सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : मंगळवार, 26 जून 2018 (09:03 IST)

सांस्कृतिक भारत : त्रिपुरा

त्रिपुराचे भौगोलिक क्षेत्रफळ 10,496 चौरस किमी असून राजधानी अगरतळा हे शहर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 3,671,032 इतकी आहे. त्रिपुराच्या प्रमुख भाषा बंगाली व कोकबराक या आहेत. उत्तरपूर्व राज्य म्हणून या राज्याची ओळख आहे. 21 जानेवारी 1972 ला या राज्याची स्थापना झाली. त्रिपुराचा संस्कृत अर्थ तीन शहरे असा होतो. राज्याची साक्षरता 87.75 टक्के इतकी आहे. राज्यात चार जिल्हे समाविष्ट आहेत. 
 
त्रिपुराचा इतिहास मुस्लीम इतिहासकारांनी व ‘राजमाला’ इतिहासकाराने लिहून ठेवलेला आहे. महाभारत व पुराणातही त्रिपुराचे संदर्भ सापडतात. चौदाव्या शतकात बंगालचा राजा त्रिपुरा राज्याच्या मदतीला धावून गेला होता. त्रिपुराला बऱ्याच वेळा मोगल आक्रमणाला तोंड द्यावे लागले. बऱ्याच युद्धात त्यांनी बंगालच्या मुस्लीम सुलतानाला हरविले होत. एकोणिसाव्या शतकात महाराजा बिरचंद्र किशोर मानिक्य बहाद्दूरने ब्रिटीश राजवटीच्याच प्रणालीनुसार आपले राज्यशासन व धोरण आखले. त्यांच्या वारश्यांनी सुद्धा 15 ऑक्टोबर 1949 पर्यंत राज्य केले व शेवटी केंद्र शासनात विलीन केले. त्रिपुरा 1956 मध्ये केंद्र शासित राज्य म्हणून घोषित झाले. 1972 मध्ये त्रिपुराला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. त्रिपुरा म्यानमार व बांगला देश या देशातील नद्यांच्या खोऱ्यात वसलेले आहे. पूर्वोत्तर राज्यात ते आसाम व मिझोरामला जोडलेले आहे. 
 
उदयपूर ही प्राचीन राजधानी, उज्जयंता पॅलेस, जगन्नाथचे देऊळ, लक्ष्मी नारायणाचे उमा माहेश्वरी देऊळ, बेजूबन बिहार, अजब बंगला, रविंद्र कानन (सर्व आगरतळातील) चौदा देवींचे आगरताळामधील देऊळ, ब्रम्हकुंड, कमलासागर, शिपाहीजला अभयारण्य, निरमहाल, मेलाघर मधील तृष्णा अभयारण्य पिलका डेटामूरा, तिर्थमुख, मंदिरघाट, डुंबर तलाव, पिलक येथील प्राचीन बौद्ध अवशेष, राधाकिशोरपूर, नारळाची झाडे, डुंबर तलावाचे डोंगर, जामपुरी टेकड्या, नरसिंगगड, उनाकोटी, जम्पुई हिल, मेलाघर, कैलाशहर, धर्मनगर, कुंजबन, कुमारघाट, सिपाहीजल इत्यादी स्थळे - दृश्य पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव देणारे आहेत. दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात देशी व परदेशी पर्यटक त्रिपुरा राज्याला भेटी देत असतात.
 
त्रिपुराच्या प्रमुख भाषा बंगाली व कोकबराक या असल्यात तरी त्रिपुरात अनेक घटक बोली बोलल्या जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे सांगता येतील : 
 
भाषा व ती कोण बोलतं पुढीलप्रमाणे – 
 
भिल्ली- भिल; गारो – गारो; हलम- हलम-कैपेंग, मोलसोम; खारिया -खारिया; खासी- खासी; लुशाइ - मिझो-लुशाइ; माग/माघ/मोघ - माग/माघ; मुंडा – मुंडा; मिझो - मिझो-राल्ते; संताली – संताल.
 
या व्यतिरिक्‍त भील, भूतिया, चैमल, चकमा, गारो, हलाम, जामटीया, खासीया, कुकी, हजांगो आदी आदिवासी त्रिपुरात वास्तव्य करतात.
 
गोरीया नृत्य, हुक कैमानी नृत्य, लेबांग बुमानी नृत्य, होजागिरी नृत्य, बांबू नृत्य आदी लोकनृत्य प्रकार त्रिपुरात पहायला मिळतात. गोरीया नृत्य हे एप्रिलच्या मध्यात होत असून यात देवाची प्रार्थना असते. हे नृत्य सात दिवस सुरू असते. यात नाच आणि गाणे असे दोन्ही प्रकार समाविष्ट असतात. होजागिरी नृत्य हे रीयांग आदिवासी लोकांच्या महिलांचे नृत्य असते. शरीराचा खालचा अर्धा भाग विशिष्ट हालचाल करत संथपणे नाच केला जातो. हे नृत्य करताना डोक्यावर बाटल्या किवा दिवे घेतले जातात. आणि हे दिवे डोक्यावर प्रकाशित असतात. दिव्यांचा डोक्यावर तोल सांभाळत हे नृत्य केले जाते.
 
त्रिपुराचे लोक आपले लोकवाद्य बांबू, लाकूड आणि प्राण्यांच्या कातड्यापासून बनवतात. लोकवाद्यांवर त्यांचे खूप प्रेम असते. अशी अनेक वाद्य ती स्थानिक सापडणाऱ्या वस्तूंपासून बनवतात. सुमुई हे असेच एक लोकवाद्य आहे. ते बांबूपासून बनवतात आणि त्याला सात छिद्रे पाडतात. आपल्याकडच्या बासरी सारखेच हे वाद्य असते. हे वाद्य तोंडाने वाजवतात. सारींदा, दांगडो, डांगडो, खाम (ढोल), लेबांग- लेबांगटी, उआखरप अशा नावाचे काही लोकवाद्य त्रिपुरात पहायला मिळतात.
 
तिर्थमुखला आणि उनाकोटी येथील मकर संक्रांत, होली उत्सव, उनाकोटीची अशोक अष्टमी, ब्रम्हपूरचा सण, मोहनपूरचा राश सण, बोटेरस, मंसामंगल सण, केर व खुर्ची सण, सरद सण, जामपूरीतील ख्रिसमस, बुद्धपौर्णिमा सुद्धा साजरी करण्यात येते.
 
त्रिपुरा हे भारतातले लहान राज्य आहे. यात अनेक हिंदू आदिवासी राहतात. इथले उत्सव पाहण्यासारखे असतात. खारची नावाचा त्रिपुरातला लोकप्रिय उत्सव जवळजवळ संपूर्ण आठवडाभर साजरा केला जातो. या उत्सव पूजेमागे खूप दंतकथा सांगितल्या जातात.
 
केर उत्सव हा खारची पूजा नंतर पंधरा दिवसांनी पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधव साजरा करतात. केर म्हणजे विशिष्ट परिसराची सीमा. या परिसरातील देवतांची पूजा करण्याची पद्धत म्हणजे हा उत्सव. या पूजेसाठी बांबूच्या कामट्या वापरल्या जातात. गरीया पूजा नावाचा सण एप्रिल महिण्यात साजरा करण्यात येतो. लहान मुले आणि तरूण ढोल बडवत, तोंडाने गाणे गात व नाचत गरीया देवाची प्रार्थना करतात. बांबूंना फुलांनी सजवून ते उभे करून त्याला गरीया देवाची प्रतिमा समजून त्यांची पूजा केली जाते.
 
धालाइ, फेनी, गोमती, खोबाई हाओरा, जुरी, कहोवाइ, लोंगाइ, मनू, मुहुरी, सुमली या नद्या त्रिपुरातून वाहतात तर डोंगराच्या त्रिपुरा रांगांचा पर्वत लक्ष वेधून घेतो. 
 
- डॉ.सुधीर राजाराम देवरे