शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

लैंगिक छळवणूक: इराकमध्ये महिलांपेक्षा पुरुष पीडितांची संख्या जास्त?

अरब देशांमध्ये बीबीसीने केलेल्या एका सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व्हेत महिलांपेक्षा जास्त पुरुषांनी आपलं लैंगिक शोषण झालं असल्याचं सांगितलं आहे. खरंच असं काही आहे का?
 
या सर्व्हेत मध्यपूर्व तसंच उत्तर आफ्रिका, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवैत, लेबेनॉन, मोरक्को, सुदान, ट्युनिशिया, येमेन आणि पॅलिस्टाईन प्रांतातील 25 हजारांपेक्षा जास्त लोकांना काही प्रश्नं विचारले गेले.
 
समी (बदललेलं नाव) 13 वर्षांचा होता
 
तो शाळेतल्या बाथरूममध्ये होता जेव्हा 15 ते 17 वयोगटातली तीन मुलं त्याला कोपऱ्यात घेऊन गेली. ते समीच्या शरीराला जबरदस्ती हात लावू लागले आणि दाबू लागले. समीला या प्रकाराचा इतका धक्का बसला की क्षणभरासाठी त्यांचं संपूर्ण शरीर गोठून गेलं.
 
मोठ्या मुश्किलीने धैर्य एकवटून त्याने आरडाओरडा केला. हा आवाज जेव्हा इतर मुलांनी ऐकला तेव्हा त्यांनी याबद्दल मुख्याध्यापकांना सांगितलं. त्या मुलांना शाळेतून काढलं पण त्यांना का काढलं याचं कारण त्यांच्या पालकांना सांगितलं नाही.
 
समीलाही मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावलं गेलं, इथे त्याच्यावर जणूकाही दुसरा हल्ला झाला. त्याला सांगितलं की, जे झालं ते शाळेच्या दृष्टीने 'सहमतीने प्रस्थापित झालेले लैंगिक संबंध' होते. समीचं नशीब चांगलंय की त्याला त्याच्यावर हल्ला करणाऱ्या मुलांसारखं शाळेतून काढलं जात नाहीये. समीला अजून एक संधी देण्याचं शाळेने ठरवलं आहे.
 
"सगळ्यांना वाटत होतं की जे झालं ते माझ्या मर्जीने आणि आम्हाला असे लैंगिक संबंध प्रस्थापित करायचे होते म्हणून."
 
या लैंगिक शोषणाने आणि त्या दरम्यान झालेल्या हल्ल्याने समीला जबरदस्त धक्का बसला होता. त्याने आपल्या कुटुंबाला याबद्दल कधी काही सांगितलं नाही. तो कित्येक महिने कुणाशी नीट बोलू शकला नाही.
 
ही पहिली वेळ होती जेव्हा समीचं लैंगिक शोषण झालं होतं.
 
2007 साली समी 15 वर्षांचा होता. वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं.
 
घरातल्या एकमेव कमवत्या व्यक्तीचं निधन झाल्याने संपूर्ण परिवाराला अडचणींचा सामना करावा लागत होता.
 
इराकच्या बॅबिलॉन प्रांतात लहानाचा मोठा झालेल्या समीचं बालपण आनंदात गेलं होतं, पण वडिलांच्या अकाली निधनामुळे घर चालवायची जबाबदारी आता त्याच्या खांद्यावर आली होती. त्याने एका स्थानिक बाजारातल्या अका दुकानात नोकरी करायला सुरुवात केली.
 
इथेही त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. दुकानाचा मालक समीकडे जरा जास्तच लक्ष द्यायचा. ही गोष्ट समीला अस्वस्थ करायची.
 
एक दिवस समीला एकट्यात गाठून त्याने समीला किस करायचा प्रयत्न केला. या गोष्टीने घाबरून समीने जवळच ठेवलेला पाण्याचा जग मालकाच्या डोक्यात हाणला. त्या मालकाने स्थानिक लोकांना काय सांगितलं समीला माहीत नाही, पण त्यानंतर वर्षभर समीला नोकरी मिळाली नाही.
 
समी आता 16 वर्षांचा झाला होता.
 
त्याची आई आणि भाऊ बहीण कुठेतरी बाहेर गेले होते. त्यांचा कुणीतरी नातेवाईक भेटायला आला. घरात कुणी नाही हे पाहून समीजवळ जाऊन बसला, त्याचा फोन हिसकावून घेतला आणि त्याच्यासमोरच पॉर्न पाहू लागला.
 
मग अचानक त्या नातेवाईकाने समीला पकडलं, त्याला मारहाण केली आणि त्याच्यावर बलात्कार केला. समीसाठी तो खूप वेदनादायी अनुभव होता.
 
आजही त्याचा विचार केला तर समीला दुःस्वप्नं पडतात.
 
त्या घटनेनंतर वडिलोपार्जित घरात समीला राहणं अशक्य झालं. त्याने आपलं गाव सोडण्यासाठी आपल्या कुटुंबाची मनधरणी केली, शेजारी आणि मित्रांशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले.
 
समी आपल्या कुटुंबासकट बगदादला निघून गेला. तिथे सगळ्यांच्या हाताला काही ना काही काम मिळालं.
 
आपल्यावर झालेल्या बलात्कारामुळे मानसिकरीत्या समी खचला होता. आयुष्यात येऊ पाहणाऱ्या कोणत्याही नात्यापासून तो लांब पळू पाहायचा.
 
हळूहळू नव्या शहरात समीचा जम बसला. त्याने नव्या मित्रांशी दोस्ती केली. त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्यावरही विश्वास ठेवायला सुरुवात केली. या नव्या मित्रांशी साथसंगत लाभल्यानंतर समीने निर्णय घेतला की आपल्याबाबतीत जे घडलं ते आपल्या जवळच्यांना सांगून मन हलकं करावं.
 
आपल्या काही जवळच्या मित्रांना त्यांनी आपले अनुभव सांगितले. त्यांच्या मित्रांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या धक्कादायक होत्या.
 
समीला जे भोगावं लागलं ते सहन करणारा तो एकटाच नव्हता. त्यांच्या मित्रांमध्ये अनेक तरुण मुलं होती ज्यांनी सांगितलं की त्यांचंही तसंच लैंगिक शोषण झालं होतं.
 
सर्व्हेतून काय समोर आलं?
बीबीसीने 10 अरब देशांमध्ये तसंच पॅलेस्टाईन प्रांतात सर्व्हे केला, तेव्हा त्यातून दिसून आलं की यामधल्या दोन देशांमध्ये महिलांपेक्षा अधिक पुरुषांनी आपलं लैंगिक शोषण झाल्याचं सांगितलं.
 
ट्युनिशियामध्ये हे अंतर कमी होतं. आपलं लैंगिक शोषण झालं असे सांगणारे पुरुष महिलांपेक्षा एक टक्का जास्त होते. पण इराकमध्ये 33 टक्के महिलांनी सांगितलं की त्यांचं लैंगिक शोषण झालंय तर त्या तुलनेत 39 टक्के पुरुषांचं म्हणणं होतं की त्यांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लैंगिक शोषण सहन केलं आहे. अनेक पुरुषांनी आपल्याला घरगुती हिंसाचाराला तोंड द्यावं लागतं हेही सांगितलं.
 
हे आकडे आश्चर्यकारक आहेत, कारण महिला हक्कांच्या बाबतीत या देशाची वाईट परिस्थिती आहे. इराकी पीनल कोडच्या कलम 41 नुसार नवऱ्याने बायकोला मारहाण केली तर तो गुन्हा ठरत नाही.
 
पण सर्व्हे करणारं रिसर्च नेटवर्क, अरब बॅरोमीटरशी जोडलेल्या एक रिसर्च असोसिएट डॉक्टर कॅथरिन थॉमस म्हणतात, "आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये अनेकदा पीडित महिला गप्प बसणंच योग्य समजतात."
 
लैंगिक शोषणाचा मुद्दा संवेदनशील आहे, त्या मुद्द्यावर महिला सहसा मोकळेपणाने बोलत नाहीत, त्यांनी पुढे सांगितलं.
 
महिला अनेकदा आपल्या लैंगिक शोषणाविषयी सांगत नाहीत. त्या घाबरतात किंवा त्यांना वाटतं की या विषयावर बोललं तर त्याचे परिणाम वाईट होतील.
 
"पुरुषांच्या तुलनेत महिला कदाचित आपल्यासोबत होणाऱ्या लैंगिक शोषणाची तक्रार करत नसाव्यात," कॅथरिन सांगतात. ह्यूमन राईट वॉचच्या वरिष्ठ रिसर्चर बेल्किस विस यांनाही ही गोष्ट पटते.
 
"लैंगिक शोषण हा शब्दही अनेकदा पीडित महिलांनी ऐकलेला नसतो पण त्या हे सहन करत असतात आणि त्याविषयी वाच्यता करत नाहीत."
 
इराकच्या हॉस्पिटल्समध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. जर एखाद्या महिलेने लैंगिक शोषणाची किंवा अत्याचाराची तक्रार केली तर डॉक्टरांना सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगावं लागतं.
 
"म्हणूनच कदाचित महिला अनेकदा खोट बोलतात. कित्येकदा त्या आपल्यावर अत्याचार करणाऱ्याला वाचवायचा प्रयत्न करतात कारण अत्याचारी त्यांच्या परिचयाचा असतो. त्यांना वाटतं की तक्रार केली तर पोलिस तपास करतील, यातून पुढे आपल्यालाच त्रास होईल," बेल्किस सांगतात.
 
'न्याय मिळत नाही'
ह्यूमन राईट्स वॉच या मानवी हक्क संघटनेला इराकमध्ये गे पुरुष आणि ट्रान्स महिलांसोबत होणाऱ्या हिंसेबद्दल माहिती आहे, पण असे गुन्हे सहसा पोलीस दाखल करून घेत नाही.
 
इराकमध्ये समलैंगिक लोकांसाठी काम करणारी NGO इराक्वीरचे संस्थापक आमिर म्हणतात, "गे आणि ट्रान्स पुरुष सतत लैंगिक शोषणाचे बळी ठरतात. पण त्यांच्या शोषणकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल होत नाहीत, कारण इथली सामाजिक रचना पुरुषांच्या या गोष्टींबद्दल जाहीर बोलणं नाकारते. काही पीडित तक्रार दाखल करायला कचरतात कारण त्यांना भीती असते की असं केलं तर त्यांचं समलैंगिक असणं जगासमोर येईल. तसं झालं तर त्यांना अधिक भेदभाव आणि हिंसेचा सामना करावा लागेल."
 
समी सांगतो की कायदाही पुरुषांवर होणाऱ्या बलात्काराच्या विरोधात आहे. पण पोलीस आणि समाजही बलात्कार पीडित पुरुषांबद्दल संवेदनशीलता दाखवत नाही.
 
"जर कुणी पुरुष बलात्काराची तक्रार घेऊन पोलिसांकडे गेला तर पोलीसच त्यांच्या तोंडावर हसतात."
 
समीला अजूनही आठवतं की 13 वर्षांचं असताना त्याच्यासोबत जे झालं, त्यासाठी त्यालाच जबाबदार धरलं गेलं.
 
तो सांगतो, "जर मी माझ्या बलात्काराची तक्रार नोंदवायला गेलो असतो तर पोलिसांनी मला पीडित समजून न्याय द्यायचं सोडून मलाच जेलमध्ये टाकलं असतं. कारण त्यांनी असा समज करून घेतला असता की जे झालं ते माझ्या संमतीने, म्हणजेच मी समलैंगिक आहे, आणि समलैंगिकता कायद्याने गुन्हा आहे."
 
"कायदा माझ्या बाजूने आहे पण कायदा बनवणारे नाही."
 
इराकी पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितलं की, "आमची दारं सगळ्या नागरिकांसाठी खुली आहेत. पीडित व्यक्तीने जर लैंगिक शोषणाची तक्रार केली तर आरोपीला अटक केली जाते."
 
समी आता 21 वर्षांचा आहे. त्याचं आयुष्य आता बऱ्यापैकी सावरलंय. तो एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. त्याला बगदादमध्ये राहायला आवडतं. त्याला आता अनेक असे मित्र मिळालेत ज्यांना त्याच्या आयुष्यात काय घडलं ते माहितेय.
 
त्याला असं वाटतं की बीबीसीला आपली कहाणी सांगितल्यानंतर तो इतर अनेक पुरुषांना आपल्या आयुष्यात घडलेल्या अशा गोष्टींविषयी मौन सोडून मोकळेपणाने बोलायला प्रवृत्त करेल.
 
पण कोणाचाही भूतकाळ कायमचा विस्मरणात जात नाही. समीला अजूनही वाटतं की तो कोणासोबत नातं बनवू शकत नाही.
 
कदाचित त्याला एखाद्या दिवशी पार्टनर मिळेल. तो म्हणतो, "मी बदललो, तसा इराकमधला समाजही बदलला आहे. मी 35 वर्षांचा होईन तेव्हा कदाचित नात्याबद्दल विचार करेन."