सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (15:18 IST)

कराची: लग्नाच्या मांडवातच पहिल्या पत्नीकडून नवरदेवाला चोप

आपली दोन लग्नं झाली आहे, हे लपवणं नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आणि भर मंडपातच त्याला पहिल्या बायकोनेच चांगलाच चोप दिला. ही घटना आहे पाकिस्तानातल्या कराची शहरातली.
 
आसिफ रफिक सिद्दिकी असं या नवरदेवाचं नाव आहे. तिशीतल्या या तरुणाचं कराचीमधल्या एका हॉलमध्ये लग्न सुरू होतं. तेवढ्यात तिथे एक तरुणी आली आणि आपण त्याची पहिली पत्नी असल्याचं सांगत भांडायला सुरुवात केली. बघता बघता वरातीतल्या मंडळींनी नवरदेवाला धक्काबुक्की करायला सुरुवात केली. काही लोकांनी तर त्याला चांगलीच मारहाण केली. यात त्याचे कपडे फाटले, मारही लागला.
 
जीव वाचवण्यासाठी नवरदेव बसखाली गेला आणि इथे काही अनोळखी लोकांनी त्याला वाचवलं.
 
पाकिस्तानात बहुपत्नित्वाला मान्यता आहे. नियमानुसार पुरुषाला जास्तीत जास्त चार लग्न करता येतात. मात्र, यासाठी आधीच्या पत्नींची परवानगी बंधनकारक असते.
 
सिद्दिकीच्या प्रकरणात मात्र, त्याने तिसरं लग्न करण्याआधी आधीच्या दोन पत्नींची परवानगी घेतली नव्हती. इतकंच नाही तर सिद्दिकीची पहिली पत्नी जेव्हा हॉलमध्ये आली तेव्हाच नवरदेवाची याआधीही दोन लग्नं झाली आहेत, हे नवरी मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना कळलं.
 
या सर्व प्रकाराचा जो व्हिडिओ हाती आला आहे यात एक महिला एका तरुणीला काय झालं म्हणून विचारताना दिसते.
 
यावर मादिहा सिद्दिकी नावाची ही तरुणी म्हणते, "हा माझा नवरा आहे आणि हा या मुलाचा बाप आहे. मी तीन दिवसांसाठी हैदराबादला जातोय, असं त्याने मला सांगितलं होतं."
 
यानंतर काही जणांनी तिला खोलीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने इतरही काही नातलगांनाही ओळखलं.
 
ती म्हणाली, "या माझ्या सासू आहेत आणि या माझ्या जाऊ आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांची आई तीन दिवसांपासून आजारी आहे."
 
यानंतर संतापलेल्या मादिहाने नवीन नवरीकडे मोर्चा वळवला आणि तिला म्हणाली, "तुला माहिती नव्हतं का की हा माझा नवरा आहे? याने त्याच्या या निष्पाप मुलाचाही विचार केला नाही."
 
कराचीतल्या फेडरल उर्दू विद्यापीठात आपली आसिफ रफिक सिद्दिकीशी भेट झाली होती. तिथेच तो काम करायचा आणि त्यानंतर 2016 साली आम्ही लग्न केल्याचं मादिहाने सांगितलं.
 
यानंतर आसिफने 2018 साली जिना महिला विद्यापीठात शिक्षिका असलेल्या झेहरा अश्रफ या महिलेशी लग्न केल्याचंही तिचं म्हणणं आहे.
 
त्या लग्नाबद्दलही मादिहाला काहीच कल्पना नव्हती. एक दिवस मोबाईलवर आलेल्या एका मेसेजवरून तिला आसिफने दुसरं लग्न केल्याचा संशय आला.
 
तिने आसिफला विचारणा केली तेव्हा सुरुवातीला त्याने इन्कार केला. नंतर मात्र आपण दुसरं लग्न केल्याचं त्याने मान्य केलं.
 
मादिहाला आसिफ तिसरं लग्न करत असल्याची माहितीही त्याच्या दुसऱ्या पत्नीने दिली होती.
 
मादिहाने सर्व हकीकत सांगितल्यानंतर मुलीकडचे नातवाईक चिडले आणि त्यांनी आसिफला बेदम मारहाण केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
पोलिसांनी मध्यस्थी करत आसिफला चिडलेल्या नातलगांच्या तावडीतून सोडवलं आणि त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मात्र, संतप्त नातलग तिथेही पोचले आणि आसिफच्या बाहेर येण्याची वाट बघत बसले.
 
तो बाहेर येताच चिडलेल्या जमावाने त्याला पुन्हा मारायला सुरुवात केली. आसिफने तिथून पळ काढला आणि जवळच उभ्या असलेल्या बसखाली जाऊन बसला. याचा जो व्हिडिओ पुढे आला आहे त्यात चिडलेले लोक 'बाहेर निघ नाहीतर बस पेटवून टाकू' अशी धमकी देत असल्याचं ऐकू येतं.
 
घाबरलेला आसिफ बाहेर आला. परिस्थिती अधिक चिघळू नये, यासाठी तिथे उभ्या असलेल्या काही अनोळखी लोकांनी संतप्त नातेवाईकांपासून आसिफला वाचवलं.
 
बीबीसीने आसिफ आणि त्याच्या तिसऱ्या पत्नीच्या कुटुंबीयांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
 
दरम्यान या प्रकरणात अजूनतरी औपचारिक तक्रार नोंदवण्यात आली नसल्याची माहिती तैमुरिहा पोलीस ठाण्याचे प्रमुख राव नझिम यांनी बीबीसीला दिली.
 
ते म्हणाले, "हा कौटुंबिक वाद आहे आणि तो सोडवण्यासाठी तक्रारदारांना फॅमिली कोर्टात जावं लागेल."