गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (12:19 IST)

आरोग्य: फक्त चिप्स, फ्रेंच फ्राईज खाणाऱ्या मुलाची दृष्टीच गेली

मिशेल रॉबर्ट्स
सातत्यानं जंक फूड खाणाऱ्या 17 वर्षीय मुलाची दृष्टी गेल्याची घटना इंग्लंडमधील ब्रिस्टलमध्ये घडली. या प्रकारानंतर असे पदार्थ सातत्यानं खाणाऱ्यांना आहारतज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिलाय.
 
सहाव्या वर्षापासून ते वयाच्या 17 व्या वर्षांपर्यंत म्हणजे 11 वर्षे हा मुलगा केवळ फ्रेंच फ्राईज, चिप्स, प्रिंगल्स आणि व्हाईट ब्रेडच खात होता. अधून मधून तो हॅम किंवा सॉसेस खात होता.
 
सातत्यानं चिप्स किंवा इतर जंक फूड्सवर अवलंबून राहिल्यानं या मुलाच्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाली.
 
नाव न जाहीर करण्याच्या अटीवर त्या मुलानं सांगितलं की थकवा आणि अस्वस्थ वाटत असल्यानं वयाच्या 14 व्या वर्षी तो डॉक्टरकडे गेला. त्याच्या शरीरारत बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला.
 
मात्र, त्यानं डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही तसेच जंक फूड खाणंही सोडलं नाही.
 
तीन वर्षांनंतर अंधुक दिसू लागल्यामुळे त्याला ब्रिस्टल आय हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.
 
या मुलावर उपचार करणाऱ्या डॉ. डेनाईज अॅटन यांनी सांगितलं की, "तो रोज जवळच्या दुकानातून चिप्स घेऊन खायचा. हाच त्याच्या रोजच्या आहाराचा भाग होता. नाश्त्यासाठी प्रिंगल्स चिप्स खायचा आणि कधी कधी व्हाईट ब्रेड, हॅमचे तुकडे सुद्धा खायचा. फळं किंवा भाज्या त्यानं खाल्ल्याच नाहीत."
 
"त्याला काही पदार्थांचा स्पर्श अजिबात आवडायचा नाही, त्यामुळे तो असे पदार्थ खायचा नाहीत. म्हणून चिप्ससारखे पदार्थच आपण खाऊ शकतो, असं त्याला वाटायचं."
 
डॉ. अॅटन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा या मुलाच्या जीवनसत्त्व पातळी तपासली आणि त्यांना असं आढळलं की, त्याच्यातील बी-12 जीवनसत्त्व प्रचंड कमी झालं होतं, तसंच कॉपर, सेलेनिअम आणि डी जीवनसत्वांचंही प्रमाण कमी झाल्याचं आढळलं.
 
तो मुलगा वजनानं कमी किंवा जास्त नव्हता, मात्र तरीही त्याच्या अशा खाण्यामुळं तो गंभीररीत्या कुपोषित होता.
 
हा एक प्रकारचा आजारच आहे. त्याला वैद्यकीय भाषेत 'अव्हॉईडन्ट-रिस्ट्रिक्टिव्ह फूड इनटेक डिसऑर्डर' असं म्हणतात.
 
"त्याच्या हाडांमधलं मिनरलचं प्रमाण कमी झालं त्यामुळे त्याची हाडं ठिसूळ झाली होती. त्याच्या वयाच्या मुलांसाठी हे फारच धक्कादायक होतं," असं डॉ. सांगतात.
 
उपचारादरम्यान त्याला जीवनसत्त्व मिळतील, असा आहार देण्यात आला. शिवाय, आहारतज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य टीमच्या देखरेखीखाली त्याला ठेवण्यात आलं. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
 
त्याची दृष्टी इतकी कमी झाली की, अखेर त्याची 'अंध' म्हणून नोंद करण्यात आली.
 
त्याच्या डोळ्यांमध्ये ब्लाईंड स्पॉट तयार झाले. म्हणजेच, त्याला वाचायला कठीण जाईल, टीव्ही पाहणं कठीण जाईल, एकूणच त्याला पाहण्यास अडथळे येतील.
 
अशा प्रकारच्या आजाराचं निदान योग्यवेळी झालं, तर उपचार करणं सोपं जातं. मात्र, जर याचं निदान होण्यास विलंब झाला तर डोळ्यांच्या नसांमधले तंतू नष्ट होऊन कायमची इजा होऊ शकते.
 
अशी प्रकरणं सहसा आढळत नाहीत, असं डॉ. अॅटन म्हणतात. पण आई-वडिलांनी खबरदारी घ्यायला हवी. चिप्ससारखे पदार्थ खाल्ल्यानं असे आजार होऊ शकतात. अशावेळी तज्ज्ञांचां सल्ला घ्यायला हवा, असं ते सांगतात.
 
जे मुलं सातत्यानं एकाच प्रकारचं अन्न खातात त्यांना दरवेळी नवे पदार्थ देऊन हे पदार्थ खाण्याची सवय लावावी असं डॉ. अॅटन सूचवतात.
 
जीवनसत्त्व देणाऱ्या गोळ्या खाणं हा उपाय असू शकतो, मात्र, आरोग्यदायी अन्नाला या गोळ्या पर्याय ठरू शकत नाहीत.
 
"आरोग्यदायी अन्न आणि पोषक अन्नातून जीवनसत्त्व मिळणं कधीही चांगलं. मात्र, अति प्रमाणात जीवनसत्त्वही हानिकारक असतात. उदाहरणार्थ अ जीवनसत्त्व. त्यामुळं जीवनसत्त्वांचं प्रमाणही अति व्हायला नको," असं त्या सांगतात.
 
डॉ. अॅटन म्हणतात, " जे शाकाहारी आणि त्यांना मांसाहारी लोकांच्या तुलनेत बी-12 जीवनसत्त्व कमी प्रमाणात मिळतं. ही कमतरता भरून काढण्यासाठी जर त्यांनी काही खाल्लं नाही, तर त्यांनाही दृष्टीहिनतेचा धोका निर्माण होऊ शकतो."
 
कडधान्य, सोयाबीनयुक्त पेय, यीस्ट अशांमधून शाकाहारी लोकांना बी12 जीवनसत्त्व मिळू शकतं.
 
ब्रिटिश डाएटेटिक असोसिएशनच्या प्रवक्त्या आणि प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रेबेका मॅकमॅनामोन म्हणतात,ठराविकच पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, इटिंग डिसऑर्डर, अॅलर्जी, आत्मकेंद्रीपणा.
 
लहान मूल पाच वर्षांचं होईपर्यंत त्याला एकापेक्षा अधिक जीवनसत्त्व मिळतील असं अन्न देण्याची शिफारस केली जाते.