गुलशनकुमार वनकर
5 useful items for daily life अखेर भारताने चंद्रावर यशस्वीरीत्या चंद्रयान-3 लँड करत इतिहास रचला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग करणारा भारत अमेरिका, रशिया, चीननंतर चौथा देश बनला आहे.
पण हो, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळयान लँड करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे.
दरम्यान, तुमच्या अवतीभवतीसुद्धा कुणी कधी ना कधी असं म्हटलं असेलच – कशाला जायचंय चंद्रावर? तिथे पोहोचवून काय घरं बांधणार आहोत? त्यापेक्षा सरकारने जनतेच्या कल्याणासाठी तो पैसा खर्च करायला पाहिजे.
चंद्रयानसारख्या मोहिमांमुळे आपल्या फक्त चंद्राविषयीच माहिती कळते, असं नाही.
अशा मून मिशन्समुळे आपल्या आजवर अनेक गोष्टी मिळाल्या आहेत, ज्यामुळे आपलं पृथ्वीवरील आपलं जगणंही जास्त आरामदायी बनलंय, किंवा ज्यांचा वापर आपण तंत्रज्ञान पुढे न्यायला, नवनवीन गोष्टींचा शोध लावायला करतो.
पाहू या अशा 5 गोष्टी –
1. डिजिटल फ्लाईट नियंत्रण
एक काळ होता की लोक सांगायचे, आमच्या घरात तर एवढा मोठ्ठा कॉम्प्युटर आहे की अख्खी खोली व्यापेल.
“पण 1960च्या दशकातल्या चांद्र मोहिमा तो काळ होता, जेव्हापासून लोक सांगू लागले की त्यांचे कॉम्प्युटर किती लहान आणि कॉम्पॅक्ट आहेत,” असं डिजिटल अपोलो या पुस्तकाचे लेखक डेव्हिड मिंडेल सांगतात.
नासाच्या अपोलो मोहिमांमध्ये एका सुटकेसमध्ये मावेल असा जुगाड कॉम्प्युटर पहिल्यांदा तयार करण्यात आला होता. यात एक स्क्रीन होती, एक इनपुट कीबोर्ड होता, ज्याद्वारे पृथ्वीपासून सुमारे 3.8 लाख किलोमीटर दूर मानव एका महाकाय अंतराळयानाचं नियंत्रण करू शकत होता. मुळात हा कॉम्प्युटर पहिलं डिजिटल स्टिअरिंग कंट्रोल होतं.
याच तंत्रज्ञानातून पुढे Digital Fly-by-wire चा जन्म झाला, जे आज प्रत्येक विमानात आढळतं. म्हणजे काय? तर पूर्वीच्या क्रँक, पुली आणि इतर हायड्रॉलिक यंत्रांची जागा आता एका इलेक्ट्रॉनिक नियंत्रण यंत्राने घेतली होती. हे होतं पहिलं डिजिटल फ्लाईट नियंत्रण.
2. कंप्युटर्स, मायक्रोचिप्स आणि स्मार्टफोन्स
आता जिथे डिजिटल तंत्रज्ञान आलं, तिथे काँप्युटर्स आलेच. तुम्हाला माहितीय, 1969च्या नासाच्या चांद्र मोहिमेत अपोलो 11 यानावर एक काँप्युटर लागलेलं होतं, ज्याच्या मदतीने नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं.
आणि या काँप्युटरचे स्पेसिफिकेशन पाहून तुम्ही हसाल – जवळपास 74KB ROM आणि 4KB RAM मेमरी यात होती. KB बोललोय मी, बरं का? आज तुमच्या फोनमध्ये याच्या लाखो पट जास्त मेमरी असते.
तेव्हा अमेरिका आणि रशियामधलं शीतयुद्ध आणि ही अंतराळातली शर्यत पाहता, अमेरिकेला त्यांच्या अंतराळ मोहिमांना वेग द्यायचा होता. त्यासाठी देशातल्या एकूण इंटीग्रेटेड सर्किट उत्पादनाचा 60 टक्के वाटा अपोलो मिशनला जात होता.
लेखक डेव्हिड मिंडेल सांगतात की, “त्या काळी सिलिकॉन चिप्स आणि इंटिग्रेटेड सर्किट्स हे भन्नाट तंत्रज्ञान होतं, आणि नासा ते अगदी अंतराळयानांमध्ये वापरतंय, ही बातमी अशी पसरली की देशात सिलिकॉन क्रांती घडू लागली. त्यात अपोलो मोहिमेमुळे या तंत्रज्ञानाची उपयुक्तता जगाला पटली आणि त्याचा प्रसार वाढू लागला.”
यामुळे पुढे या चिप्स अधिकाधिक शक्तिशाली आणि लहान-लहान होत गेल्या, इतक्या लहान की आज तुमच्या-आमच्या हातांमध्ये स्मार्टफोन्स आहेत.
3. रिचार्जेबल बॅटरीज
महागड्या वजनदार चक्रीवाल्या लँडलाईन्सपासून ते आजवरच्या स्मार्टफोन्सपर्यंत, हा प्रवास खूप लांब राहिला आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावलीय बॅटरी तंत्रज्ञानाने. पण तुम्हाला माहितीय, हेही तंत्रज्ञान अंतराळमोहिमांपासून आलं आहे.
नासाने चंद्रावर पाठवलेल्या कमांड मॉड्यूलमध्ये सिल्व्हर झिंक बॅटरी होती, जी त्या काळची सर्वांत हलकी बॅटरी होती. पण ही बॅटरी रिचार्जेबल नव्हती, आणि नासाने त्यावर बरंच काळ संशोधन केलं, पण यश आलं नाही.
अखेर 1996 साली स्थापन एका खासगी कंपनीने याच तंत्रज्ञानावर पुढे संशोधन सुरू केलं. त्यांना हिअरिंग एड्स अर्थात श्रवण यंत्रात रिचार्जेबल बॅटरी लावायची होती, पण लिथियम आयन बॅटरी, जी आपल्या मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स आणि आता गाड्यांमध्येही असते, ती बॅटरी गरम होण्याची भीती असते.
पण अखेर या कंपनीला अशी सिल्व्हर झिंक बॅटरी विकसित करण्यात यश आलं, जी सुमारे 1000 वेळा रिचार्ज करता येईल. याच बॅटऱ्यांच्या मदतीने पुढे 1999 साली पहिलं रिचार्जेबल श्रवणयंत्र बाजारात आलं होतं.
4. स्पेस ब्लॅँकेट
कुठे पुरातून, कुठे बोड बुडाल्यानंतर किंवा हिमस्खलातून जेव्हा लोकांना वाचवलं जातं, तेव्हा त्यांना सर्वांत आधी एक चांदीच्या रंगाचं आवरण दिलं जातं. हे काय असतं?
याला स्पेस ब्लँकेट म्हणतात. नासाच्या लक्षात आलं की मायलार या हलक्या प्लास्टिक आणि धातूच्या मिश्र पदार्थाच्या अनेक पदरांमुळे असं इन्सुलेशन मिळतं, जे दुसऱ्या कुठल्याच वस्तूपासून मिळू शकत नाही. नासाने नंतर हेच तंत्रज्ञान विकसित केलं, आणि त्याचा वापर अंतराळवीरांच्या स्पेससूटसाठी केला गेला.
आणि आज हेच मायलार अगदी फॅशन इंडस्ट्री, अग्निशमन, कँपिंग, शीतगृहांमध्ये आणि अगदी बचावपथकांतर्फे थंडीपासून बचावासाठी वापरलं जातं.
5. स्मार्टफोनमधला कॅमेरा
काँप्युटर्स प्रमाणेच सुरुवातीचे कॅमेरेही एका साधारण बाथरूमएवढी जागा घ्यायचे. आज तुमच्या-आमच्या फोनमध्येच किमान तीन कॅमेरे आहेत.
पहिला डिजिटल कॅमेरा 1975 साली कोडॅकने तयार केला होता, पण त्यापूर्वीच 1960च्या दशकात नासाच्या जेट प्रोपल्शन लेबॉरेटरी JPL मध्ये डिजिटल फोटोग्राफीवर संशोधन सुरू होतंच.
एखादा फोटो काढताना त्या फ्रेमचे अनेक बारीकबारीक तुकडे करून प्रत्येक तुकडा वेगवेगळ्या फोटो सेन्सॉर्सवर धडकवायचा, ज्यांना एकत्र करून डिजिटल इमेज तयार होईल, असं हे तंत्रज्ञान सुरू होतं. यातल्या प्रत्येक तुकड्याला 1965 साली Frederic Billingsley फ्रेडरिक बिलिंग्सले यांनी एक नाव दिलं – पिक्चर एलिमेंट किंवा Pixel.
पुढे चालून एरिक फॉसम यांच्या नेतृत्वात JPLमध्ये हेच तंत्रज्ञान मायक्रोप्रोसेसर्स आणि चिप टेकनॉलॉजीच्या सहाय्याने आणखी अद्ययावत आणि आकाराने लहान होत गेलं. आणि आज आपल्या हातांमध्ये मावतील इतके छोटे डिजिटल कॅमेरे अस्तित्वात आले.
पण हो, चंद्रावर 1969 साली ते ऐतिहासिक फोटो काढणारी कंपनी दुसरीच होती – हॅसलब्लॅड कंपनीचा तो Hasselblad Data Camera (HDC). तोही आजकाल अनेक फोन्समध्ये उपलब्ध झाला आहे.
याशिवाय या चांद्र मोहिमांनी अशा गोष्टी दिल्यात, ज्यांचा वापर आपण कधी ना कधी केलाय किंवा करू शकू. आणि हो, या अंतराळ मोहिमांनी अनेक पिढ्यांनाही प्रेरित केलंय. तुम्हालाही कधी ना कधी इच्छा झाली असेलच एक अंतराळवीर होण्याची, अवकाशात जाऊन चंद्रावर एक मोठी उडी घेण्याची.