राज्यात विजेची विक्रमी मागणी , तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून वीजखरेदी
महावितरणच्या वीजमागणीत वाढ होऊन ती विक्रमी २५ हजार १४४ मेगावॉटवर गेली आहे. मागणी आणि पुरवठय़ातील तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून वीजखरेदी आणि महानिर्मितीकडून ३०० मेगावॉट वीज मिळण्यात आल्याचे सांगण्यात आले. विजेची तूट भरून काढण्यासाठी पुन्हा खुल्या बाजारातून १५०० ते २ हजार मेगावॉट वीज खरेदी करण्यात येत असून एकीकडे भारनियमनाचे चटके तर नंतर महाग विजेमुळे दरवाढीचे चटके सहन करण्याची वेळ वीजग्राहकांवर आली आहे.
मागील वर्षांच्या तुलनेत राज्यातील विजेची मागणी तब्बल ३५०० ते ४००० मेगावॉटने वाढली असून महावितरणच्या मागणीने २५,१४४ मेगावॅट असा नवा उच्चांक गाठला आहे. अभूतपूर्व विजेच्या मागणीमुळे वीजखरेदी देखील वाढविण्यात आली असून गेल्या २४ तासांत १२०० ते २ हजार मेगावॉट वीजखरेदी करण्यात आली. त्याचबरोबर कोस्टल गुजरात वीज कंपनीकडून ६६० मेगावॉट तर एनटीपीसीकडून नेहमीच्या ६५०० मेगावॉटच्याबरोबरच ६७३ मेगावॉट अतिरिक्त वीज १५ जूनपर्यंत मिळण्याची जुळवाजुळवा करण्यात आली आहे. तसेच एरवी महानिर्मितीच्या कोळसा आणि गॅस प्रकल्पांतून मिळून ७ हजार मेगावॉटपर्यंत वीज मिळते. ते प्रमाण शुक्रवारी ७३०० मेगावॉटपर्यंत वाढले. त्यामुळे तूट भरून काढून भारनियमन नियंत्रणात ठेवणे शक्य झाले. .