बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (18:56 IST)

कोरोना व्हायरस : लहान मुलांना ‘इन्फ्लूएन्झा’ लस देण्याची शिफारस तज्ज्ञांनी का केलीये?

मयांक भागवत
राज्यातील सर्व मुलांना पावसाळ्याआधी 'इन्फ्लूएन्झा' लस देण्यात यावी, अशी शिफारस राज्य सरकारच्या कोव्हिड टास्कफोर्स आणि पीडियाट्रिक टास्कफोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलीये.
 
'फ्लू'ची लस दिल्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
 
पावसाळ्यात साथीचे आजार डोकं वर काढतात. त्यात, साधा 'फ्लू' म्हणजेच तापाची आणि कोव्हिडची लक्षणं सारखीच असल्यामुळे रुग्णालयांवर मोठा ताण पडेल. 'इन्फ्लूएन्झा' लस दिल्यास हा ताण कमी होईल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
कोरोनासंसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे.
 
मुलांना देण्यात यावी 'इन्फ्लूएन्झा' लस
लहान मुलांना होणारा कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना गरजेच्या आहेत. याबाबत, रविवारी (23 मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोव्हिड टास्कफोर्स आणि बालरोगतज्ज्ञांशी चर्चा केली.
राज्याच्या कोव्हिड टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक म्हणाले, "लहान मुलांच्या बाबतीत फार कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे." डॉक्टरांकडे न जाता आजार घरीच अंगावर काढल्याने मुलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.
 
मॉन्सूनमध्ये लहान मुलांना होणारे फ्लूसदृष्य आजार वाढतील. हे आजार रोखण्यासाठी 'इन्फ्लूएन्झा' लस देण्याची सूचना तेज्ज्ञांनी केली. "लहान मुलांना इन्फ्लूएन्झा लस देण्याचा सल्ला दिला पाहिजे. याचं कारण, लहान मुलांवर कोव्हिड लशीचा अजून अभ्यास सुरू आहे," असं डॉ. ओक पुढे म्हणाले.
 
राज्याच्या पिडियाट्रिक टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू सांगतात, "इन्फ्लूएन्झाचे रुग्ण कोव्हिडसारखेच दिसतात. या रुग्णांनी कोव्हिड तपासणीसाठी गर्दी केली तर, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे यावर्षी मुलांना इन्फ्लूएन्झा लस दिली तर रुग्ण कमी होतील."
लहान मुलांना लसीकरण मोहिमेअंतर्गत, बीसीजी लस दिली जाते. आदिवासी पाडे, दुर्गम भागातील मुलांना बीसीजी लस मिळेल. याकडे सरकारने काळजीपूर्वक लक्ष द्यावं अशी सूचना तज्ज्ञांनी केलीये.
 
'इन्फ्लूएन्झा लस अत्यंत सुरक्षित'
 
इन्फ्लूएन्झा लशीबाबत बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय येवले सांगतात "इन्फ्लूएन्झा लस अत्यंत सुरक्षित आहे. फ्लू, कोव्हिडसारखाच श्वसनमार्गाशी निगडीत आजार आहे. त्यामुळे मुलांना इन्फ्लूएन्झा लस घेण्याबाबत पालकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे."
 
"एक लस पावसाळ्याआधी आणि एक हिवाळ्याआधी घेतली पाहिजे," असं डॉ. येवले पुढे म्हणतात.
 
इन्फ्लूएन्झा लस महाग असल्याने राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत याचा समावेश करण्यात आलेला नाही. डॉ. संजय ओक म्हणतात, "उच्चभ्रू आणि मध्यमवर्गाला ही लस परवडू शकते."
 
त्यामुळे, सरकारने निदान पुढील सहा महिने याची किंमत कमी करण्याबाबत किंवा राज्य स्तरावर याचा विचार केला पाहिजे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.
कोरोनाकाळात लहान मुलांना फ्लू-शॉट्स फायदेशीर?
बालरोगतज्ज्ञांच्या मते, मुंबईसारख्या शहरात सिझनल फ्लूचं इंन्फेक्शन पावसाळा सुरू होण्यापासून ते मार्चपर्यंत रहातं. त्यामुळे या काळात फ्लू किंवा फ्लूसदृष्य लक्षणांनी डॉक्टरांकडे येणाऱ्यांची संख्या वाढते.
 
कोरोनाकाळात फ्लू-शॉट्स लहान मुलांसाठी फायदेशीर आहेत का? यावर बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव बालन म्हणतात, "कोव्हिड-19 काळात लहान मुलांना फ्लू-शॉट्स देणं महत्त्वाचं आहे. यामुळे फ्लूने होणाऱ्या इंन्फेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होईल."
 
"कोव्हिड आणि फ्लूचा विषाणू फुफ्फुसातील रिसेप्टरला बांईंड होतो. फ्लूची लस घेतल्यामुळे फुफ्फुसातील रिसेप्टर्स व्हायरसला एक्सपोज होणार नाहीत," असं डॉ बालन पुढे म्हणतात.
 
फ्लू आणि कोरोनाची लक्षणं ताप, सर्दी, खोकला अशीच आहेत. हिरानंदानी रुग्णालयाचे छातीरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मेहता सांगतात, "पण फ्लू-शॉट्स घेतल्याने कोरोना बरा होत नाही."
"लोकांमध्ये गैरसमज पसरलाय. फ्लू-शॉट्स घेतले की कोरोना बरा होतो. कोरोना आणि फ्लू व्हायरस पूर्णत: वेगळे आहेत."
 
औरंगाबादमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते आणि डॉ. अनिल मोकाशी यांनी फ्लूच्या लशीचा लोकांना काय फायदा होतो, यावर अभ्यास केला. डॉ. अमोल म्हणतात, "फ्लूची लस घेतलेल्या 25 वर्षावरील 1779 लोकांचा अभ्यास केला, असं निदर्शनास आलं की बहुतांश लोकांना आजाराचा संसर्ग झाला नाही. ज्यांना आजार झाला, त्याची तीव्रता कमी होती."
 
"तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जातेय. लहान मुलांना फ्लूची लस दिली तर मुलांना आजारापासून संरक्षण मिळू शकेल. त्यामुळे, पालकांनी मुलांना फ्लूची लस दिली पाहिजे," असं ते म्हणाले.
 
तिसऱ्या लाटेसाठी सरकारची तयारी काय?
इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सने पाच वर्षाखालील लहान मुलांना इन्फ्लूएन्झा लस देण्याबाबत शिफारस केलीये. तज्ज्ञांच्या सूचनेचा सरकार गांभीर्याने विचार करेल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय.
 
ते म्हणाले, "अनेक लहान मुलांमध्ये लक्षणं आढळून येत नाही. ही मुलं कोव्हिड पॉझिटिव्ह असतील तर, त्यांना इन्फ्लूएन्झा लस देताना काय काळजी घ्यावी, या मुलांना लस देऊ शकतो का, यावर मार्गदर्शक सूचना गरजेच्या आहेत."
"लस कोणाला, कशी आणि कधी द्याची हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुलांना काही त्रास झाला तर काय करावं यावर तज्ज्ञांनी सरकारला मार्गदर्शन केलं पाहिजे," असं मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले.
 
फ्लू शॉट्स म्हणजे काय?
'इन्फ्लूएन्झा' व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शनला 'सिझनल फ्लू' असं म्हटलं जातं. सामान्यांना या 'फ्लू' पासून सुरक्षा देण्यासाठी लस उपलब्ध आहे. याला फ्लू शॉट्स असं म्हंटलं जातं.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 'फ्लू'पासून बचावासाठी लस अत्यंत प्रभावी हत्यार आहे. या लसीमुळे 'इन्फ्लूएन्झा' व्हायरसमुळे होणारे गंभीर आजार रोखता येऊ शकतात आणि सामान्यांचे जीव वाचवता येऊ शकतात.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 6 महिने ते 5 वर्षापर्यंतची लहान मुलं, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, आरोग्य कर्मचारी, सहव्याधी असलेल्या व्यक्ती हाय-रिस्कमध्ये असल्याने त्यांनी दरवर्षी फ्लू-शॉट्स घेणं गरजेचं आहे.
 
लहान मुलांमध्ये कोरोनासंसर्गाचा धोका?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोनासंसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढलंय.
 
बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय येवले सांगतात, "लहान मुलांमध्ये कोरोनासंसर्ग वाढलाय. अनेक मुलांना लक्षणं दिसून येत नाही. त्यामुळे पोस्ट-कोव्हिड लहान मुलांचे आजार वाढणार आहेत, त्याकडे लक्ष द्यावं लागेल."