मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (12:59 IST)

शिवभारत अध्याय सव्विसावा

कवींद्र म्हणाला :-
लोक घाबरून गेले, व्यापारी पळालेव ( गळाले ), सासवड लुटलें गेलें, सुप्यास वेढा पडला, पुण्यावर हल्ला झाला, इंदापूर काबीज केलें गेलें, चाकण चौर्‍यांशींचा प्रदेश शत्रुसेनासमूहाच्या बहुतेक घशांत गेला, पुत्र शिवराय समृद्ध व अत्यंत क्रुद्ध होत्साता पन्हाळगडावर जोहराशीं तेथेंच लढत होता - अशा वेळीं जाधवरावाची मुलगी, शहाजीची धर्मनिष्ठ पत्नी ( जिजाबाई ) हिच्या ठिकाणीं वीररसाचा संचार होऊन ती युधाची भाषा बोलूं लागली. ॥१॥२॥३॥४॥
राजगडावर राहणारी ती शिवाजीची माता आपल्या गडांच्या रक्षणाच्या कामीं दक्ष झाली. ॥५॥
नंतर सदाचारी - सेनापति नेताजी, बरोबर पुष्कळ सैन्य घेऊन सगळें शाहपूर जाळून, शत्रूस पळवून लावून शिवाजीचा निरोप प्रसादाप्रमाणें ऐकून हिलालासह शिवपट्टणास आला. ॥६॥७॥
नंतर प्रेमळ, पुत्रदर्शनासाठीं दीर्घकाल उत्सुक, पन्हाळगडास स्वतःच जाण्यास सिद्ध झालेली, क्रोधाविष्ट झालेली, स्वतःच्या मोठ्या सैन्यानें युक्त अशी जी त्या शहाजीराजाची राणी तिला त्या ( नेताजी ) नें राजगडावर पाहिलें. ॥८॥९॥
जणूं काय अपराध्याप्रमाणें पदोपदीं अतिशय भीत भीत त्यानें हिलालासह त्या धर्मनिष्ठ राणीस प्रणाम केला. ॥१०॥
त्या दोघांस हात जोडून प्रणाम करतांना पाहून ती महाभाग्यशाली मृदु व गंभीर वाणीनें बोलली :- ॥११॥
राजमाता म्हणाली :-
युद्धोत्साह धारण करणारा तो माझा बाह्य प्रान ( प्राणाप्रमाणें प्रिय पुत्र ) पन्हाळगडावर शत्रूंनीं चोहोंकडून वेढला आहे. ॥१२॥
तेथें त्या धन्यास सोडून व सगळी लाज गुंडाळून ठेवून तुम्ही दोघेहि शत्रूच्या भीतीनें परतलांत हें आश्चर्य होय ! ॥१३॥
त्या माझ्या एकुलत्या पुत्रास स्वतः सोडविण्याचा मी स्वतः प्रयत्न करीन आणि जोहराचें मुंडकें आज युद्धांतून घेऊन येईन. ॥१४॥
ज्याच्यावांचून ही दिशा ( हा देश ) मला मोठ्या अरण्याप्रमाणें शून्य दिसत आहे त्या सिंहाप्रमाणें पराक्रमी बाळास मी लागलीच आणीन. ॥१५॥
विष्णूचा अवतार ( अंश ) असा तो माझा एकुलता पुत्र जर मला क्षणभर दिसणार नाहीं तर मी प्राण सोडीन. ॥१६॥
तुम्हीं इकडे एकत्र मिळून शत्रूंशीं झुंजा. मी स्वतः त्या शत्रु जोहराशीं लढत्यें ( समाचार घेत्यें ). ॥१७॥
ह्याप्रमाणें ती त्या समयीं बोलली असतां घाबरून जाऊन तो सेनापति क्षुब्ध झालेल्या व जिचें आचरण निर्मल आहे अशा त्या ( राजमातेस ) म्हणाला :- ॥१८॥
भवानीच्या प्रभावानें तो महासामर्थ्यवान् व पराक्रमी स्वामी अखिल जगताचें पालन करीत आहे. त्यास साह्यकर्त्याची अपेक्षा नाहीं. ॥१९॥
म्हणून त्याच्या आज्ञेनें जाऊन, विजापूर जिंकून, - तुमचें कल्याण असो - मी मोंगलांशीं युद्ध करण्यास परत आलों आहे. ॥२०॥
सत्यनिश्चयी आपण मला रक्षिण्यास यावें. तिकडे तो अत्यंत निर्भय व विजयी शिवाजी आहेच आहे. ॥२१॥
अजिंक्य पुरुषांचा धुरीण अशा त्या आपल्या धन्यास केव्हां पाहीन आणि शत्रूशीं केव्हां युद्ध करीन ( असें मला झालें आहे ). ॥२२॥
हे अनेक सैनिक मोंगलांशी लढतील आणि मी स्वतः तिकडे जोहरादि शत्रूंशीं लढेन. ॥२३॥
इकडे शिवाजीच्या सैन्यांनीं सध्यां अति यत्नानें ( काळजीनें ) रक्षिलेले गड मोंगल आज घेऊं शकत नाहीं. ॥२४॥
याप्रमाणें सेनापतीनें त्या समयीं तिला विनंति केली आणि तो धैर्यानें पन्हाळगडास निघाला. ॥२५॥
झटकन घोड्यावर बसून, हातांत तरवार घेऊन निघालेल्या त्या थोर कुलांतील खंबीर सेनापतीच्यामागून सहाहि प्रकारचीं सैन्यें निघालीं. ॥२६॥
हत्तींच्या सोंडांनीं उडालेल्या धुळीनें ध्वज मलिन झालेलें तें प्रचंड सैन्य तो सामर्थ्यवान क्षत्रिय घेऊन चालला. ॥२७॥
त्या सेनापतीच्या व हिलालाच्या हाताखालचें हें शत्रुसैन्य समीप आलेलें ऐकून त्यास विरोध करण्यास जोहरानेंसुद्धां भालेकरी व पट्टेकरी असे पुष्कळ योद्धे तिकडे पाठविले. ॥२८॥२९॥
तेव्हां मोठा गर्व वाहणारे, भाले पाश, धनुष्य बाण धारण करणारे, धिटाईचे असे ते सर्व शिद्दी शिवाजीच्या त्या अतिप्रचंड व समृद्ध सेनेस वाटेंत अडवून शस्त्रें उगारून तिच्याशीं लढूं लागले. ॥३०॥३१॥
तेथें शत्रूंबरोबर हिलालाच्या चकमकी उडाल्या. त्यांत बाणांनीं डोकीं तोडण्यांत आलीं व भाल्यांनीं हात तोडण्यांत आले. ॥३२॥
तेव्हां हिलालाचा रागीट व अभिमानी पुत्र सामर्थ्यवान वाहवाह ( हा ) शत्रूच्या व्यूहांत शिरला. ॥३३॥
मोठे भव्य व लाल डोळे असलेला, शत्रूंनी छाती फाडणारा तो जवान ( आपलें ) हस्तचापल्य दाखवीत असतां अत्यंत प्रेक्षणीय दिसत होता. ॥३४॥
नंतर विविध आयुधांनीं लढणार्‍या त्या महायोद्ध्यांनीं त्या मानी वाहवाहास युद्धाच्या अग्रभागीं घोड्यावरून खालीं पाडलें व तो बेशुद्ध झाला. ॥३५॥
भाला मोडून व शरीर छिन्नभिन्न होऊन अति विव्हळ झालेल्या त्या वाहवाहास शत्रूंनीं ( जो हरपक्षीयांनीं ) अतिशय हर्ष करीत आपल्या गोटाकडे नेलें. ॥३६॥
जणूं काय आपला आत्माच अशा त्या पुत्रास शत्रु घेऊन जात असतां हिलालसुद्धां सोडवूं शकला नाहीं. ॥३७॥
जोहराचे योद्धे तेथें असे त्वेषानें लढले कीं हिलालप्रमुख सर्व वीर चोहोंकडे पळाले. ॥३८॥
ती वार्ता ऐकून पिच्छाडीचें रक्षण करणारा सेनापती, हिलालाच्या वीरपुत्राबद्दल मनांत शोक करूं लागला. ॥३९॥
याप्रमाणें नेताजीप्रभृति दररोज लढत असतांहि पन्हाळगडास जाण्यास त्यांस संधि मिळाली नाहीं. ॥४०॥
( या प्रमाणें ) सेनापतीचा पराभव झालेला ऐकतांच शिवाजी राजास, इंद्रास जंभासुरास जसा क्रोध आला त्याप्रमाणें, जोहराविषयीं क्रोध आला. ॥४१॥
एकदां तो शुद्धाचरणी राजा तेथें सुखागारांत निजला, असतां, त्यास वरदात्री तुळजा भवानीचें स्वप्नांत दर्शन झालें. ॥४२॥
तेव्हां ती महासामर्थ्यवान् जगन्माता, तो महासामर्थ्यवान् राजा प्रणाम करीत असतां त्यास म्हणाली. ॥४३॥
तुळजादेवी म्हणाली :-
मोंगलांनीं येऊन तिकडे चाकणचा किल्ला जिंकला. तेव्हां, बाळा, त्वां येथें राहूं नये; सर्वथा निघावें. ॥४४॥
तिभि माशांच्या जबड्यांत अडकलेल्या गळाप्रमाणें तसा मोंगलाच्या जयरूपी मुखांत सांपडलेला हा चाकणचा किल्ला मोठ्या अनर्थास कारण होईल. ॥४५॥
हे राजा, ( तसेंच ) सत्वर राजगडास जा आणि आपलें राज्य राख. तुझी व्रुद्ध माता तुजवांचून तेथें तळमळत आहे. ॥४६॥
थोड्याशाच सैनिकांसह त्वां येथून निघून जावें. गडावरील तुझे योद्धे जोहराशीं लढतील. ॥४७॥
मी आपल्या मायेनें जोहरास मूढ करीन आणि जगामध्यें तुझ्या पराक्रमाची विपुल कीर्ति पसरवीन. ॥४८॥
ह्या पाप्याचे दिवस भरले आहेत, हा फार काळ वांचणार नाहीं. दुसर्‍या निमित्तानें मृत्यु ह्यास भक्षूं इच्छीत आहे. ॥४९॥
ह्याप्रमाणें त्यास आज्ञा करून देवी तसेंच अंतर्धान पावली. पण जागा झाल्यावर त्यानें ( शिवाजीनें ) पुनः पुनः तिलाच वंदन केलें. ॥५०॥
मग शत्रुसैन्यानें चोहोंकडून वेढलेला, दाट मेघसमुदायाच्या दर्शनानें नाचणारा जणूं काय मोरच, सर्व बाजूंस पसरलेल्या काळ्या किर्र अरण्यांची दाटी असलेला, गद्गगद, गंभीर व धो धो आवाज करीत अनेक ओहोळ ( झरे ) ज्यापासून वाहात आहेत अशा त्या पन्हाळगडाहून स्वसामर्थ्यानें बाहेर पडण्यास सिद्ध होऊन तेथें पोक्त सैन्य ठेवण्याच्या इच्छेनें त्र्यंबक भास्कर नांवाचा, लोकांमध्यें सन्मान्य, धैर्यवान् ब्राह्मणास स्वबुद्धीनें निश्चित करून शत्रुसमूहाची निंदा करणारें व योग्य असें भाषण शिवाजीनें केलें. ॥५१॥५२॥५३॥५४॥५५॥
राजा म्हणाला :-
पहा ! शस्त्रें उगारून रात्रंदिवस लढतां लढतां पराक्रम्यांनीं आम्हीं येथें चैत्रादि चार महिने घालविले. ॥५६॥
( मेघांच्या योगें ) आकाश काळेकुट्ट असणारा असा हा पांचवा शुभ श्रावण मास प्राप्त झाला आहे. ॥५७॥
अहो, ज्यांचा पराक्रम शत्रूंस अनिवार आहे त्या आमच्या हातून ह्या अजिंक्य गडावरून पायथ्याशीं असलेल्या जोहरास ठार करणें झालें नाहीं हें आश्चर्य होय ! ॥५८॥
नेताजीप्रभूति सेनापतींचा मोड झाल्याची लोकवार्त्रा आहे, आणि ह्यांचा हा वेढा तर आम्हांस थोडासुद्धा उठवितां येत नाहीं. ॥५९॥
ह्या बलवान व पराक्रमी शिद्द्यास पुष्कळ सैन्याच्या साह्यानेंहि जिंकणें आम्हांस सध्यां अशक्य आहे असें मला वाटतें. ॥६०॥
पुणें प्रांत मोंगलांनीं आक्रमिला असतां त्याच्या ( शिद्द्याच्या ) नाशासाठीं ( पराभवासाठीं ) मी येथेंच फार वेळ राहणें योग्य नाहीं. ॥६१॥
तिकडे मोंगलांच्या साहसी महासेनेचा पराभव माझ्याखेरीज दुसर्‍या कोणाच्या हातून होणार नाहीं असें मला वाटतें. ॥६२॥
म्हणून मी मोंगलांचा संहार करण्याच्या इच्छेनें त्वरेनें निघालों आहें. ( तेव्हां ) शत्रूंस अजिंक्य असा हा गड तुझ्या हाताखाली असूं दे. ॥६३॥
तूं येथें सेनापति हो; चोहोंकडून वेढा देणार्‍या शत्रूंच्या नाशासाठीं पराक्रमी कार्तिकस्वामी हो. ॥६४॥
हा शत्रूंचा व्यूह फोडून अर्जुनाप्रमाणें निघून जाणार्‍या माझ्याशीं लढणारा कोणीहि नष्ट शत्रुयोद्धा मुळींच आढळणार नाहीं. ॥६५॥
असें बोलून त्या धैर्यशाली त्र्यंबक भास्करास त्या गडावर ठेवून महाराज रात्रीच्या पहिल्या प्रहरीं निघाले. ॥६६॥
आश्चर्याची गोष्ट ही कीं, ते महाराज असे पालखींत बसून जातांना त्यांच्यामागून सहाशें पदाति गेले ! ॥६७॥
त्यांच्या प्रस्थानदुंदुभीचा ( कुचाच्या नगार्‍याचा ) असा कांहीं मधुर ध्वनि झाला कीं, शत्रूंस ती मेघगर्जनाच आहे असें वाटून त्यांस तो समजला नाहीं. ॥६८॥
कळंब, केवडा, कुंद, कुडा यांच्या सुगंधानें भरलेल्या, धडाधड, उड्या मारीत वाहणार्‍या झर्‍यांच्या तुषारांच्या संपर्कानें मंद अशा वायूनें त्यावेळीं तेथें अनुकूल होऊन स्वजनाप्रमाणें त्यास आपलें साहाय्य केलें. ॥६९॥७०॥
महाराज प्रवास करीत असतांना त्यांस, हेरांनीं पूर्वी पाहून ठेवलेल्या मार्गावरील उंचसखल भूमि, विजांनींहि तत्क्षणीं दाखविली. ॥७१॥
भवानीनें मूढ केलेल्या शत्रूंस महाराज जवळून जात असतांहि समजले नाहींत. ॥७२॥
पुढें मधून मधून पडलेल्या शिळांच्या योगें उंचसखल असलेला, पर्वताच्या तुटलेल्या कड्यांवरून पडतांना गर्जना करणार्‍या नद्यांच्या व नदांच्या असलेला, पालवीच्यायोगें चकचकीत दिसणार्‍या लतांनीं ज्याच्यावरील वृक्ष गुहांमध्यें झाली आहे असा, वारुळांतून बाहेर पडणार्‍या सापांस मारण्याच्या इच्छेनें त्वेषानें धावून जाणार्‍या मोरांच्या टाहोंनीं भरलेला, ज्याच्यावर मनुष्यांचा संचार दृष्टीस पडत नव्हता असा हेरांनीं आधींच पाहून ठेवलेला तो मार्ग रायगडचा स्वामी राजा शिवाजी आक्रमून गेला. ॥७३॥७४॥७५॥७६॥७७॥
नंतर मार्ग आक्रमून आलेल्या राजा शिवाजीनें प्रेक्षणीय सभागृहें व पागा असलेल्या आपल्या विशाळगडावर चढून तेथें आपल्या सैन्यास विश्रांति मिळावी ह्या हेतूनें इष्ट अशी वस्ती केली. ॥७८॥