गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

अंटार्क्टिकातून हजारो पेग्विंन नाहीसे, तापमान वाढीचा परिणाम?

- जोनाथन एमोस
एम्परर पेंग्विनच्या हजारो पिल्लांचा अंटार्क्टिकात मृत्यू झाला आहे. ते राहत असलेला हिमनग अत्यंत वाईट हवामानामुळे उद्धवस्त झाल्यामुळे असं झालं आहे. ही नैसर्गिक आपत्ती अंटार्क्टिक खंडाच्या वेडल समुद्रात 2016 साली आली होती.
 
संशोधकांच्या मते ब्रंट नावाच्या हिमखंडांच्या टोकावरचा एक हिमनग कोसळल्याने तिथल्या पिल्लांचा मृत्यू झाला. मोठ्या पेग्विंनांचं त्या पिल्लांकडे दुर्लक्ष झाल्याचंही त्यांना वाटतं. पण लक्ष देऊनही फायदा नव्हता, कारण ही नैसर्गिक आपत्ती येणार असा वयस्कर पेग्विंन्सला अंदाज होताच.
 
ब्रिटिश अंटार्क्टिका सर्व्हेच्या (BAS) टीमने याविषयी पहिल्यांदा शोधून काढलं. डॉ. पीटर फ्रेटवेल आणि डॉ फिल ट्रॅथन यांनी सगळ्यांत आधी हॅली बे कॉलनी म्हटली जाणारी पेंग्विनची वसाहत गायब झाल्याचं पाहिलं. उपग्रहानं काढलेल्या फोटोत त्यांना ही वसाहातच नाहीशी झाल्याचं दिसलं. अगदी 800 किलोमीटर अंतरावरूनही पांढऱ्या शुभ्र बर्फात प्राण्याच्या विष्ठेचा ठावठिकाणा लावणं शक्य आहे. याच्यावरून तिथे असणाऱ्या प्राण्याच्या संख्येचा अंदाज बांधता येतो. पण ब्रंट हिमखंडावरची पेंग्विनच्या नवीन जन्माला येणाऱ्या पिल्लांची संख्या, जी अनेक दशकं सरासरी वर्षाला 14,000 ते 25,000 होती ती एका रात्रीत नाहीशी झाली. ही संख्या, जगातल्या एकूण पेंग्विनच्या संख्येंच्या 5 ते 9 टक्के आहे.
 
एम्परर प्रजातीचे पेंग्विन हे सगळ्यांत उंच आणि सगळ्यांत वजनदार पेंग्विन आहेत. त्यांना प्रजननसाठी सागरी हिमनगाची गरज असते. हे हिमखंड एप्रिल, जेव्हा पेंग्विन या हिमखंडांवर प्रजननासाठी येतात तेव्हापासून ते डिसेंबर, जेव्हा त्यांची पिल्लांचे पंख पोहण्यालायक होतात, तोपर्यंत टिकले पाहिजेत. हे सागरी हिमनग जर लवकर तुटले किंवा वितळले, तर या पिल्लांचे पंख तयार नसतात त्यामुळे ते पोहू शकत नाहीत.
2016मध्ये बहुतेक असंच झालं असावं.
सोसाट्याच्या वाऱ्यांनी एम्परर पेंग्विनची पिल्ल असलेल्या हिमनगाला पोकळ केलं आणि मग हा हिमनग ब्रंट हिमखंडाच्या जास्त जाडीच्या बाजूला घासला गेला. त्यामुळे त्याला तडे गेले आणि ब्रंटच्या कोपऱ्यात असलेला हा हिमनग तुटून पडला. त्यानंतर हा हिमनग पुन्हा पुर्णपणे बनू शकलेला नाही. 2017 मध्येही नाही आणि 2018 मध्येही नाही.
 
"2016 नंतर बनलेला हा हिमनग तितका मजबूत नाही. पूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येणारी वादळं आता लवकर येतात. वातावरणाचं चक्र बदललं आहे. पूर्वी जे हिमनग किंवा हिमखंड स्थिर आणि विश्वासार्ह होते, त्यांचा आता काही भरोसा नाही," डॉ. फ्रेटवेल सांगतात.
 
BAS टीमच्या मते, तिथे पिल्लांना जन्म देणाऱ्या वयस्कर पेंग्विन्सनी नंतर एकतर पिल्लं जन्माला घातली नाहीत किंवा ते वेडल समुद्रात दुसऱ्या ठिकाणी प्रजनन करायला गेले. त्या ठिकाणहून 50 किमी लांब असणाऱ्या एका वसाहतीमध्ये पेंग्विन्सची संख्या अचानक वाढली आहे. ही वसाहत डॉसन-लॅब्टन हिमनदीजवळ आहे.
 
ब्रंट हिमखंडाच्या टोकावरचे काही हिमनग तुटून पडल्यानंतर पुन्हा का तयार होत नाहीयेत याबद्दल सध्या अस्पष्टता आहे. वातावरण बदलाचे स्पष्ट संकेत तर नाहीयेत. ब्रंटच्या आसपासच्या वातावरणाचा आणि महासागरीय बदलांचा अभ्यास केल्यानंतर असं काही आढळलेलं नाही. पण अशा प्रकारची वसाहत नाहीशी होणं ही गंभीर बाब आहे. यावरून लक्षात येतं की भविष्यात होणाऱ्या तापमान वाढीचा परिणाम एम्परर पेंग्विन्सवर होणार हे नक्की, असं या टीमचं म्हणणं आहे.
 
अभ्यासकांच्या मते, सागरी हिमखंडांच्या बाबतीत असेच बदल होत राहिले, तर या शतकाच्या शेवटापर्यंत एम्परर पेंग्विनची जवळपास 50 ते 70 टक्के लोकसंख्या नष्ट होईल. न्यूझिलंडच्या कॅन्टनबरी युनिर्व्हसिटीत जीवशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. मिशेल लारू म्हणतात की, याचे परिणाम फक्त एम्परर पेंग्विन नाही, तर अनेक गोष्टींवर होतील. "अन्नसाखळीतला ते मोठा दुवा आहेत. ते मध्यम आकाराचे मांसाहारी प्राणी आहेत. ते लेपर्ड सील प्राण्यांसाठी भक्ष्य आहेत तर मासे आणि क्रिलसारख्या प्राण्यांचे भक्षक," त्यांनी बीबीसीला सांगितलं.
 
डॉ थ्रॅटन म्हणतात, "पेंग्विन्सच्या प्रजननात घोटाळे होणं किंवा त्यांच्या प्रजननाची ठिकाणं बदलणं याचं मला आश्चर्य वाटत नाही. हे होतंच. पण त्याहीपेक्षा जास्त इंटरेस्टिंग हे आहे की वेडल समुद्रात अशी काही ठिकाणं तयार होत आहेत जिथे वातावरण बदलाचा फटका बसलेले सागरी प्राणी आश्रय घेऊ शकतात." आणि जर अशा आश्रयाच्या ठिकाणीपण जर काही प्रश्न निर्माण झाले, जे गेल्या 60 वर्षांत निर्माण झालेले नाहीत, तर हा एक महत्त्वाचा संकेत आहे असंही ते म्हणतात. हॅली बे कॉलनीला खरंच काही भविष्य होतं की नाही, हा वादाचा मुद्दा आहे. ब्रंट हिमखंडच त्याला तडे गेल्यामुळे दोन तुकडे होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात त्याचे दोन तुकडे होणारच. त्यामुळे 2016 मध्ये जे घडलं ते जरी घडलं नसतं ,तरी हॅली बे कॉलनी नष्ट होणारच होती.