शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 6 जून 2021 (20:11 IST)

कोरोना : 'व्हेंटिलेटर बंद करून मी कोरोना पेशंटला वेदनेतून मुक्त करते'

- स्वामिनाथन नटराजन
जगावर ओढावलेल्या कोरोना संकटानंतर व्हेंटिलेटर्सची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. व्हेंटिलेटर मिळालं तर जगण्याची उमेद आणि नाही मिळालं तर मृत्यू ठरलेला.
 
मात्र, व्हेंटिलेटर्स एखाद्या कोरोनाग्रस्त रुग्णाचे प्राण वाचवू शकतीलच, असं नाही. ज्या रुग्णांची परिस्थिती बरी होण्याच्या पलिकडे गेलेली असते, जे रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नाही, अशा रुग्णांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढून घेण्याचा कठोर निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागतोय. अगदी जगभरात हीच परिस्थिती आहे.
 
हुआनिता नित्तला सांगतात, "एखाद्याचं व्हेंटिलेटर काढणं भावनिकरीत्या खूप वेदनादायी निर्णय असतो. कधी-कधी तर मला वाटतं की एखाद्याच्या मृत्यूसाठी काहीअंशी मीच जबाबदार आहे."
 
हुआनिता नित्तला लंडनमधल्या रॉयल फ्री हॉस्पिटलमधल्या अतिदक्षता विभागातल्या (ICU) चीफ नर्स आहेत. मूळच्या दक्षिण भारतातल्या असलेल्या नित्तला गेल्या 16 वर्षांपासून इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्विसमध्ये (NHS) अतिदक्षता विभागात स्पेशलिस्ट नर्स म्हणून कार्यरत आहेत.
 
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "व्हेंटिलेटर बंद करणं माझ्या कामाचा भाग आहे."
 
शेवटची इच्छा
याविषयी बोलताना त्यांनी एक अनुभव सांगितला. कोव्हिड-19 मुळे त्यांच्या अतिदक्षता विभागात रुग्णांची संख्याही वाढली आहे आणि कामही खूप वाढलं आहे.
 
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात रोजच्यासारखं त्या मॉर्निंग शिफ्टला गेल्या. आयसीयूमध्ये येताच रजिस्ट्रारने त्यांना सांगितलं की एका कोव्हिड-19 पेशंटचं व्हेंटिलेटर काढायचं आहे.
 
ज्यांचं व्हेंटिलेटर काढायचं होतं त्या पन्नाशीतल्या एक कम्युनिटी हेल्थ नर्स होत्या. नित्तला यांनी त्यांच्या मुलीला फोन केला आणि पुढच्या सर्व प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.
 
त्या सांगतात, "मी तिला तिच्या आईची शेवटची इच्छा आणि काही धार्मिक विधींबाबत विचारलं आणि तिला याची खात्री दिली की मरताना तिच्या आईला त्रास झाला नाही. अत्यंत शांतपणे त्या मरणाला सामोरं गेल्या."
 
अतिदक्षता विभागात बेड जवळजवळ असतात. मृत्यूशय्येवर असणाऱ्या या रुग्णाच्या आजूबाजूलाही बरेच रुग्ण होते.
 
"तो 8 बेडचा अतिदक्षता विभागात होता. तिथल्या सर्वच रुग्णांची परिस्थिती गंभीर होती. मी बेडभोवती असणारे पडदे बंद केले आणि सर्व अलार्मही बंद केले."
 
अलार्म बंद होताच तिथे असणारा स्टाफही एका क्षणासाठी स्तब्ध झाला.
 
नित्तला सांगतात, "नर्स बोलता-बोलता अचानक गप्प झाल्या. रुग्णाची प्रतिष्ठा आणि त्याचा कम्फर्ट आमच्यासाठी सर्वोच्च असतं."
 
यानतंर नित्तला यांनी रुग्णाच्या मुलीला फोन केला आणि फोन रुग्णाच्या कानाजवळ ठेवला.
 
त्या सांगतात, "माझ्यासाठी तो एक साधा फोन कॉल होता. मात्र, त्या कुटुंबासाठी बरंच काही बदलणार होतं. कुटुंबीयांना व्हीडिओ कॉल करायचा होता. मात्र, आमच्या अतिदक्षता विभागात मोबाईल फोनला परवानगी नाही."
 
...आणि व्हेंटिलेटर बंद केलं
त्या आजारी नर्सच्या कुटुंबीयांच्या विनंतीनुसार नित्तला यांनी कॉम्प्युटरवरून एक म्युझिक व्हीडिओ त्यांना ऐकवला. त्यानंतर त्यांनी व्हेंटिलेटर बंद केलं.
 
त्या म्हणाल्या, "मी तिचा हात हातात घेतला आणि तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्याजवळच बसून होते."
 
व्हेंटिलेटर काढायचा की नाही, याचा निर्णय मेडिकल टीम घेते. रुग्णाचं वय, इतर आजार, उपचारांना प्रतिसाद या सर्व बाबी लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात.
 
नित्तला यांनी व्हेंटिलेटर बंद केल्यानंतर पाच मिनिटात त्या कम्युनिटी हेल्थ नर्सने जगाचा निरोप घेतला.
 
"मला मॉनिटरवर लाईट फ्लॅश होताना दिसला. हृदयाचे ठोके कमी होत होत शून्यावर पोहोचले. त्यानंतर स्क्रीनवर एक सरळ रेष होती," असं नित्तला सांगतात.
 
एकाकी मृत्यू
यानंतर नित्तला यांनी रुग्णाला औषधं देण्यासाठी लावलेल्या नळ्या काढल्या.
 
इकडे हे सगळं घडत असताना तिकडे फोनवर असलेली त्यांची मुलगी इकडे काय सुरू आहे, याबाबत अनभिज्ञ होती. ती आईला प्रार्थना म्हणून दाखवत होती. नित्तला यांनी जड अंतःकरणाने फोन उचलला आणि आता सर्व संपल्याचं सांगितलं.
 
नित्तला सांगतात रुग्ण गेल्यानंतरही आमचं काम संपत नाही.
 
त्या म्हणाल्या, "सहकाऱ्यांच्या मदतीने मी त्या नर्सला शेवटची आंघोळ घातली आणि तिला पांढऱ्या कापडात गुंडाळलं. मृतदेह ठेवतात ती बॅग बंद करण्याआधी मी तिच्या कपाळावर क्रॉस ठेवला."
 
कोरोनाची साथ येण्याआधी हॉस्पिटलमधल्या एखाद्या रुग्णाचा व्हेंटिलटर सपोर्ट काढायचा असेल तेव्हा रुग्णाचे नातेवाईक थेट डॉक्टरांशी चर्चा करू शकत होते.
 
लाईफ सपोर्ट काढण्याआधी जवळचे नातलग अतिदक्षता विभागात दाखल रुग्णाजवळ बसायचे. मात्र, आता जगभरात कुठेच असं होत नाही.
 
"एखाद्याला असं एकट्याने मरताना बघणं खूप वेदनादायी आहे." म्हणूनच मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या रुग्णाला नित्तला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा मृत्यू सुकर कसा होईल, याची काळजी घेतात. जवळचं कुणीही शेजारी नसतं तेव्हा त्या रुग्णाजवळ थांबून असतात.
 
नित्तला यांनी सांगितलं की व्हेंटिलेटर बंद केल्यानंतर अनेक रुग्ण श्वास घेण्यासाठी धडपडतात. त्यांची तडफड बघवत नाही.
 
बेड्सची कमतरता
कोरोनाचे रुग्ण वाढल्याने हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातल्या बेड्सची संख्या 34 वरून 60 करण्यात आली आहे. बेड्सची संख्या वाढली तरी सर्व बेड्स भरले आहेत.
 
अतिदक्षता विभागात थोड्याथोडक्या नाही तर तब्बल 175 नर्स आहेत.
 
नित्तला सांगतात, "सामान्यपणे आमच्या अतिदक्षता विभागात एका रुग्णामागे एक नर्स असं प्रमाण असतं. मात्र, सध्या तीन रुग्णांमागे एक नर्स आहे. परिस्थिती आणखी बिघडली तर सहा रुग्णांमागे एक नर्स असं प्रमाणही होऊ शकतं."
 
नित्तला यांच्या टीममधल्या काही नर्सनाही कोरोनाची लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे त्यांना आयसोलेट करण्यात आलेलं आहे. हॉस्पिटलकडून इतर नर्सेसना अतिदक्षता विभागाचं प्रशिक्षण देण्यात येतंय.
 
नित्तला यांनी सांगितलं, "शिफ्ट सुरू होण्याआधी आम्ही एकमेकींचा हात हातात घेऊन एकमेकींना 'स्टे सेफ' म्हणतो. आम्ही एकमेकींवर लक्ष ठेवून असतो. प्रत्येकीने ग्लोव, मास्क, प्रोटेक्टिव्ह गेअर योग्यपद्धतीने घातले आहेत की नाही, यावर लक्ष ठेवतो."
 
नित्तला यांच्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर्स, इन्फ्युजन पंम्प, ऑक्सिजन सिलेंडर आणि अनेक औषधांचा तुटवडा आहे. मात्र, संपूर्ण स्टाफसाठी पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स (PPE) पुरेसे आहेत.
 
नित्तला सांगतात त्यांच्या अतिदक्षता विभागात सध्या रोज एक रुग्ण दगावतो. जागतिक आरोग्य संकटापूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे.
 
'हे खूप भयंकर आहे'
 
त्या म्हणतात, "मलाही भीती वाटते. अनेकदा झोप येत नाही. वाईट स्वप्न पडतात. मलाही विषाणूची लागण होईल की काय, अशी भीती वाटत असते. प्रत्येक जणच घाबरलेला आहे. मात्र, हेड नर्स असल्यामुळे मला बरेचदा हे बोलता येत नाही."
 
गेल्यावर्षी टीबीमुळे नित्तला अनेक महिने रजेवर होत्या. टीबीमुळे नित्तला यांच्या फुफ्फुसांची क्षमता कमी झाली आहे. याची त्यांना पूर्ण कल्पना आहे.
 
नित्तला म्हणतात, "लोक मला सांगतात की मी हॉस्पिटलमध्ये जाऊ नये. काम करू नये. पण सध्या जगावरच आरोग्य संकट ओढावलं आहे. त्यामुळे मी इतर सर्वकाही बाजूला ठेवून कामाला प्राध्यान्य दिलं आहे."
 
"शिफ्ट संपते तेव्हा माझ्या देखरेखीखाली मृत्यू झालेल्या रुग्णांचा विचार माझ्या मनात येतो. मात्र, हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानतंर या गोष्टींचा विचार करायचा नाही, असा माझा प्रयत्न असतो," असं नित्तला सांगतात.