपवर अनेक मुस्लीम महिलांची ऑनलाईन बोली लागल्याचं प्रकरण समोर आलं होतं. यात एक नाव सायमा खानचंही होतं.
 
सायमा खान- रेडियो जॉकी
सायमा खान ही रेडियो जॉकी आहे. आरोपींना अटक केल्याप्रकरणी त्यांनी बीबीसीशी बोलताना आनंद व्यक्त केला. या कारवाईमुळे आम्हाला आश्वस्त वाटत आहे, असं त्या म्हणाल्या.
 
याप्रकरणात आपण कोणतीही एफआयआर दाखल न केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण, चौकशीत एका महिलेचं नाव समोर येणं आणि तिला अटक होणं, ही अचंबित करणारी गोष्ट आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
सायमा सांगतात, "गेल्या चार-पाच वर्षांपासून माझं ट्रोलिंग झाले आहे. माझ्या फोटोंना मॉर्फ करून त्यांचा चुकीच्या पद्धतीनं वापर करण्यात आला. सुल्ली हा एक अपमानकारक शब्द आहे, जो मुस्लीम तरुणींसाठी वापरला जातो. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हे प्रकरण समोर आल्यानंतर तेव्हाही आम्ही याविरोधात आवाज उठवला होता. पण, अजूनही काही मुली अशा आहेत, ज्या याविरोधात बोलू शकत नाहीये. त्यामुळे हे थांबवणं आमची गरज आहे."
 
जुलै 2021 मध्ये मुस्लीम महिलांचे सोशल मीडियावरील फोटो वापरून एक अॅप तयार करण्यात आलं होतं. सुल्ली फॉर सेल, असं या अपचं नाव होतं. हे एक ओपन सोर्स अप होतं. ज्यात जवळपास 80 महिलांचे फोटो, त्यांची नावं आणि ट्विटर हँडल नमूद करण्यात आले होते.
 
या अॅपवर सगळ्यात वरती लिहिलं होतं, 'फाईंड यूअर सुल्ली डील.'
 
'या महिलांचा अभिमान बाळगा'
सायमा खान पुढे सांगतात, "आमचा समाज परंपरावादी आहे आणि जेव्हा अशी प्रकरणं समोर येतात, तेव्हा सगळे आरोप मुलीवर केले जातात, तिच्यावर निर्बंध लादले जातात. जास्त बोलू नका, फोटो अपलोड करू नका, असं मुलींना सांगितलं जातं. पण, खरं तर पालकांनी आणि समाजानं या मुलींचा अभिमान बाळगायला हवा. कारण या मुलींना गुंड प्रवृत्तीची माणसं घाबरतात."
 
त्या सांगतात, "आम्ही मुली सध्या वाईट काळातून जात आहोत. पण, याप्रकरणाला शेवटपर्यंत घेऊन जाऊ, जेणेकरून भविष्यात कुणाला यामुळे त्रास होता कामा नये. या प्रवृत्तीला इथंच ठेचलं नाही, तर ती प्रत्येक मुलीच्या घराबाहेर फिरताना दिसून येईल."
या घटना म्हणजे आयुष्यातील असा ब्रेक आहे ज्यामुळे आपण फक्त पुढे जात राहतो आणि मागे केवळ दरी शिल्लक राहते, सायमा अशाप्रकारे या घटनांचं वर्णन करतात.
 
'महिलांना गप्प करण्याचा प्रयत्न'
त्या सांगतात, "मला माझ्या कुटुंबीयांसाठी काळजी वाटते. कारण ते माझ्या सुरक्षेसाठी चिंतेत असतात. माझ्यासोबत काही वाईट घडू नये म्हणून मी इतकं बोलू नये, भूमिका घेऊ नये, असं त्यांना वाटतं. अशावेळी घरच्यांसाठी मी कधीकधी गप्प राहते. तर कधीकधी स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी मात्र बोलावं लागतं."
 
बुल्ली बाई अॅपवर 100 हून अधिक मुस्लीम महिलांचे फोटो शेयर केले जात होते आणि या महिला विक्रीस आहे, असं सांगितलं जात होतं. या अनेक महिला पत्रकार आणि कार्यकर्त्यांच्या फोटोंचाही समावेश होता.
 
या अॅपविषयी सायमा सांगतात, "ही यादी महिलांविरोधी आहे. यातून धार्मिक निशाणा साधला जातो. या कृत्यात सहभागी लोकांना त्या मुस्लीम महिलांना गप्प करायचं आहे, ज्या ट्विटरवर बोलत आहेत, त्यांचं म्हणणं मोठ्या आवाजात मांडत आहेत."
 
भारतातील स्थितीविषयी त्या सांगतात, "एका विशिष्ट समाजाच्या लोकांना शिव्या देणं, त्यांना जाहीरपणे विकण्याची भाषा करणं, ही आपल्या देशात सामान्य गोष्ट कधी झाली माहिती नाही. यावर सरकारही चूप राहतंय."
 
वातावरण कसं बनवलं जातंय?
त्या पुढे सांगतात, "या देशातील मुसलमांनासोबत काय करायला पाहिजे, याविषयीचे भाषणं, त्यांचे व्हीडिओ समोर येतात. मुस्लिमांच्या विरोधात हत्यार उचला असं सांगितलं जातं. हे कसं वातावरण आहे? आणि हे काही कुणापासून लपून राहिलेलं नाहीये. पण, याविषयी सरकारमधील माणसं काही का बोलत नाहीये? याकडे ते कधी लक्ष देतील?"
 
याप्रकरणी अटक केलेला इंजिनियरिंगचा विद्यार्थी विशाल झा याच्याविषयी सायमा सांगतात, "या मुलानं त्याच्या भविष्याविषयी विचार करायला हवा. त्याऐवजी तो अशा अॅपवर काम करत आहे. अशानं आपला देश पुढे कसा जाईल? सामान्य नागरिक असा विचार का करत नाही?"
क्रिकेटपटू विरोट कोहलीच्या मुलीच्या प्रकरणाचा उल्लेख करत सायमा म्हणतात की, "याप्रकरणातील आरोपीला मुंबई पोलिसांनी 24 तासांत पकडलं होतं. याचा अर्थ पोलीस त्वरित कारवाई करू शकतात. पण, सुल्ली डील्सची गोष्ट गेल्यावर्षी जुलै महिन्यात समोर आल्यानंतर काय झालं? दिल्ली पोलिसांनी गंभीरपणे कारवाई का नाही केली?"
 
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली होती.
 
यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या मुलीला धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं अटक केली होती.
 
"हे चुकीचं सुरू आहे, असं मला पंतप्रधान आणि महिला व बालकल्याण मंत्रालयाकडून ऐकायचं आहे. हे एक राष्ट्रीय स्कँडल आहे. संपूर्ण देशाची पोलीस का नाही काम करत आहे?," असा सवाल सायमा करतात.
 
हना मोहसिन खान- कमर्शियल पायलट
हना मोहसिन या व्यवसायानं एक कमर्शियल पायलट आहेत. बुल्ली बाई प्रकरणात त्यांचं नाव यादीत नसलं, तरी हे अॅप उघडल्यानंतर त्यांना प्रचंड राग आल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
 
त्या सांगतात, "मी जेव्हा फोनवर स्क्रोल करत होते आणि एकेक नावं समोर येत होती, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. हे पुन्हा सुरू झालं, असं मला वाटलं. नवीन वर्ष आलं होतं. एक समाधान होतं. पण, सगळं बदललं."
याप्रकरणी झालेल्या अटकेमुळे त्यांनी आनंद व्यक्त केला.
 
त्या पुढे सांगतात, "गेल्या वर्षी सुल्ली डील्सचं प्रकरण समोर आल्यानंतर मी एफआयआर दाखल केली होती. पण याप्रकरणी निराशा हातात आली होती. यापूर्वी माझ्या काही मैत्रिणींची मे महिन्यात ईदच्या सणावेळी याच अॅपवर बोली लावण्यात आली होती. याप्रकरणीही काहीच कारवाई करण्यात आली नव्हती."
 
गेल्या वर्षीच्या सुल्ली डील्सची आठवण काढताना त्या भावूक होतात.
 
'मुसलमान असल्यामुळे टार्गेट'
त्यांच्या मते, "सुल्ली डील्समध्ये माझं नाव आल्यानंतर मला धक्काच बसला होता. कारण मी ना कधी राजकारणावर बोलते, ना कधी मला ट्रोल करण्यात आलं. मी केवळ एक मुसलमान महिला असल्यामुळे मला टार्गेट करण्यात आलं आणि याचा माझ्या तब्येतीवर परिणाम झाला."
 
त्या पुढे सांगतात, "प्रत्येक वेळेस फोन पाहून माझी इथं बोली लागली की नाही, हे मला पाहावं लागेल असं मला वाटत होतं. माझ्या फोटोसोबत कधी काय होईल, याची भीती होती. याची परिणती शारीरिक त्रासात तर नाही होणार ना? मला कशापद्धतीनं स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, असे प्रश्न माझ्या मनात यायचे."
ईदच्या वेळेस पोलिसांनी कारवाई केली असती तर आज जे होत आहे, ते कदाचित झालं नसतं, असं त्या सांगतात.
 
याप्रकारच्या घटना झाल्यानंतर भाऊ-बहीण समजून घेतात. पण आई-वडीलांना या बातम्यांपासून दूर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागत असल्याचं त्या पुढे सांगतात.
 
"जे कुणी हे असं करत आहेत. ते आम्हाला भीती घालून देत नाहीयेत, तर अधिक मजबूत करत आहेत," त्या पुढे सांगतात.
 
फातिमा खान- पत्रकार
फातिमा खान पेशाने पत्रकार आहेत. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यातली घटना अजूनही त्यांच्या मनात ताजी आहे.
 
गेल्या वर्षी सुल्ली डील्समध्ये त्यांचं नाव आलं तेव्हा त्या रिपोर्टिंगसाठी बाहेर होत्या. यावेळी बुल्ली बाईमध्येही त्यांचं नाव आलंय.
 
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "हे माझ्यासोबत दुसऱ्यांदा झालंय. जेव्हा हे ट्वीट होऊ लागलं तेव्हा ते ज्या अकाऊंटवरून करण्यात आलं होतं त्यांनी मला टॅगही केलं होतं. ती 31 डिसेंबरची रात्र होती."
त्या पुढे सांगतात, "गेल्या वर्षीची घटना मी पुढचे सहा महिने भोगत होते. आता मी ते पुन्हा सहन करू शकत नाही. कशा प्रतिक्रिया येणार, कोण पाठिंबा देणार, कोण गप्प राहणार, यावर चर्चा होणार हे सगळं आता मला माहिती आहे. कोणासाठी ही मोठी गोष्ट आहे आणि कोणासाठी नाही हे आता माझ्या लक्षात आलंय."
 
गेल्यावेळी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी हे प्रकरण जास्त गांभीर्याने हाताळलं होतं, पण यावेळी लोक जास्त जागरूक दिसत असल्याचं त्या सांगतात.
 
'ही भयावह गोष्ट'
त्या म्हणतात, "लिस्ट तयार करणं, फोटो अपलोड करणं हे भयावह आहे. म्हणजे शोषण करण्यासाठी तुम्ही कोणकोणते मार्ग वापरता येतील याचा विचार करताय."
 
हे सगळं प्रतिकात्मक असल्याचं फातिमा सांगतात. 'हीच तुमची जागा आहे. तुम्हाला विकता येऊ शकतं. तुम्हाला स्वतःचं मत नाही, तुम्ही तुमचं काम करू नका आणि घरीच रहा,' असं या यादीत असलेल्या आणि नसलेल्या मुस्लिम महिलांना सांगण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणतात.
 
जेंडरशी संबंधित बाबींविषयीच फातिमा वार्तांकन करतात. त्या सांगतात, "मुस्लाम महिला गप्प असतात, त्यांना आवाज नसतो, त्या दबून असतात, त्यांच्या घरात त्यांचं ऐकलं जात नाही, त्यांचा नवरा, वडील, भाऊदेखील त्यांची काळजी घेत नाहीत अशी त्यांची एक ठराविक प्रतिमा भारतात परंपरेने तयार केली आणि माध्यमांनीही तसंच चित्र उभं केलं. आपल्याला यांना वाचवणं गरजेचं आहे, असा भास निर्माण करण्यात आला."
"पण आता मुस्लीम महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत आणि जेव्हा या महिला ट्विटर वा इन्स्टाग्रामचा वापर स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी करतात, हे चूक होतंय वा अन्याय होत असल्याचं सांगतात. तेव्हा त्या सशक्त महिला म्हणून समोर येतात. जगासमोर त्यांचं जे 'अत्याचार सहन करणारी मुसलमान महिला' असं चित्र उभं करण्यात आलंय त्यापेक्षा ही छबी खूपच वेगळी असते. हे त्यांना आवडत नाही आणि म्हणूनच अशी लिस्ट तयार करण्यात येते."
 
'तुम्ही तुमचं स्थान ओळखून रहा नाही तर तुमच्यासोबत हेच होईल' असा संदेश प्रत्येक मुस्लिम महिलेला देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांना वाटतं.
 
सुल्ली डील्समध्ये नाव आल्यानंतर त्याचा मनावर दीर्घकाळ परिणाम झाल्याचं त्या म्हणतात.
 
"सुल्ली डील्स प्रकरण समोर आल्यानंतर मी आजारी पडले. मला उलट्या होऊ लागल्या. शरीरावरही परिणाम झाला."
 
लोकांचं वर्तन
 
पण लोकांचं वागणं सगळ्यात जास्त चकित करणारं होतं, असं त्या सांगतात.
 
त्या म्हणतात, "अरे हा तर फक्त ऑनलाईन लिलाव आहे, प्रत्यक्षात कुठे तुम्हाला विकण्यात आलंय, असं म्हणणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया क्लेषकारक होत्या. म्हणजे जेव्हा हे प्रत्यक्ष होईल तेव्हा याचा विरोध करणार. हे दुःखद आहे. या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्यांना हे समजावण्यात अर्धी शक्ती खर्च होते आणि हे सगळं भावनिक खच्चीकरण करणारं असतं."
 
ज्याप्रमाणे लिंचिंगच्या घटना 'नॉर्मल' करण्यात आल्या, तसंच याबाबतही झालं तर ही वाईट गोष्ट असेल, असं त्यांना वाटतं. आणि ते होऊ नये म्हणून लोकांनी याबद्दल सतत बोलत राहणं, विरोध करत राहणं महत्त्वाचं असल्याचं त्या सांगतात.
 
या घटना 'अँटी मुस्लीम हेट क्राईम' असल्याचं फातिमा सांगतात.
 
हा पितृसत्ताक विचारसरणीचा परिणाम असल्याचं त्यांना वाटत नाही. त्या म्हणतात, "हे मुस्लीम महिलांच्या विरोधात आणि इस्लामोफोबिक आहे. तुमच्या बायकांना सांभाळा असं एका समाजाला सांगण्याचा हा प्रयत्न आहे."
 
मग स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवणं हा यावरचा एक उपाय असू शकतो का?
 
याचं उत्तर देताना त्या सांगतात, "आपणच यासाठी जबाबदार आहोत, आपण फोटो अपलोड करायला नको होता असं कुठेतरी वाटायला लागतं. पण नजीबच्या आईचंही नाव आलं, अशी अनेक नावं आहेत. त्यावर तुम्ही काय म्हणाल?"
 
कायदेशीर कारवाईबद्दल बोलताना फातिमा म्हणतात, "सध्याच्या ताज्या प्रकरणाबद्दल पोलिसांनी तातडीने कारवाई केली हे खरं आहे, पण गेल्यावेळीच जर कठोर कारवाई झाली असती तर अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत असा ठोस संदेश गेला असता. असं झालं तर मग अशा गोष्टी करणाऱ्यांना असं वाटतं की आपण यातून निसटू शकणार नाही."