मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 एप्रिल 2021 (10:19 IST)

105 वर्षांचे आजोबा आणि 95 वर्षांच्या आजींनी कशी केली कोरोनावर मात?

- दीपाली जगताप
कोरोनाने देशात आणि राज्यात थैमान घातले आहे. दर दिवशी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा आपल्या जीवाला घोर लावत आहे. अशा वातावरणात 105 वर्षांचे आजोबा आणि 95 वर्षांच्या आजीने कोरोनाला धोबीपछाड दिली आहे. त्यांनी कोरोनावर मात कशी केली हा चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय बनला आहे.
 
"खूप वय असल्याने गावाकडे सगळे सांगत होते की कोरोनावर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर मृतदेह पण मिळणार नाही. तेव्हा तिकडे जाऊ नका. कोरोनाची लागण झाल्याने आपले 105 वर्षांचे वडील आणि 95 वर्षांची आई आता वाचणार नाहीत असा अनेकांचा अंदाज होता," असं सुरेश चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
पण लातूर जिल्ह्यातील कटगाव तांडा या गावातील धेनू चव्हाण (105) आणि मोटाबाई चव्हाण (95) या वयोवृद्ध दाम्पत्याने आता कोरोनावर मात केलीय.
 
"वडिलांचे वय 105 आणि आईचे वय 95 त्यामुळे कोरोनातून बरे होणारच नाहीत असं अनेक जण म्हणत होते. कोणालाही आशा नव्हती. पण हाय-फ्लो ऑक्सिजन आणि आयसीयूमध्ये पाच दिवस उपचार घेतल्यानंतर आता दोघेही कोरोनामुक्त होऊन घरी आले आहेत," असं सुरेश चव्हाण सांगतात.
 
मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात धेनू चव्हाण यांना ताप आला आणि त्यांच्या पोटात दुखत होतं. कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नी मोटाबाई चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.
 
'गाव पुन्हा पाहू शकेन का?'
"मी खूप घाबरलो होतो. मला काहीच कळत नव्हतं. गावाकडे सगळे सांगत होते की कोरोनावर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर मृतदेह पण मिळणार नाही. तेव्हा तिकडे जाऊ नका," असं सुरेश चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
कारण कोणालाच अपेक्षा नव्हती की शंभरी गाठलेलं दाम्पत्य कोरोनातून बरं होईल, असंही सुरेश सांगतात.
 
सुरेश चव्हाण यांच्या आई-वडिलांसह कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात तीन लहान मुलंही होती.
 
"वय कितीही असलं म्हणून काय झालं उपचारासाठी आई-वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करायलाच हवं यावर मी ठाम होतो," असं सुरेश चव्हाण यांनी नमूद केलं.
 
धेनू आणि मोटाबाई चव्हाण यांना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चार दिवस ऑक्सिजन आणि पाच दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतल्यानंतर दोन दिवस डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांना ठेवण्यात आले. नऊ दिवसांनी दोघंही कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
 
सुरेश चव्हाण सांगतात, एवढ्या दिवसांपासून वडील सांगत होते की त्यांनी निजामाचा काळ पाहिला आहे, प्लेग आणि इतर साथीचे रोग पाहिले आहेत. दर 80-90 वर्षांनी अशी साथीच्या आजाराची लाट येत असते असं त्यांचं मत आहे.
 
सुरेश चव्हाण दररोज आपल्या पालकांना भेटण्यासाठी रुग्णालयात जात होते. कोरोना वॉर्डाच्या बाहेरून काचेच्या खिडकीतून आई-वडिलांना भेटायचे.
 
ते सांगतात, "वॉर्डात दररोज कोणाचा तरी मृत्यू होत होता. ते पाहून वडील मला खिडकीतून सांगायचे मला इथून घरी घेऊन चल. इथे राहिलो तर मी पुन्हा घरी येऊ शकणार नाही. मी पुन्हा माझं गाव पाहू शकेन का?"
 
दुसऱ्या बाजूला 95 वर्षांच्या मोटाबाई चव्हाण यासुद्धा त्याठिकाणी उपचार घेत होत्या. त्यांची प्रकृती गंभीर होती.
 
"मी आता वाचत नाही असं आई सारखी म्हणायची. मला जेवण गोड लागत नाही. काहीच खावंसं वाटत नाही. जेवण जात नव्हतं म्हणून त्यांना फळं आणि फळांचा रस देत होतो." असंही सुरेश सांगतात.
 
कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी पोहचल्यावर मोटाबाई चव्हाण म्हणाल्या, "मला कोरोना झाला होता पण आता मी बरी आहे. मी जिंकले." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
धेनू आणि मोटाबाई चव्हाण यांना एकूण आठ अपत्य. चार मुलं आणि चार मुली. सर्वांत मोठ्या मुलाचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. सुरेश चव्हाण हे त्यांचे तीन नंबरचे चिरंजीव.
 
'50 वर्षं शेती केल्याने प्रतिकार क्षमता जास्त असणार'
"ते सांगायचे डॉक्टर तुम्ही उपचार करा, बाकी आमचं नशीब," चव्हाण दाम्पत्यावर उपचार करणारे डॉ. गजानन हळखंचे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
ते म्हणाले, "दोघंही वयोवृद्ध होते. त्यामुळे ती एक काळजी होती. रुग्णालयात आले तेव्हा दोघांनाही दम लागत होता. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. ताप आणि खोकला अशीही लक्षणं होती. त्यामुळे त्यांना तातडीने हाय फ्लो ऑक्सिजन लावले."
 
धेनू आणि मोटाबाई चव्हाण तीन दिवस ऑक्सिजनवर होते. तसंच रेमडेसिव्हीर, स्टेरॉईड आणि सिपॅरीन इंजेक्शनचे डोस दिल्याचंही डॉ. हळखंचे सांगतात. त्यांचे एचआरसीटी करण्यात आले. त्यांचा स्कोअर 15/25 असा होता.
 
डॉ. हळखंचे म्हणाले, "चौथ्या दिवशी दोघांमध्येही चांगली सुधारणा दिसू लागली. दोघंही उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत होते. आम्ही ऑक्सिजन काढला आणि दोन दिवस त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवले."
 
5 एप्रिल रोजी धेनू चव्हाण यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले तर दोन दिवसांनी मोटाबाई चव्हाण यासुद्धा बऱ्या झाल्या.
 
जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. चव्हाण दाम्पत्य लसीकरणाच्या पहिल्या टप्यातच लस घेण्यासाठी पात्र होते. पण दोघांनीही लस घेतली नव्हती.
 
"एवढं वय झाल्याने लस घेऊन काय फायदा? लसीमुळे आपल्याला काही झालं तर? अशी भीती त्यांच्यात होती." असं डॉ. हळखंचे सांगतात.
 
वेळेत निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे
शंभरी गाठलेले वयोवृद्ध दाम्पत्य कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करू शकले यातील महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वेळेत लक्षात आले आणि त्यांचे उपचारही वेळेत होऊ शकले असं डॉक्टर सांगतात.
 
तसंच दोघांचीही प्रतिकार क्षमता कमालीची आहे असंही डॉक्टरांना वाटतं.
 
"त्यांचे कुटुंबीय सांगत होते त्यांनी तब्बल 50 वर्षे शेती केली. त्यामुळे कष्टाची सवय अर्थातच त्यांना आहे. कदाचित यामुळे दोघांचीही प्रतिकार क्षमता चांगली आहे. याचीही उपचारादरम्यान मदत होत असते." असं डॉ. गजानन हळखंचे म्हणाले.
 
लातूरमध्ये दर दिवशी साधारण 1200-1300 नवीन रुग्णांची नोंद होत आहे. आगामी काळात ही संख्या वाढेल अशी भीतीही डॉक्टरांनी व्यक्त केली.
 
डॉ. हळखंचे सांगतात, "याचे मूळ कारण म्हणजे लोक खूप उशीर झाल्यानंतर रुग्णालयाकडे येतात. लक्षणं अंगावर काढतात. कोरोनाची चाचणी करून घेत नाहीत. वयोवृद्ध लोक कोरोनाची लस घेत नाहीत."
 
सुरेश चव्हाण शेवटी सांगतात, "आपण पाहतोय मोठ्या संख्येने लोकांमध्ये कोरोनाची भीती आहे. मृत्यूचा आकडाही प्रचंड आहे. पण आपण धीर सोडू शकत नाही. सकारात्मक विचार करू शकतो. हेच आपण या उदाहरणावरून लक्षात घ्यावे असे आम्हाला वाटते."