रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (08:23 IST)

2022 मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन संपूर्ण विधी

मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. उद्यापन पद्धत जाणून घ्या-
 
मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी.
 
व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा-आरती- कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे.
 
व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी संध्याकाळी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यांत महालक्ष्मीस्वरूप जाणून त्यांना हळदी-कुंकु लावावे. मनोभावे नमस्कार करावा. नंतर पूजा, आरती, कहाणी करून प्रसाद म्हणून फळ, सौभाग्य म्हणून गजरा, व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी. यथाशक्ती भेटवस्तू देखील देऊ शकता. त्यांची ओटी भरुन मनोभावे नमस्कार करावा. प्रसाद म्हणून दूध किंवा इतर फराळ द्यावा.
 
नंतर कुटुंबियांसमवेत गोडाचे जेवण करावे.
 
व्रतामध्ये फळे, दूध वगैरे घ्यावे. निराहार राहू नये.
 
पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदीकुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मीस्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा. 
 
शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा-वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशिर्वाद घ्यावा. 
 
सायंकाळी गाईची पूजा करून गोग्रास द्यावा.
 
व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे.
 
गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ति असावी. सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे.
 
काही कारणामुळे गुरुवारी पूजा-आरती-कहाणी करणे शक्य नसेल, तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा.
 
दुसर्‍या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन देवीची पूजा करावी. कथा वाचावी आणि आरती करावी. तसेच व्रत करताना कळत नकळत चूक झाली असल्याची क्षमा याचना करावी.
 
देवीची कृपा असावी म्हणून प्रार्थना करावी. नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे म्हणत मूर्ती किंवा यंत्र तसेच कळश हालवून नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करावा.
 
इतर साहित्य गरजूंना दान करु शकता. कळशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे.