बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. स्वातंत्र्य दिन
Written By वेबदुनिया|

कर्नाटकात गांधीजींचे मंदिर

ND
महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. राष्ट्रपिता म्हणून आपण त्यांचा आदर करतोच. पण कर्नाटकात मात्र गांधीजींचे मंदिर आहे. शिवाय नेहमी देवाची पूजा करतो, तशी त्यांचीही रोज पूजा केली जाते. विशेष म्हणजे आज या काळातही त्यांचे दर्शन घ्यायला गर्दी होत असते.

वास्तविक आजच्या काळात गांधीजी फक्त नोटेपुरते आणि भाषणापुरते उरले आहेत. राजकारण्यांनी त्यांचे नाव वापरून राजकारण तेवढे केले. पण असे असले तरी गांधींच्या मंदिराच्या रूपाने त्यांचा विचार जपण्याचेही काम एकीकडे केले जात आहे. कर्नाटकाच्या समुद्र किनार्‍यावरील सुंदर शहर असलेल्या मंगलोरपासून तीन किलोमीटरवर हे मंदिर आहे. बंगलोर- मंगलोर महामार्गावर कनकंडी या गावात श्री ब्रह्म बैदरकला गराडी क्षेत्र आहे. याच्या आवारातच गांधीजींचे मंदिर आहे.

हा मंदिर परिसर आगळा आहे. मुख्य मंदिर हे तुलू गावातील लढवय्ये तरूण कोटी व चेन्नय्या या बंधूंच्या स्मृत्यर्थ बांधले आहे. त्यालाच ब्रह्म बैदरकला गराडी क्षेत्र असे म्हणतात. त्यांच्या बहिणीचे मायंदलचेही येथे मंदिर आहे. त्याचबरोबर ब्रह्मर्षी नारायण गुरू, गणपती बालपरमेश्वरी, आनंद भैरव, सुब्रमण्य यांचीही मंदिरे या आवारात आहेत.

गराडी ही एक पारंपरिक व्यायामशाळा आहे. येथे मार्शल आर्टसह तलवारीसारख्या शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाई. कोटी व चेन्नयाना यांनी येथेच शस्त्र प्रशिक्षण घेतले. त्यांच्या शौर्यामुळेच या परिसरात विशेषतः तुळू भाषिकांमध्ये त्यांच्या नावाने एका पंथाची सुरवात झाली. हे दोघे बंधू त्या परमेश्वराचे अवतार आहेत, अशी त्यांची श्रद्धा आहे.

गराडी क्षेत्राची स्थापना ४ मार्च १८७४ मध्ये झाली. पण १२ डिसेंबर १९४८ ला या क्षेत्राचे व्यवस्थापक सोमाप्पा पंडित व अध्यक्ष नरसप्पा सालियन यांनी येथे गांधीजींचे मंदिर उभारण्याचे ठरविले व या क्षेत्राला शांतता व अहिंसेचे केंद्र बनविण्याचे ठरविले. वेंकप्पा पूजारी यांनी लगोलग गांधीजींची मूर्ती भेट दिली.

इतर मंदिरांप्रमाणे येथेही गांधीजींची रोज पूजा केली जाते. त्यासाठी एक पुजारीही आहे. तो रोज येथे दूध, केळी व भात ठेवतो. गांधी जयंतीच्या दिवशी तर विशेष पूजा केली जाते. शिवाय मिरवणूकही काढली जाते.

या मंदिरातील गांधीजींची मूर्ती लोभस आहे. ते पुस्तक वाचण्याच्या पवित्र्यात आहेत, अशी त्यांची मूर्ती आहे. येथे भेट देणारी मंडळी गांधीजींच्या मंदिराला भेट देण्यास अजिबात विसरत नाहीत. कारण याच साबरमतीच्या संताने सत्य आणि अहिंसेचे शिकवण लोकांना दिली आणि त्याच बळावर स्वातंत्र्य खेचून आणले.

गांधीजींच्या जयंती आणि पुण्यतिथीदिनी येथे गर्दी होतेच. शिवाय स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनीही येथे कार्यक्रम होतात. आता हे मंदिर आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत चालले आहे.