गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (22:03 IST)

हमासच्या हल्ल्यात 70 मृत्युमुखी, इस्रायलचे पंतप्रधान म्हणतात- 'शत्रूला मोठी किंमत मोजायला लागणार'

इस्लामी कट्टरवादी गट 'हमास'ने इस्रायलवर अचानक हल्ला करून देशात प्रवेश केला आहे.
शनिवारी (7 ऑक्टोबर) सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने तब्बल 5 हजार रॉकेट्स डागण्यात आल्याचा हमास या इस्लामी कट्टरतावादी गटाने दावा केला आहे.
 
हमासच्या रॉकेट हल्ल्यात इस्रायलमध्ये आतापर्यंत 70 लोकांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, असं इस्रायलच्या आरोग्य विभागाने सांगितलं आहे.
 
या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याच्या धोक्याचे सायरन वाजले. तेल अवीव आणि दक्षिण गाझाच्या आसपासच्या भागात स्फोट झाल्याचंही वृत्त आहे.
 
पॅलेस्टिनी कट्टरतावादी गट हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या हमास गटाची गाझावर सत्ता आहे.
 
इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी अनेक पॅलेस्टिनी कट्टरतावादी गाझामधून दक्षिण इस्रायलमध्ये घुसले आहेत.
 
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा पट्टीत 198 जणांचा मृत्यू झाला असून हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती स्थानिक पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आम्ही युद्धात असून आम्हीच जिंकू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार नेत्यानाहू म्हणाले, आमच्या शत्रूला कळणारही नाही इतकी याची किंमत मोजावी लागेल.
इस्रायल 'युद्धाच्या तयारीत'
इस्रायल संरक्षण मंत्र्यांनी लष्करातील राखीव सैनिकांनाही तयार राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
 
तर इस्रायली लष्कराने प्रत्युत्तरासाठी गाझा पट्टीवर ताबडतोब हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे
परिस्थितीचं मुल्यांकन करूनच आम्ही प्रतिहल्ला करू असा इस्रायलने इशारा दिला आहे.
 
इस्त्रायली लष्कराने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे.
 
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी लष्करी अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली.
 
दरम्यान हा संघर्ष आणखी काही दिवस चालू शकतो, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
 
इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी इस्रायलमध्ये सध्या सामान्य परिस्थिती नसल्याचं सांगितलं आहे.
 
“ज्यू लोकांच्या सुटीच्या दिवशी इस्रायलवर गाझाकडून एकत्रित हल्ला झाला. हमासच्या दहशतवाद्यांची रॉकेट हल्ला केला आणि जमिनीवरून घुसखोरी केलीय. ही सामान्य परिस्थिती नाहीये. पण यात इस्रायचाच विजय होईल,” असं गिलॉन यांनी म्हटलं आहे.
 
'दक्षिण इस्रायलमध्ये रस्त्यावर गोळीबार'
इस्रायलमधील बीबीसी प्रतिनिधी योलांद नेल यांनी दिलेल्या माहितीनुसार :
 
शनिवारी पॅलेस्टिनी कट्टरतावादी दक्षिण इस्रायलच्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर गोळीबार करताना सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये दिसले.
 
हमासच्या कट्टरतावाद्यांनी शनिवारी सकाळी इस्रायलच्या सेडेरोट भागातील घरे ताब्यात घेतल्याचंही वृत्त आहे.
शनिवारच्या पहाटेपासूनच इस्रायलवर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा हल्ला सुरू झाला आहे.
 
यातील बहुतेक रॉकेट्स हवेतच नष्ट करण्यात इस्रायलला यश आलं आहे.
 
पण रॉकेट हल्ल्यामुळे या भागात अनेक ठिकाणी आग लागल्याचं दिसत आहे.
 
दुसरीकडे हमासच्या वरिष्ठ कमांडरने आपण इस्रायलवर हल्ल्या केल्याचं सांगितलं आणि सर्व पॅलेस्टिनीं लोकांना एकत्र लढण्याचं आवाहन केलं आहे.
 
इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, ते इस्रायली नागरिकांचे रक्षण करतील आणि हमासला त्यांच्या कृतीची मोठी किंमत मोजावी लागेल.
 
जागतिक नेते काय म्हणाले?
इस्रायल पॅलेस्टाइन संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर जागतिक नेत्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.
 
अमेरिकेने या हिंसाचाराचा निषेध केला. 'दोन्ही बाजूंनी ही हिंसा तातडीने थांबवावी,' असं म्हटलं आहे.
इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने खूप धक्का बसला. आमच्या प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण प्रसंगी आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅनुअल मॅक्रॉन यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ‘मृत्यू झालेल्या कुटुंबियासोबत मी माझी संवेदना व्यक्त करतो,’ असं मॅक्रॉन म्हणाले.
जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ‘सामान्य नागरिकांवरील रॉकेटहल्ले ताबडतोब थांबेले पाहिजेत,’ असं म्हटलं आहे.
हा सर्वात घृणास्पद दहशतवाद असल्याचं युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन यांनी म्हटलं.
आम्ही नेहमी संयम ठेवण्याचे आवाहन करत आलो आहे असं रशियाने म्हटलं आहे.
इराणचा हमासला पाठिंबा
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या सल्लागारांनी इस्रायलवरील पॅलेस्टिनी हल्ल्याचे समर्थन केल्याचं सांगितलं जात आहे.
 
जोवर पॅलेस्टाइन आणि जेरुसलेम स्वतंत्र होत नाही तोवर आम्ही या संघर्षाला पाठिंबा देत आहे, असं इराणने म्हटलं आहे.
 
इस्रायलमधील भारतीयांना सुचना
इस्रायलमधील भारतीय दुतावासाने आपल्या नागरिकांना महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. तसंच स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा नियमावलीचं पालन करावं असं म्हटलं आहे.
 
"इस्रायलमधील परिस्थिती पाहता सगळ्या भारतीयांनी सतर्क राहावं. स्थानिक प्रशासनाने दिलेली सुरक्षा नियमावलीचं पालन करावं. विनाकारण बाहेर फिरण्याचं टाळावं. अधिक मदतीसाठी भारतीय दुतावासाशी संपर्क करावा," असं भारतीय दुतावासाच्या परिपत्रकात म्हटलं आहे.
 
इस्रायलवर रॉकेट हल्ला करणाऱ्या हमासचा इतिहास
हमास ही पॅलेस्टाईनच्या कट्टरवादी संघटनांपैकी सर्वांत मोठी संघटना आहे.
 
इस्लामिक रेजिस्टंस मूव्हमेंट या संघटनेच्या अरबी नावाच्या आद्याक्षरांना जोडून 'हमास' हे नाव ठेवण्यात आलं आहे.
 
1987 साली वेस्ट बँक आणि गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या कब्जाचा विरोध सुरू झाल्यावर पॅलेस्टाईनने पहिला विद्रोह केला. तिथूनच हमासची सुरुवात झाली.
 
इस्रायलला धुळीस मिळवण्यास कटीबद्ध असल्याचं या संघटनेच्या चार्टरमध्ये लिहिलं आहे.
 
हमासची सुरुवात झाली त्यावेळी या संघटनेची दोन उद्दिष्टं होती. पहिलं उद्दिष्टं म्हणजे इस्रायलविरोधात शस्त्र हाती घेणं. त्यांच्या इज्जदीन अल-कसाम ब्रिगेडवर ही जबाबदारी होती. याशिवाय या संघटनेचं दुसरं उद्दिष्टं समाजकल्याणाची कामं करणं हे होतं.
 
मात्र, 2005 नंतर इस्रायलने गाझातून आपलं सैन्य आणि वस्त्या मागे घेतल्या. तेव्हापासून हमासने पॅलेस्टाईनच्या राजकीय प्रक्रियेत सहभागी व्हायला सुरुवात केली.
 
2006 साली हमासने पॅलेस्टाईनच्या अंतर्गत येणाऱ्या भागातून निवडणुकीत विजय मिळवला आणि पुढल्याच वर्षी गाझाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या 'फतह' या प्रतिस्पर्धी गटाला बाजूला सारत तिथली सत्ता काबिज केली.
 
तेव्हापासून गाझाच्या या कट्टरवाद्यांनी इस्रायलसोबत तीन युद्ध केली आहेत. हमासला एकट पाडून त्यांच्यावर हल्ले बंद करण्याचा दबाव यावा, यासाठी इस्रायलने इजिप्तच्या सहकार्याने गाझापट्टीची नाकाबंदी केली आहे.
 
हमास किंवा किमान त्यांच्या सैन्य गटाला इस्रायलसह अमेरिका, युरोपीय महासंघ, ब्रिटन आणि इतर अनेक राष्ट्र एक अतिरेकी संघटना मानतात.
 
इस्रायल - पॅलेस्टाइन संघर्षाचा इतिहास
1948 च्या मे महिन्यात पॅलेस्टाइन प्रदेशातून ब्रिटनने माघार घेतली, आणि आपआपला देश बनवण्यासाठी अनेक वर्षं संघर्ष करणाऱ्या अरब आणि ज्यू लोकांमध्ये अंतर्गत युद्ध पेटलं. प्रश्न होता, ही भूमी नक्की कोणाच्या हातात जाणार. युद्ध तुल्यबळांचं नव्हतं. अरबांच्या तुलनेत ज्यूंची संख्या अतिशय कमी होती पण या दिवसाच्या तयारी गेले कित्येक वर्षं तिथे असणाऱ्या आणि इस्रायलचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक ज्यू ने अनेक वर्षांपासून केली होती.
 
14 मे 1948 साली इस्रायलने आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. 2000 वर्षांत पहिल्यांदा पूर्णपणे ज्यूंचा देश अस्तित्वात आला होता. मुस्लीमबहुल प्रदेशाच्या मधोमध ज्यूंचा देश निर्माण झाला.
 
त्यानंतर इस्रायलनं जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता आणि संपूर्ण शहर आपल्या मालकीचं असल्याचा त्यांचा दावा आहे.
 
पण बहुतांश देशांना हा दावा मान्य नाही. दुसरीकडे पॅलेस्टिनी लोक स्वतंत्र देशाची आशा करत असून ईस्ट जेरुसलेम ही त्या देशाची राजधानी असेल असं त्यांना वाटतं.
 
या वादातूनच तिथे सतत संघर्ष होत असतो.
 










































































Published By- Priya Dixit