गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (17:51 IST)

शरजील उस्मानी कोण आहे? एल्गार परिषदेनंही त्याचा निषेध का केला आहे?

हिंदू विरोधी वक्तव्य केल्याच्या आरोपावरून अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याच्याविरोधात पुण्याच्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
30 जानेवारी रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच इतं एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत वक्ता म्हणून शरजील याला आमंत्रित करण्यात आलं होतं.
 
"आजचा हिंदू समाज सडलेला आहे, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे," असं वक्तव्य शरजीलने आपल्या भाषणात केलं होतं. या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. आता शरजीलच्या अटकेची मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे.
 
कोण आहे शरजील उस्मानी?

एल्गार परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आलेला 24 वर्षीय शरजील उस्मानी हा अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी नेता आहे. सीएए आणि एनआरसी या कायद्यांविरोधात केलेल्या आंदोलनासाठी तो ओळखला जातो.
 
15 डिसेंबर 2019 रोजी अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये सीएए-एनआरसी या कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावेळी झालेल्या संघर्षामध्ये त्याचा सहभाग असल्याच्या आरोपांवरून त्याला उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सध्या तो जामीनावर बाहेर आहे.
 
सीएए-एनआरसी या कायद्यांविरोधात केलेल्या आंदोलनाबाबत बोलण्यासाठी शरजीलला एल्गार परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं.
 
शरजीलच्या वक्तव्याच्या विरोधात भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अॅड. प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीवरून स्वारगेट पोलिसांनी मंगळवारी रात्री आयपीसी सेक्शन 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
एल्गार परिषदेकडूनही निषेध

"शरजीलने 'हिंदू' शब्द न वापरता ब्राह्मणवाद किंवा मनुवाद हा शब्द वापरायला हवा होता. शरजीलच्या वक्तव्याचा मी निषेध करतो" अशी प्रतिक्रीया एल्गार परिषदेचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी बीबीसी मराठीला दिली.
 
"एल्गार परिषदेची लढाई मनुवाद आणि मनुवादीं विरोधात आहे. ज्यांना हिंदूंचा कळवळा योतो त्यांनी प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले, विवेकानंद वाचायला हवेत. ब्राह्मणवादी जेव्हा हिंदू धर्म धोक्यात आहे,असं म्हणतात तेव्हा ब्राम्हणवाद धोक्यात असतो. आमची परिषद हिंदूंच्या विरोधात नाही तर मनुवाद्यांच्या विरोधात, नव्या पेशवाईच्या विरोधात आहे. हिंदू धर्मावर माझ्याशी शंकराचार्यांनी चर्चा करावी," असं कोळसे पाटील पुढे म्हणाले.
 
"उत्तर प्रदेशातील लोकांना फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांची चळवळ माहिती नाही म्हणून ते 'हिंदू' शब्द वापरतात. एल्गार परिषदेचं वाकडं करू शकत नाही म्हणून शरजीलने चुकून वापरलेल्या 'हिंदू' शब्दाला घेऊन मला आणि एल्गार परिषदेला बदनाम करण्याची ही मोहीम आहे," असा आरोपसुद्धा कोळसे पाटील यांनी केला आहे.
 
शरजीलवर कारवाईची मागणी

"एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन राज्य सरकारने कठोर कारवाई करावी," अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
 
शरजील याच्या या विधानाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, 'अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारं, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधानं केली आहेत.'
 
'एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे,' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
एल्गार परिषदेच्या माध्यमातून आधी काय झालं, याची जाणीव असताना अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणं किती चूक होतं हेच शरजीलच्या विधानांतून दिसून येत असल्याचंही फडणवीस यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.
 
भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी देखील शरजीलवर कारवाईची मागणी केली होती. तसंच शरजीलला लवकरात लवकर अटक करण्यात यावी या मागणीसाठी पुण्यातील भाजपाचे पदाधिकारी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेणार आहेत.
 
भाषणाची तपासणी करु - अनिल देशमुख

'एल्गार परिषदेतील भाषणांमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली आहेत का,' याची तपासणी करु अशी प्रतिक्रीया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली आहे.
 
तर 'एल्गार परिषदेतील वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करायलाच हवी. भावना दुखावणाऱ्या वक्तव्याला माफी नाही' असं ट्वीट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील केलं आहे.
साभार फेसबुक