शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 15 जानेवारी 2020 (17:40 IST)

योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचं खरं कारण वेगळंच?

अभिनेते आणि मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टचे संचालक योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. राहुल गांधींवर टीका केली म्हणून असं करण्यात आल्याच वृत्त वेगवेगळ्या ठिकाणी आलं आहे. पण प्रत्यक्षात कारण वेगळं असल्याचं सांगितलं जात आहे.
 
या प्रकरणावरून आता राजकारण सुरू झालं आहे. भाजपच्या आशिष शेलारांनी याबाबत सवाल उपस्थित केले आहेत. तर सोमण यांनी चौकशीनंतरच भूमिका मांडण्याचं सांगितलं आहे.
 
वादाचं खरं कारण काय?
योगेश सोमण यांच्याविरोधात मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी कलिना कॅम्पसमध्ये ठिय्या आंदोलनाला बसले होते. छात्र भारती संघटना, AISF चे कार्यकर्ते ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.
 
गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना शिकवायला प्राध्यापक नसल्यामुळे मुलांचं नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांवर एक विशिष्ट विचारधारा सोपवली जात आहे. हंगामी शिक्षकांबदद्ल विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सोमण यांची हकालपट्टी करावी, अशी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी होती.
 
मुंबई विद्यापीठ प्रशासनाशी वारंवार चर्चा करूनही कोणताच प्रश्न सुटला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
 
याविषयी बोलताना छात्र भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन बनसोडे म्हणाले, "योगेश सोमण यांची नियुक्ती होण्यासाठी विद्यापीठाने मुद्दाम नियम बदलले. ते संचालकपदी आल्यापासून त्यांनी विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान केलं आहे. त्यांना शिकवण्याचा काहीही अनुभव नाही. ते तिथे आल्यावर मंगेश बनसोड एकमेव कायम शिक्षक आहेत. बाकी सगळे पाहुणे शिक्षक आहेत. गेल्या सहा महिन्यापासून तिथे आंदोलन सुरू आहेत आणि विद्यार्थी प्रचंड अस्वस्थ होते. विद्यार्थ्यांन हरतऱ्हेने आंदोलन करूनही काहीही फरक पडला नाही. शेवटी मुलं वैतागली."
 
योगेश सोमण स्वत: काहीही शिकवायचे नाहीत. नाट्यशास्त्र शिकवायचा विषय नाही असं सांगून ते विद्यार्थ्यांना टोलवायचे. उलटपक्षी त्यांचा ड्रायव्हर नाटक बसवायचा, असा दावा बनसोडे यांनी केला आहे. अपूर्व इंगळे या विद्यार्थ्यानेही या आरोपाचा पुनरुच्चार केला.
 
विद्यार्थांनी अभ्यासक्रम आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायला गेलं की व्हॉट्स अप वर पाठवतो म्हणून भलावण केली जायची असा आरोपही त्यांनी केला आहे. NSD, ललित कला अकादमी या संस्थांबदद्लही त्यांनी अनेकदा विद्यार्थ्यांसमोर अपशब्द उच्चारल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
 
"विद्यार्थी परवा सकाळपासून आंदोलनाला बसले. सोमण संचालक नको ही त्यांची पहिली मागणी होती. विद्यार्थ्यांचं सहा महिन्याचं नुकसान भरून काढायला हवं ही दुसरी मागणी होती. योग्य शिक्षक नेमणं ही त्यांची तिसरी आणि सगळ्यांत महत्त्वाची मागणी होती. शेवटी आमदार कपिल पाटील यांनी सूत्रं हलवली सोमण यांच्यावरही कारवाई करण्यात आली," अशी माहिती बनसोडे यांनी दिली आहे.
 
विद्यापीठानेही यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. "विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनातील विविध शैक्षणिक बाबींची शहानिशा करण्यासाठी विद्यापीठामार्फत सत्यशोधन समितीचे गठण करण्यात येत असल्याने या समितीचे कामकाज पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संचालक श्री योगेश सोमण यांना रजेवर पाठविण्यात येत आहे. तसेच त्यांनी स्वत: रजेसाठी विद्यापीठाकडे अर्ज सादर केलेला आहे."
 
असं या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
राजकीय चिखलफेक
दरम्यान या प्रकरणामुळे राजकारण तापलं आहे. काही दिवसांपूर्वी मी माफी मागायला सावरकर नाही असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यावर टीका करणारा एक व्हीडिओ त्यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यात सोमण यांनी राहुल गांधी आणि इंदिरा गांधीवर टीका केली होती.
 
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले, "जी लोकं या पदासाठी लायक नाही त्यांना फक्त संघाची विचारधारा पुढे नेण्यासाठी महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केलं जातं. त्यांचा वापर संघाच्या विचारांचा प्रचारक म्हणून केला जातो. योगेश सोमण यांनी संघाचे स्वयंसेवक असल्याचं मान्य केलं आहे. ते राज्यशास्त्राचे विद्यार्थी असून त्यांना नाट्यशास्त्राचा काहीही अनुभव नाही. ते त्यांच्या पदामुळे राजकीय चर्चांमध्ये सहभागी होऊ शकत नाही. तरीही ते या चर्चामंध्ये सामील झाले आहेत."
 
भाजप नेते आशिष शेलार यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. "गेल्या महिन्याभरापासून मुंबई विद्यापीठात अभिनेते योगेश सोमण यांच्या बाबतीत जे घडते आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेणं या सगळ्या गोष्टी असहिष्णुतेत बसत नाहीत का?" असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. तसंच या प्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
 
राहुल गांधींविरोधात व्हीडिओ पोस्ट केला म्हणून सोमण यांना सुटीवर पाठवण्यात आलं अशा बातम्या अनेक प्रसारमाध्यमांमध्ये आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र या आंदोलनाचा राहुल गांधींच्या वादाशी संबंध नाही असं काही विद्यार्थ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलंय.
 
सोमण यांचं काय मत आहे?
याविषयी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने सोमण यांच्याशी संवाद साधला. तेव्हा सध्या त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे आणि चौकशी समिती नेमली जाणार आहे. त्यामुळे त्यांची भूमिका आधी ते समितीसमोर आणि नंतरच माध्यमांसमोर मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.