मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019 (10:49 IST)

राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नाहीत का?

5 ऑक्टोबर 2019. शनिवारची संध्याकाळ. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवर गेल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या. पण याबाबत कुठलीच ठोस माहिती मिळत नसल्याने दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली.
 
सालाबादप्रमाणे राहुल गांधी बँकॉकला सुट्टीवर गेल्याची शक्यता असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसला चिमटा काढताना ट्विटरवर बँकॉक का ट्रेंड होत आहे? असा प्रश्न विचारणारं ट्विट केलं.
 
भाजपच्या या ट्वीटला काँग्रेसनं तब्बल 12 तासानंतर ट्वीट करून करून स्पष्टीकरण दिलं.
काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी रविवारी सकाळी 11 वाजून 17 मिनिटांनी ट्विट करून सांगितलं, "कोणाच्याही वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्याची सरमिसळ करता कामा नये. प्रत्येकाचं खासगी आयुष्य आणि स्वातंत्र्य यांची जाणीव आपल्याला असायला हवी. हीच तर पुरोगामी आणि उदारमतवादी लोकशाहीची मूलभूत ओळख आहे."
 
सिंघवी यांनी हे ट्वीट करताना राहुल गांधी आणि बँकॉक असे दोन हॅशटॅग वापरले. त्यामुळे राहुल गांधी बँकॉकला गेले असल्याच्या वृत्ताला पुष्टीच मिळाली असल्याचं बोललं गेलं.
 
राहुल गांधींचा अज्ञातवास नवा नाही
राहुल गांधींचं असं अचानक परदेशदौऱ्यावर जाणं हे नवं नाही. यापूर्वीही 2015, 2016 तसंच 2018 मध्येही राहुल गांधी अचानक परदेशी निघून गेले होते. ते जिथं जातात त्या ठिकाणांची माहिती देत नसल्यामुळे त्यांच्यावर टीकाही झालेली आहे.
 
राहुल गांधी यांनी जावं किंवा जाऊ नये, त्यांनी इतरांना या ठिकाणांची माहिती द्यावी किंवा नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या खासगी आयुष्यात कुणी डोकावण्याची गरजही नाही. पण राहुल गांधींचे इतर दौरे आणि या दौऱ्यामध्ये खूप मोठा फरक आहे.
 
सध्या महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात 288 जागांसाठी तर हरियाणाच्या 90 जागांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होईल. तर 24 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल हाती येईल.
 
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित करण्यात येत आहेत. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात 9, पक्षाध्यक्ष अमित शहा 18 आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल 100 प्रचारसभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
 
तसंच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही आपापल्या परीने प्रचारसभांचं नियोजन सुरू केलं आहे. पण या सगळ्या चित्रात काँग्रेसची भूमिका काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
मतदानाला दोन आठवडे उरलेले असताना काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वाचं असं परदेशी जाणं पक्षाला कितपत परवडेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीनंतर देशात होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभेत दारूण पराभवाला सामोरे गेल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे राहुल गांधी या निवडणुकीत प्रचार करणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
"नाराजीची किनार"
राहुल गांधी यांच्या जाण्याला नाराजीची किनार असू शकते, असं दिल्लीतील बिझनेस स्टँडर्डच्या राजकीय संपादक आदिती फडणीस यांना वाटतं.
 
त्या सांगतात, "हरियाणाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांनी नुकताच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. तर मुंबईचे माजी शहर अध्यक्ष संजय निरूपम यांनीही पक्षाच्या कार्यपद्धतीवर सडेतोड टीका केली."
 
"राहुल गांधींनी निवडलेल्या नेत्यांकडे दुर्लक्ष"
फडणीस सांगतात, "राहुल गांधींनी निवडलेल्या नेत्यांकडे सध्याच्या नेतृत्वाने दुर्लक्ष केल्याचं चित्र निर्माण झालं आहे. काँग्रेसमधली गटबाजी वारंवार समोर आली आहे. त्यामुळे पक्षावर वरिष्ठ पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत याचा परिणाम दिसून येईल."
 
"राहुल गांधी कुठे गेले, का गेले हे महत्त्वाचं नाही. पण लोक त्यांच्याकडे पाहून तुम्ही आमचे सर्वेसर्वा होता, तुम्ही आमचे मायबाप होता, असं म्हणत होते. पण त्यांनी त्यांच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. पक्ष बिकट परिस्थितीत असताना त्यांनी निघून जाणं म्हणजे त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही का, अशी शंका निर्माण होतं."
 
आदिती फडणीस सांगतात, "सुरूवातीला राहुल गांधींनी राजीनामा दिला. तो मागे घेणार नाही म्हणून सांगितलं. प्रियांका गांधी तसंच सोनिया गांधींनाही हे पद देऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं. तरीही सोनिया गांधींनाच हंगामी अध्यक्ष नेमण्यात आलं. तिकीटवाटपामध्ये त्यांची भूमिका दिसून आली नाही. यामुळेच संजय निरूपम यांच्यासारखे नेते नाराज दिसून आले."
 
"पक्ष पुन्हा सोनिया गांधी आणि त्यांच्या अवतीभोवतीच्या नेत्यांकडे गेला आहे. हरियाणात शैलजा यांच्यासारख्या लोकांचं फारसं पाठबळ नसणाऱ्या नेत्याकडे नेतृत्व सोपविण्यात आली आहे. या सगळ्याचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येईल."
 
"माध्यमांनी गैरसमज पसरवले"
माध्यमांमध्ये राहुल गांधींच्या सुट्टीचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने रंगवण्यात येत असल्याचं मत काँग्रेस नेते राजीव सातव यांनी व्यक्त केलं. "राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी नाहीत, ते कोणत्याही प्रकारे नाराज नाहीत. महाराष्ट्राच्या तिकीटवाटपात त्यांचीही भूमिका होती. तरीसुद्धा त्यांच्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत," असं सातव यांनी म्हटलं.
 
पुढच्या आठवड्यात नियोजन
राजीव सातव पुढे सांगतात, "काँग्रेस पक्षाच्या तुलनेत भाजपमधल्या नाराज नेत्यांची संख्या कित्येक पटींनी जास्त आहे. भाजपमध्ये केंद्रात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांच्यासारखे ज्येष्ठ तसंच महाराष्ट्रात खडसे, तावडे, बावनकुळे यांच्यासारखे अनेक प्रमुख नेते नाराज आहेत. ते स्वतः आपण नाराज नाही म्हणत असले तरी ही नाराजी जाणवते. पण माध्यमांनी त्यांच्याकडे लक्ष वेधलं नाही. फक्त काँग्रेसमधली नाराजी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येते. हे चुकीचं असून असं करणं थांबवावं."
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा शेवटच्या टप्प्यातच प्रचारासाठी येणार आहेत. पण हे कुणाच्या लक्षात येत नाही. राहुल गांधी पुढच्या आठवड्यापासून प्रचाराला येणार आहेत. त्यांच्या प्रचाराचं वेळापत्रक योग्य पद्धतीने नियोजित करण्यात येईल," असं सातव यांनी सांगितलं.