1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (16:51 IST)

जावेद अख्तर RSS आणि तालिबानवर असं काय म्हणाले, ज्यानं इतका वादा झालाय?

प्रसिद्ध गीतकार आणि राज्यसभेचे माजी खासदार जावेद अख्तर यांनी टीव्ही वाहिनीच्या एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.
 
शुक्रवारी (3 सप्टेंबर) एनडीटीव्हीवरील एका कार्यक्रमात बोलताना जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी संघटनेची तुलना तालिबानशी केली होती.
 
भाजपच्या नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केला असून जावेद अख्तर यांनी हात जोडून माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
 
"जावेद अख्तर जोपर्यंत संघ आणि विश्व हिंदु परिषदेच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांची हात जोडून माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा चित्रपट चालू देणार नाही," असं राम कदम यांनी ट्विटरवर एका वक्तव्यात म्हटलं.
 
''संघ परिवाराशी संलग्न असलेले लोक आज या देशातलं राजकारण चालवत आहेत, राजधर्माचं पालन करत आहेत. असं वक्तव्य करण्यापूर्वी किमान याचा तरी विचार करायला हवा होता. जर तालिबानची विचारसरणी असती तर त्यांना अशा प्रकारची वक्तव्य करणं शक्य झालं असतं का? यावरुनच त्यांचं विधान किती पोकळ आहे, हे स्पष्ट होतं," असं कदम म्हणाले.
 
राम कदम महाराष्ट्र विधानसभेचे घाटकोपर मतदारसंघातील आमदार आहेत. जावेद अख्तर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
 
दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपचे कायदेशीर सल्लागार असल्याचं सांगणारे आशुतोष दुबे यांनी मुंबई पोलिसांत जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. आरएसएसची तालिबानशी तुलना केल्याप्रकरणी जावेद अख्तर यांच्या विरोधातपोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली.
 
काय म्हणाले होते जावेद अख्तर?
राज्यसभेचे खासदार जावेद अख्तर शुक्रवारी (3 सप्टेंबर) एनडीटीव्हीच्या एका शोमध्ये सहभागी झाले होते.
 
''ज्या पद्धतीनं तालिबानला मुस्लीम राष्ट्र हवं आहे, त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्र असावं असं वाटणारेही लोक आहेत. हे सगळे लोक सारख्याच विचारसरणीचे आहेत. मग ते मुस्लीम असो, ख्रिश्चन असो, यहुदी असो वा हिंदु असो,'' असं ते शोमध्ये म्हणाले होते.
 
'तालिबान अधिक क्रूर आहे आणि त्यांची कृत्यं निंदनीय आहेत, हे स्पष्टच आहे. पण जे आरएसएस, बजरंग दल आणि व्हीएचपी सारख्या संघटनांचं समर्थन करतात, ते सगळे सारखेच आहेत.'
 
भारतीय लोकांच्या वैचारिक क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे. भारतात राहणारे बहुतांश लोक हे सहिष्णू आहेत आणि त्याचा सन्मान करायला हवा. भारत कधीही तालिबानी राष्ट्र बनणार नाही, असंही अख्तर या कार्यक्रमात म्हणाले होते.