शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 16 डिसेंबर 2023 (17:01 IST)

गौतम सिंघानियाः घरगुती हिंसाचाराच्या आरोपानंतर 75% संपत्ती गमवावी लागणार?

Gautam Singhania
भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्या घटस्फोटाचं प्रकरण सध्या चर्चेचा विषय आहे. या प्रकरणात गौतम सिंघानिया यांना आपल्याकडील अंदाजे 1.1 अब्ज डॉलरच्या संपत्तीतील 75 टक्के वाटा गमवावा लागू शकतो.
 
गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी हे दोघेही शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपनी रेमंड ग्रुपचे प्रवर्तक भागधारक आणि बोर्डाचे सदस्य देखील आहेत. रेमंड समूह हा भारतातील एक सुप्रसिद्ध ब्रॅन्ड आहे.
 
उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्यापासून आता विभक्त झालेल्या नवाज एकेकाळी फिटनेस कोच होत्या. तर गौतम सिंघानिया यांना खाजगी विमानं आणि आलिशान यॉटच्या बरोबरीने वेगवान कारची आवड असलेले, अशी त्यांची ओळख आहे.
 
गौतम सिंघानिया यांच्यासोबत परस्पर सहमतीने वेगळं राहण्यासाठी पुढील व्यावहारिक बोलणी सुरू करण्यात आल्याच्या सर्व बातम्या साफ खोट्या असल्याचं नवाज मोदींच्या एका जवळच्या सूत्राने सांगितलं.
 
या सूत्राने बीबीसीला सांगितलं की, नवाज मोदी कंपनीमध्ये 75 टक्क्यांपेक्षा कमी हिश्श्यावर कोणतीही तडजोड करणार नाहीत.
 
दोन्ही बाजूंच्या कुटुंबातील दोन दोन सदस्य घटस्फोटाच्या अटींवर चर्चा करत आहेत आणि विभक्त होण्यासाठी अजूनही कंपनीचा 75 टक्के वाटा घेण्याचा पर्याय खुला असंल्याचं त्या सूत्राने बीबीसीला सांगितलं.
 
एका सूत्राने बीबीसीला सांगितलं की, ‘गौतम सिंघानिया यांनी आपले अनेक मित्र, मध्यस्थ, वकील आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्यासमोर आपली पत्नी नवाज यांना कंपनीतील 75 टक्के हिस्सा देण्याचं मान्य केलंय. आता ते यातून मागे हटू शकत नाहीत.’
 
याचबरोबर या सूत्राने हेदेखील सांगितलं की नवाज मोदी यावर ठाम आहेत की, त्यांचं आणि त्यांच्या दोन मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी संपत्ती अशा ट्रस्टकडे सोपविण्यात यावी जो कधीही बंद करता येणार नाही.
 
सिरिल अमरचंद मंगलदास या मुंबईतील कायदा कंपनीमध्ये भागीदार असलेले ऋषभ श्रॉफ म्हणतात की, भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबियांची जवळपास 96 टक्के मालमत्ता ट्रस्टकडे जमा आहे.
 
मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा पर्याय श्रीमंत व्यावसायिक घराण्यांसाठी एक आवडता पर्याय बनू पाहतोय. जेणेकरून ते आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतील आणि आपल्या व्यवसायाला दिवाळखोरीपासून, कुटुंबीय किंवा कर्ज देणा-यांसोबतच्या वादापासून दूर ठेवू शकतील.
 
आपल्या मालमत्तेची देखभाल करण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्याची गौतम सिंघानिया यांची तयारी आहे. मात्र त्यांची अशीही इच्छा आहे की त्या ट्रस्टचे फक्त ते एकमेव विश्वस्त असावेत आणि तो चालवणारेही तेच असावेत. परंतु नवाज मोदी यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावलाय.
 
ऋषभ श्रॉफ म्हणतात की, “एक निष्पक्ष तिसरा पक्ष म्हणून मला असं वाटतं की, त्यांनी ट्रस्टच्या अशा कोणत्याही रचनेला होकार देऊ नये ज्यामध्ये त्यांच्या शब्दाला काडीचीही किंमत नसेल. जो चालवताना त्यांचं कोणतंही म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही. त्यांना कुठलीही ठराविक भूमिका नसेल. या ट्रस्टमध्ये त्यांना सारखेच अधिकार मिळायला हवेत, ज्यामध्ये त्यांच्याकडे ट्रस्टची लाभार्थी होण्यासोबतच काही अधिकार देखील असतील.”
 
नवाज मोदी यांच्या एका जवळच्या सूत्राने बीबीसीला सांगितलं की, “बहुतांश कंपन्या तीन पिढ्यांच्या पुढे टिकू शकत नाहीत. मात्र रेमंडची पाचवी पिढी या व्यवसायात आहे आणि नवाज मोदी यांची इच्छा आहे की या व्यवसायात त्याच्या मुलींचं भविष्यही सुरक्षित राहावं.”
 
नवाज मोदी यांच्या बाबतीत असंही सांगितलं जातं की त्यांना कंपनीच्या बोर्डाचं सदस्यही राहायचंय. तसंच घटस्फोटानंतरही त्यांच्या पतीने या व्यवसायाची धुरा सांभळण्याबाबतही त्यांचा कोणताही आक्षेप नाही.
 
या प्रकरणी नवाज मोदी यांना त्यांचे सासरे ज्येष्ठ उद्योगपती विजयपत सिंघानिया यांनीदेखील पाठिंबा दिलाय.
 
2017 मध्ये गौतम सिंघानिया यांनी स्वत:चे वडील विजयपत सिंघानिया यांनाही घराबाहेर काढलेलं. विजयपत सिंघानिया यांचं असं म्हणणं होतं की, मुलाने माझ्या हाती एवढेही पैसे ठेवले नाहीत की मी माझ्या दैनंदिन गरजा भागवू शकेन. मात्र, गौतम सिंघानिया यांनी वडिलांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
 
वाद चव्हाट्यावर
नवाज मोदी यांचा एक व्हीडिओ यावर्षी व्हायरल झाल्यानंतर सिंघानिया दाम्पत्यामधील वाद चव्हाट्यावर आला. ज्यामध्ये त्यांना कंपनीच्या दिवाळीच्या पार्टीत सहभागी होण्यापासून अडविण्यात आलेलं.
 
व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर नवाज मोदी यांनी शंभर वर्षांहून जुन्या रेमंड ग्रुपचे मालक आणि आपल्या पतीवर काही गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याच्या आरोपांचाही समावेश आहे.
 
या आरोपांबाबत बोलण्याबद्दल गौतम सिंघानिया यांनी बीबीसीला नकार दिला.
 
मुलाखतीची विनंती केली असता गौतम सिंघानिया यांच्या प्रवक्त्याने बीबीसीला गौतम सिंघानिया यांच्या त्या वक्तव्याचा संदर्भ दिला, ज्यामध्ये ते म्हणाले होते की, “माझ्या खाजगी आयुष्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये ज्या चर्चा सुरू आहेत त्याबद्दल काहीही न बोलण्याचा निर्णय मी घेतला आहे, कारण माझ्यासाठी माझ्या कुटुंबियांची प्रतिमा मलिन होऊ न देणं जास्त महत्त्वाचं आहे.”
 
तर दुसरीकडे त्यांची पत्नी नवाज मोदी यांनी सेलिब्रेटी पत्रकार आणि 'हॅलो! इंडिया'च्या माजी संपादक संगीता वाधवानी यांच्यासोबतच्या चर्चेत सांगितलं की त्यांच्या पतीने त्यांना मारहाण करून जखमी केलं होतं.. आणि त्यांनी हादेखील दावा केलेला की, या मारहाणीमुळे त्यांच्या कंबरेचं हाडदेखील मोडलं होतं.
 
त्यानंतर त्यांना स्वत:च्या बचावासाठी पोलिसांना बोलवण्यासाठी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीच्या कुटुंबियांकडे मदत मागावी लागलेली.
 
गौतम सिंघानिया यांच्याविरोधात मुंबईच्या दोन पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हेगारी कलमांतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये अटक किंवा चौकशी करण्यासाठी सर्वप्रथम न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.
 
संगीता वाधवानी यांनी सांगितलं की नवाज मोदी यांच्या शारीरिक स्थितीमुळे त्यांना अजूनही काम करण्याची परवानगी नाही.
 
त्याचवेळी कंपनीच्या एका अंतर्गत ईमेलमध्ये गौतम सिंघानिया यांनी कर्मचा-यांना आणि भागधारकांना सांगितलंय की, या कठीण परिस्थितीमध्येही रेमंड ग्रुपचं ‘कामकाज सुरळीतपणे सुरू आहे.’ बीबीसीने त्यांचा हा ईमेल पाहिला आहे.
 
सिंघानिया कुटुंबाचा हा घरगुती वाद जेव्हा पहिल्यांदा समोर आला, तेव्हा रेमंड ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, कंपनीने हळूहळू ही तूट भरून काढली आहे.
 
परंतु, या वादामुळे भारतीय समाजातील उच्चवर्गातील घरगुती हिंसाचाराच्या आरोपांना घेऊन अस्वस्थता निर्माण करणारे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या वादामुळे भारतातील अनेक व्यावसायिक घरण्यांच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सबाबतही शंकाकुशंका निर्माण झाल्या आहेत.
 
व्यवसायावर कोणताही परिणाम नाही
शेअर बाजाराला या महिन्याच्या सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार, रेमंडच्या स्वतंत्र संचालकांनी सांगितलं की ते अल्पसंख्याक भागधारकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत.
 
रेमंड समूहाच्या दोन प्रवर्तक संचालकांमधील वादाचा कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांच्या कंपनीचं कामकाज चालवण्याच्या क्षमतेवर कोणताही परिणाम झालेला नाही, असेही ते म्हणाले.
 
या स्वतंत्र संचालकांनी शेअर बाजाराला असंही सांगितलं की, सिंघानिया दाम्पत्य आणि त्यांच्या कुटुंबातील वादाच्या तपासाचा स्वतंत्र संचालकांच्या जबाबदारीशी काहीही संबंध नाही.
 
परंतु, कॉर्पोरेट गव्हर्नन्सबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर अॅडव्हायझरी सर्व्हिसेस (आयआयएएस) सारख्या सल्लागार कंपन्यांनी एका खुल्या पत्रात कंपनीच्या कामकाजाबाबत रेमंडच्या बोर्डाला जे प्रश्न विचारले होते त्यांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत.
 
या प्रश्नांमध्ये कौटुंबिक वादामुळे कंपनीचं अपराधी दायित्व आणि व्यक्तिगत वादांमुळे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून गौतम सिंघानिया यांच्या व्यावसायिक जबाबदारी पार पाडण्याच्या क्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
 
गौतम सिंघानिया यांना कंपनीचे पैसे वैयक्तिक फायद्यासाठी वापरता येणार नाही, यासाठी पुरेशी व्यवस्था आहे का, याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आलेली. कारण, नवाज मोदींनीही आपल्या पतीवर असा आरोप केला होता. या आरोपाबाबत बीबीसीच्या प्रश्नांना रेमंडने उत्तरं दिलेली नाहीत.
 
सल्लागार कंपनी आयआयएसच्या हेतल दलाल यांनी बीबीसीला सांगितलं की, "नवाज मोदींनी कंपनीत चाललेला असलेला अनागोंदी कारभार उघड केलाय. अशा परिस्थितीत रेमंडच्या ऑडिट कमिटीला या मुद्याकडे लक्ष द्यावं लागेल. ही वैवाहिक आयुष्यातील समस्या असल्याचा युक्तिवाद करून ते यातून सुटू शकत नाहीत."
 
हेतल म्हणाल्या की या प्रकरणी कंपनीच्या अशा वागण्यामुळे त्यांची अत्यंत निराशा झाली आहे.
 
कंपनीच्या बोर्डाने या प्रकरणी सल्ला देण्यासाठी एक वरिष्ठ वकिल बर्जीस देसाई यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. पण, सूत्रांनी बीबीसीला सांगितलं की, नवाज मोदी या नियुक्तीबाबत खूश नाहीत.
 
सध्या कंपनीच्या शेअर्समध्ये होणारी घसरण थांबवण्यात यश आलंय, तर एकेकाळी कंपनीच्या शेअर्समध्ये वीस टक्क्यांपर्यंत घसरण आली होती. पण रेमंडचे शेअर्स सुधारण्यामागे बोर्डाचं पत्र असल्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. की रेमंडच्या शेअर्सलाही शेअर बाजारात आलेल्या तेजीचा फायदा झालाय.
 
कंपनीच्या प्रवर्तकांमधील वादाची सावली या व्यवसायावर कायम राहण्याची दाट शक्यता आहे. जाणकारांचं असं म्हणणं आहे की गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी विभक्त झाल्यास अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, ज्याचा परिणाम कंपनीच्या भागधारकांवरही होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये मालकी हक्क किंवा मतदान करण्याच्या पद्धतींमधील बदलांचाही समावेश आहे.
एका वरिष्ठ कॉर्पोरेट वकिलांनी बीबीसीला सांगितलं की, या वादावर लवकर पडदा पडण्याची चिन्हं दिसत नाहीत. कारण गौतम सिंघानिया यांची जास्तीतजास्त मालमत्ता रेमंडमधील त्यांच्या 49 टक्क्यांच्या वाट्याच्या रूपात आहे.
 
गौतम सिंघानिया यांना आपला वाटा पूर्णपणे वाचवणंही कठीण जाऊ शकतं, असंही ते म्हणाले. कारण, आपल्या पत्नीसोबतच्या वादावर तोडगा काढण्यासाठी त्यांना मोठी रक्कम खर्च करावी लागली तर त्यांना काही पैसे उसने घ्यावे लागतील किंवा आपल्या काही मालमत्ता विकाव्या लागतील.
 
हेतल दलाल म्हणाल्या की, सर्वप्रथम कंपनीला या वादापासून संरक्षण द्यायला हवं आणि गौतम सिंघानियांना कंपनीपासून वेगळं केलं पाहिजे. कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप असलेल्या अध्यक्षांना पदावर ठेवल्याने कंपनीच्या व्यावसायिक संस्कृतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. रेमंडच्या बोर्डाने या मुद्यांचं निराकरण करण्याची आवश्यकता आहे.
 
सर्वांपासून लपवून ठेवण्यात आलं
प्रसिद्ध लेखिका शोभा डे म्हणतात, "भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील महिलांवरील हिंसाचाराची प्रकरणं काही नवीन नाहीत. खरंतर, भारतातील व्यावसायिक घराण्यांमधील हे एक असं गुपित आहे, जे आजवर लपवून ठेवण्यात येत होतं.“
 
शोभा डे सांगतात, या वादावर तोडगा निघण्याबाबत त्यांना अनेक शंका आहेत. कारण सर्वशक्तीमान लोकांना अनेक गोष्टींचा फायदा मिळतो.
या देशात प्रश्न विचारणा-यांचं तोंड बंद करणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे.”, असंही त्या म्हणाल्या.
 
भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या अनेक कंपन्यांमध्ये प्रवर्तकांकडे मालकी हक्क असतो. त्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळावरील सदस्यांच्या नियुक्तीवरही त्यांचा बराच प्रभाव असतो.
 
त्यामुळे अनेकदा असे प्रश्न उपस्थित झाले आहेत की, बोर्डाच्या स्वतंत्र संचालकांना वास्तवात किती स्वातंत्र्य असतं आणि त्यांना आपला विरोध दर्शवण्यात व कंपनीच्या कारभाराची जबाबदारी पार पाडण्यास ते कितपत सक्षम असतात.
 
शोभा डे यांना वाटतं की ही कठीण आणि दीर्घकाळ चालणारी लढाई असणार आहे.
 
शोभा डे म्हणतात की, “पुढे जाऊन हेदेखील लक्षात येईल की नवाज मोदी किती हुशारीने व्यवहारातल्या वाटाघाटी करतात."
 
“एका परिपूर्ण पुरुषाची गोष्ट कायमच परिपूर्ण राहील.”, असंही त्या म्हणतात.
 
खरंतर, शोभा डे यांचा रोख रेमंडच्या जाहिरातीमधील त्या प्रसिद्ध वाक्याकडे (द कम्प्लिट मॅन) आहे, जे 1980 च्या दशकापासून रेमंडची ओळख आहे.
 
Published By- Priya Dixit