बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (14:00 IST)

ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू अडकले सेक्स स्कॅण्डलमध्ये

महाराणी एलिझाबेथ यांचे तिसरे पुत्र आणि प्रिन्स चार्ल्स यांचे धाकटे बंधु सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकल्यामुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे.
 
या सगळ्याची सुरुवात झाली ती ड्युक ऑफ यॉर्क असणाऱ्या प्रिन्स अँड्र्यूंची अमेरिकेच्या एका वादग्रस्त व्यक्तिमत्वाशी मैत्री असल्यामुळे.
 
अमेरिकेत फायनान्स क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जेफ्री एपस्टाईनशी प्रिन्स अँड्र्यू यांची मैत्री होती. जेफ्री एपस्टाईनला अल्पवयीन मुलीसोबत सेक्स केल्यामुळे 2009 साली सेक्स ऑफेंडर म्हणून घोषित केलं होतं.
 
इतकंच नाही, 2005 साली अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यातल्या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केला म्हणून पोलिसांनी त्यांच्या घरांवर छापे मारले होते. तेव्हा अल्पवयीन मुलींचे अनेक फोटो त्यांच्या घरांमध्ये सापडले होते.
 
पाम बीच पोलीसांच्या प्रमुख मिशेल रायटर यांनी त्यावेळी मीडियाला सांगितलं होतं की हे फक्त आरोप नाहीयेत. जवळपास 50 अल्पवयीन मुलींनी आपला विनयभंग एपस्टाईन यांनी केल्याचं आम्हाला सांगितलं आहे.
 
न्युयॉर्क मॅगझिनमध्ये 2007 साली लेख लिहिणाऱ्या मायकल वुल्फ यांनी एकदा सांगितलं होतं की मी त्यांची मुलाखत घेतली होती तेव्हा ते म्हणाले, "आता मला आवडतात अल्पवयीन मुली. काय करू?"
 
याच एपस्टाईन यांनी 10 ऑगस्ट 2019ला आपल्या जेलमधल्या कोठडीत आत्महत्या केली. 2019 साली त्यांच्यावर अल्पवयीन मुलींचं शोषण करणारं सेक्स रॅकेट चालवल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला होता. त्यासाठी त्यांना अटकही करण्यात आली होती.
 
66-वर्षीय जेफ्री यांचे अमेरिकचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याशीही संबंध होते.
 
याच जेफ्री एपस्टाईनशी प्रिन्स अँड्र्यू यांची मैत्री होती आणि त्यांचे एकमेकांसोबतचे फोटो समोर आले आहेत.
 
2010 साली न्युयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये हे फोटो काढले आहेत. या फोटोंनी वादाला सुरुवात झाली. एका सेक्स ऑफेंडर आणि अल्पवयीन मुलींचं शोषण करण्याचा व्यक्तीबरोबर प्रिन्स अँड्र्यू मैत्री करूच कशी शकतात असा प्रश्न माध्यमांनी आणि लोकांनी विचारला.
 
हे कमी की काय म्हणून एपस्टाईन यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या व्हर्जिनिया रॉबर्ट्स आणि आताच्या व्हर्जिनिया जुफ्रे या महिलेने आरोप केलाय की 17 वर्षांची असताना त्यांना प्रिन्स अँड्र्यूसोबत सेक्स करायला भाग पाडलं गेलं.
यासंबंधी स्पष्टीकरण देण्यासाठी प्रिन्स अँड्र्यूंनी बीबीसीच्या न्यूजनाईट या कार्यक्रमात मुलाखात दिली. या मुलाखतीनंतर वाद शमण्यापेक्षा वातावरण अधिकच पेटलं.
 
व्हर्जिनियासोबत आपण कोणत्याही प्रकारचे शारिरीक संबंध प्रस्थापित केले नसल्याचा प्रिन्स अँड्र्यूंनी वारंवार पुनरुच्चार केला आहे. त्यांच्यासोबत आपला कोणताही फोटो लंडनमध्ये काढला गेल्या असल्याचं आपल्याला आठवत नाही असंही त्यांनी सांगितलं.
 
हा फोटो माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे आणि या फोटोत प्रिन्स अँड्र्यू व्हर्जिनियांच्या कमरेत हात घालून उभे असल्याचं दिसत आहे.
 
हा फोटो खोटा असल्याचं प्रिन्स अँड्र्यूंचं म्हणणं आहे. "मी लंडनमध्ये असताना नेहमीच सुट आणि टाय घालतो. असे कपडे मी फक्त प्रवास करताना घालतो," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
 
मात्र ब्रिटनमधल्या माध्यमांनी प्रिन्स अँड्र्यू लंडनमध्येही जीन्स घालून फिरत असल्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.
जेफ्री एपस्टाईन यांच्याशी असणाऱ्या मैत्रीचं समर्थन
प्रिन्स अँड्र्यूंनी एपस्टाईन यांच्याशी असणाऱ्या मैत्रीचं नेहमीच समर्थन केलं आहे. पण बीबीसीला दिलेल्या मुलाखतीही त्यांनी एपस्टाईन यांच्याशी मैत्री होती या गोष्टीचा खेद नाही असं म्हटलं. "एपस्टाईन यांच्यामुळे मी जे शिकलो किंवा ज्या लोकांना भेटलो त्यांच्यामुळे मला खूप फायदा झाला."
 
2009 साली एपस्टाईन यांना सेक्स ऑफेंडर म्हणून घोषित केल्यानंतरही 2010 मध्ये त्यांच्या घरी मुक्काम का केला असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, "कारण, आपली मैत्री तुटली हे सांगायला!"
 
"एपस्टाईनला फोनवरून सांगणं मला शोभलं नसतं म्हणूनच मी त्यांना भेटायला गेलो."
 
'कुलगुरूपदावरून काढून टाका'
प्रिन्स अँड्र्यू सध्या हडर्सफिल्ड विद्यापीठात कुलगुरू आहेत. पण त्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी मात्र प्रिन्स अँड्र्यूंची त्या पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. विद्यार्थांचं प्रतिनिधित्व करण्यायोग्य ते नाहीत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
 
तिथली विद्यार्थीनी ट्रिस्टॅन स्मिथ हिने म्हटलं आहे की, "बीबीसीच्या मुलाखतीत प्रिन्स अँड्र्यू अगदीच अशोभनीय वागले आणि बोललेही."
 
विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेने प्रिन्स अँड्र्यू यांना पदावर काढून टाकण्याची मागणी करण्याचा आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव पास केला आहे.