गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : मंगळवार, 20 एप्रिल 2021 (21:44 IST)

हिमालयातलं अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली मराठमोळी प्रियांका

-जान्हवी मुळे
साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिमालयातलं अन्नपूर्णा-1 हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. शुक्रवारी दुपारी प्रियांकानं हे शिखर सर केलं. तिच्यासोबत भगवान चवले आणि केवल कक्काही टीममध्ये होते.
 
विशेष म्हणजे त्याआधी शुक्रवारीच दुपारी 2.15 वाजता पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या तीन गिर्यारोहकांनी अन्नपूर्णा-1 वर यशस्वी चढाई केली होती.
 
गिरीप्रेमी च्या टीममधील भूषण हर्षे, डॉ. सुमित मांदळे आणि जितेंद्र गावरे यांनी शिखरावर यशस्वी चढाई केली तर ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं.
 
8,091 मीटर उंचीचं हे शिखर सर करणारी गिरीप्रेमी ही भारतातली पहिली नागरी संस्था ठरली आहे.
 
अन्नपूर्णा-1 हे शिखर उंचीच्या मानानं जगात दहाव्या क्रमांकावर आहे. मात्र ते सर्वांत खडतर शिखर मानलं जातं. गंडकी आणि मार्श्यंगदी या हिमनद्या इथून वाहतात.
 
नासा अर्थ ऑब्झर्व्हेटरीनुसार हिमालयातल्या वेगवान वारा आ सतत हिमस्खलनाचा धोका यामुळे अन्नपूर्णा रेंजमध्ये कुठल्याही शिखरावर चढाई सोपी नाही. म्हणूनच इथे आजवर अडीचशेच्या आसपास गिर्यारोहकांनाच यशस्वी चढाई करता आली आहे.
 
महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांचं हे यश आणखी विशेष ठरतं, कारण कोव्हिडच्या साथीच्या काळात ही मोहीम त्यांनी पार पाडली आहे. लॉकडाऊनची अनिश्चितता, तयारीसाठी मिळालेला मर्यादित वेल, कोरोना विषाणूची भीती, अशा अनेक अडचणींवर मात करत त्यांनी हे यश मिळवलं आहे.
 
गिरीप्रेमीनं सर केलेलं हे आठ हजार मीटर उंचीवरचं आठवं हिमशिखर ठरलं आहे. याआधी 2012 साली गिरीप्रेमीनं एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती. त्यानंतर ल्होत्से, मकालू, च्यो ओयू, धौलागिरी, मनास्लू आणि कांचेनजुंगा ही शिखरंही त्यांनी सर केली आहेत.
 
तर प्रियंकानं याआधी माऊंट एव्हरेस्ट, ल्होत्से, माऊंट मकालू अशी शिखरं सर केली होती.