बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जुलै 2023 (23:17 IST)

महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी कोणी दिली? त्यावरून आता का वाद होतोय?

Mahatma Gandhi
अशोक पांडे
 मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी, बापू किंवा राष्ट्रपिता. गेल्या कित्येक दशकांपासून ही सगळी नावं समानअर्थी आहेत.
 
त्यांचं पूर्ण नाव क्वचितच कोणी घेतलं असेल. जिना, सावरकर आणि डॉ आंबेडकर वगळता त्यांना कोणा महत्त्वाच्या भारतीय नेत्याने मिस्टर गांधी म्हटल्याचं ऐकिवात नाही.
 
जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल त्यांच्या पत्रात ‘डियर बापूजी’ असा मायना लिहायचे.
 
गुजराती वळणानुसार गांधींचे पुत्र आणि अन्य जवळचे लोक त्यांना ‘बापूजी’ म्हणायचे. काँग्रेसच्या तरुण नेत्यांनी हे संबोधन वापरायला सुरुवात केली.
 
त्यांच्या पत्नी कस्तूर आफ्रिकेतच सगळ्यांच्या ‘बा’ बनल्या होत्या. हेच संबोधन त्यांच्या नावात जोडलं गेलं आणि त्या कस्तुरबा या नावाने ओळखल्या जायला लागल्या.
 
चंपारण्यच्या आंदोलनानंतर गांधींना आणखी एक नवं संबोधन मिळालं – महात्मा. त्यांना पहिल्यांदा या नावाने कोणी संबोधित केलं हे सांगणं कठीण आहे. पण त्याचं श्रेय रवींद्रनाथ टागोर यांना दिलं जातं. पण आपल्या सात्विक राहाणीमुळे त्यांनी देशभरातल्या लोकांना प्रभावित केलं. ‘महात्मा’ हे नाव त्यांच्यासाठी ठरून गेलं.
 
अगदी त्यांचे विरोधकही आपल्या पत्रांमध्ये आणि संबोधनांमध्ये त्यांना ‘महात्माजी’ म्हणायचे. ‘जी’ हा प्रत्यय लावल्याशिवाय त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेनेही आपल्या कोर्टातल्या साक्षीत त्याचा उल्लेख केला नव्हता.
 
राष्ट्रपिता संबोधनावर वाद
पण आजकाल ‘राष्ट्रपिता’ हे संबोधन वादग्रस्त ठरलंय. उजव्या विचारसरणीचे लोक नेहमी प्रश्न विचारतात की गांधी ‘राष्ट्रपिता’ कसे असू शकतात?
 
वरवर गप्पा करणाऱ्या लोकांना एकवेळ सोडून देऊ पण अनेक लोक गंभीरतेने हा प्रश्न विचारतात की त्यांना ही पदवी का दिली गेलीये?
 
हाथरसचे रहिवासी गौरव अग्रवाल यांनी केलेल्या एका माहितीचा अधिकार याचिकेला उत्तर देताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने जानेवारी 2020 मध्ये स्पष्ट केलं भारत सरकारने ना कधी असा नियम बनवला ना या संदर्भात कोणता अध्यादेश काढला होता.
 
काँग्रेस सत्तेत असताना 2012 साली लखनऊच्या एका विद्यार्थ्याने त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे यासंदर्भात कायदा बनवण्याची मागणी केली तेव्हा गृह मंत्रालयाने स्पष्ट केलं की राज्यघटनेच्या कलम 18(1) नुसार शैक्षणिक पात्रता किंवा सैन्यातलं पद ही दोन क्षेत्र वगळता अशा कोणत्याही पदव्या दिल्या जात नाहीत.
 
आणखी एका प्रकरणात अनिल दत्त शर्मा नावाच्या एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करून महात्मा गांधींना अधिकृरित्या ‘राष्ट्रपिता’ घोषित करण्याची मागणी केली तेव्हा तत्कालीन सरन्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे आणि आणि आणखी दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हे मान्य केलं की महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत आणि देशाला त्यांच्याप्रति अतिशय आदर आहे पण अशी अधिकृत पदवी देता येणार नाही, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली.
 
नुकतंच विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी एका चर्चेदरम्यान महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणण्यास नकार दिला. त्यांनी प्रश्न विचारला की, “हजारो वर्षं जुन्या संस्कृतीचा कोणी पिता कसं असू शकतं?”
 
त्यामुळे महात्मा गांधींना हे ‘राष्ट्रपिता’ ही पदवी कोणी दिली आणि त्याच्या मागे काय कारण होतं असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.
 
तुरुंगात कस्तुरबांचा मृत्यू
‘भारत छोडो’ आंदोलनाची लाट भारतात वेगाने पसरत होती तेव्हाची गोष्ट. इंग्रजांनी काँग्रेसला बेकायदेशीर घोषित करत पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना अटक केली होती.
 
महात्मा गांधी आपल्या पत्नी कस्तुरबा, खाजगी सचिव महादेव देसाई आणि आणखी काही लोकांसह पुण्यातल्या आगा खान पॅलेसमध्ये अटकेत होते.
 
आगा खान पॅलेस फक्त नावाला महाल होता. आता त्यांचं स्मारक म्हणून जतन केलं जात असलं तरी त्यावेळी त्याच्या शेजारून गटारी वाहायच्या, दमट वातावरण होतं आणि डासांचं साम्राज्य होतं. तिथे असणाऱ्या मलेरिया होण्याची दाट शक्यता होती. याचं वर्णन स्टॅनली वॉलपार्ट यांनी आपल्या ‘गांधीज् पॅशन’ या पुस्तकात केलं आहे.
 
वॉलपार्ट यांनी म्हटलं की त्या काळातल्या सर्वात वाईट तुरुंगांपैकी एक हा तुरुंग होता. इथे अटकेत असताना 15 ऑगस्ट 1942 साली गांधींजींनी आपले खाजगी सचिव महादेव देसाई यांना गमावलं. त्यांचं वय फक्त 50 वर्षं होतं. याच वर्षी 22 फेब्रुवारीला कस्तुरबा गांधींचा मृत्यू झाला. स्वतः गांधीजींची तब्येत इतकी बिघडली की ब्रिटिशांनी त्यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी केली होती.
 
नेताजींनी लिहिलं पत्र
त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीहून जपानला पोचले होते. त्यांना ‘भारत छोडो’ आंदोलनामुळे प्रेरणा आणि उत्साह मिळाला. नेताजी भारताच्या स्वातंत्र्याचं जे स्वप्न पाहत होते त्यासाठी ‘भारत छोडो’ एक उत्तम संधी आहे असं त्यांना वाटत होतं.
 
त्यांना वाटत होतं की एकीकडे आझाद हिंद फौज जपानच्या मदतीने भारतात प्रवेश करेल. त्याचवेळी भारतात चाललेल्या आंदोलनामुळे लोक बंडखोरी करतील आणि इंग्रजांना पळवून लावणं सोपं होईल.
 
याचा उल्लेख रासबिहारी बोस यांच्या चरित्रात आहे. रासबिहारी बोस दीर्घकाळ जपानमध्ये राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांचे चरित्रकार ताकेशी नाकाजिमा यांनी ‘बोस ऑफ नाकामुराया’ मध्ये लिहिलं आहे की ते एकेकाळी सावरकरांचे चाहाते होते पण 1942 मध्ये सावरकर ब्रिटिशांचे समर्थक झाल्याचं पाहून ते निराश झाले आणि त्यांनी काँग्रेस भारतीय लोकांचा एकमेव प्रतिनिधी आहे असं म्हटलं.
 
22 फेब्रुवारी 1942 साली कस्तुरबा यांच्या मृत्युनंतर नेताजी सुभाषचंद्र बोसांनी गांधीजींना शोकसंदेश पाठवला. त्या पत्रात त्यांनी लिहिलं, “सौ कस्तुरबा गांधी आता या जगात नाहीत. पुण्यात ब्रिटिशांच्या कैदेत असताना 74 वर्षांच्या असताना त्यांचं निधन झालं. देशात आणि देशाबाहेर राहाणाऱ्या 38 कोटी 80 लाख भारतीयांसह मी तुमच्या दुःखात सहभागी आहे.”
 
या पत्रात त्यांनी महादेव देसाईंचीही आठवण काढली आणि कस्तुरबा यांच्या जीवनसंघर्षाचा उल्लेख करत त्यांना ‘भारतीयांची आई’ म्हटलं.
 
‘टेस्टामेंट ऑफ सुभाष बोस’ या पुस्तकाच्या पान क्रमांत 69-70 वर प्रकाशित झालेल्या या पत्राचं शीर्षक आहे – ‘भारतीय लोकांच्या आईला श्रद्धांजली’. हे संबोधन ‘राष्ट्रमाता’ च्या जवळपास जाणारं आहे पण याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचं दिसत नाही.
 
गांधींजींना म्हटलं ‘फादर ऑफ अवर नेशन’
यानंतर साधारण अडीच वर्षांनी त्यांनी महात्मा गांधीजींच्या नावे एक संदेश दिला. या आधीच्या संदेशांमध्ये ते गांधीजींना ‘महात्माजी’ म्हणायचे. पण 6 जुलै 1944 साली त्यांनी दिलेल्या संदेशात मायना होता – ‘फादर ऑफ अवर नेशन’ (राष्ट्रपिता).
 
जपानहून आजाद हिंद सेनेच्या रेडियोवरून सर्वात आधी हा संदेश प्रसारित झाला. त्यानंतर ‘ब्लड बाथ’ या पुस्तकात छापला आहे. सुगता बोस आणि शिशिर कुमार बोस यांनी नेताजींची पत्रं आणि संदशांचं संकलन ‘चलो दिल्ली’ या नावाने केलं आहे.
 
या पुस्तकात हा संदेश 212-222 या पानांवर छापला आहे तर ‘द इसेन्शियल रायटिंग्स ऑफ सुभाषचंद्र बोस’ या पुस्तकात पान क्रमांक 300-309 वर छापला आहे.
 
या भाषणात त्यांनी सुरुवातीला गांधींना नेहमीप्रमाणे ‘महात्माजी’ म्हटलं आहे. यानंतर आपल्या धोरणांवर सविस्तर चर्चा करत ब्रिटिश सत्तेपासून मुक्ती हवी असेल तर जपानची मदत कशी योग्य आहे याबद्दल सांगितलं आहे. पण या भाषणाच्या शेवटच्या वाक्यात ते म्हणतात की, ‘आमचे राष्ट्रपिता, भारताच्या या पवित्र मुक्तीलढ्यात आम्हाला तुमच्या आशिर्वादाची आणि तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.”
 
गांधीजींना कोणीही राष्ट्रपिता म्हणून संबोधण्याची ही पहिली वेळ होती. अर्थात हे संबोधन लगेच प्रचलित झालं नाही, हळूहळू वापरात आलं.