रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 30 सप्टेंबर 2019 (13:43 IST)

मनसे विधानसभा निवडणूक लढवणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही विधानसभेची निवडणूक लढवणार, अशी घोषणा अखेर राज ठाकरे यांनी केली आहे.
 
5 ऑक्टोबर रोजी पक्षाची पहिली प्रचारसभा होणार, असंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
पक्षाची ताकद विधानसभेत दाखवणार, असं बोलून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यांनी त्यावेळी तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या कॉर्पोरेट-स्टाईल प्रचारसभांमुळे राज चर्चेत आले होते.
 
पण एकीकडे भाजप आणि शिवसेना यांच्या विधानसभेसाठीच्या प्रचारयात्रा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीही आपापल्या जागावाटपाची चर्चा करत होते. मात्र या सर्व गडबडीत मनसेच्या तंबूत शांतता असल्याने, राज ठाकरे हे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूक लढवणार नाही का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले होते.
 
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या एका ताज्या विधानानं नव्या चर्चेला उधाण आलं होतं. पवार यांनी नुकतंच नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, अशी राज ठाकरेंची भूमिका मांडली होती. पण आम्ही ती भूमिका मान्य नाही."
 
त्यामुळे राज ठाकरेंच्या निवडणूक मोहिमेचं नारळ फुटणार की नाही, याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम होता.
 
मात्र यंदा निवडणुकांना अवघे तीन आठवडे उरले असताना राज यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यातच एका आठवड्याने, म्हणजेच 5 ऑक्टोबरला पक्षाची पहिली सभा होणार आहे.
 
काही दिवसांपूर्वी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मनसे नाशिकमध्ये सर्व 13 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं होतं. "मात्र अंतिम निर्णय हा राजसाहेब घेतील," असं ते त्यावेळी म्हणाले होते.