बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 18 मे 2020 (09:30 IST)

करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मुंबईत कुठल्याही मैदानावर सुविधा उभारली जाणार नाही

मुंबईत कुठल्याही मैदानावर विलगीकरण सुविधा उभारणार नसल्याचं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी स्पष्ट केलं आहे. लवकरच मुंबईत पाऊस सुरू होईल. त्यामुळे या मैदानांवर चिखल होईल आणि त्यांच्या वापरावर अडचणी येतील. त्यामुळं विमानतळ तसंच इतर ठिकाणी उपलब्ध असलेल्या पार्किंगमध्ये गरज पडल्यास विलगीकरणाची सुविधा उपलब्ध केली जाईल असे ते म्हणाले.

मुंबईत सध्या सुमारे ५० हजार खाटा उपलब्ध असून लवकरच ही संख्या १ लाखापर्यंत वाढविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एमएमआरडीए मैदानावर उभारण्यात आलेलं ८०० खाटांचं रुग्णालय सोमवारपासून कार्यरत होईल आणि मंगळवारपासून याठिकाणी रुग्ण ठेवले जातील असंही ते म्हणाले. 

मुंबईत सध्या डॉक्टरांची कमतरता नाही. मुंबईत काम करण्यासाठी वर्धा, आंबेजोगाईहून काही डॉक्टर येत असल्याची माहिती त्यांनी आज दिली. याशिवाय काही खासगी डॉक्टरांनी स्वतःहून सेवा देण्याची तयारी दर्शवल्याचे ते म्हणाले. मात्र स्वच्छता कर्मचाऱ्यांना मुंबईच्या हद्दी बाहेरुन यावे लागते. त्यामुळं केवळ ४० टक्के कर्मचारी कामावर येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

पालिकेच्या रुग्णवाहिकांची संख्या ८० वरुन ३५० करण्यात आली आहे. महापालिकेने आता बेस्ट बस आणि एसटी बसेसचा रुग्णवाहिका म्हणून वापर सुरु केला आहे.  सध्या बेस्ट व एसटीच्या ८५ बस रुग्णवाहिकेची सेवा बजावत आहेत.  या बसमध्ये एक चालक आणि मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार आणखी बसेसची वाढ केली जाणार आहे.