सलग तीन आर्थिक वर्षांमध्ये घोटाळे, हजारो कोटींचे नुकसान
देशातील वाणिज्य बँकांचे आर्थिक वर्ष २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ अशा तीन सलग आर्थिक वर्षांमध्ये घोटाळ्यांपायी अनुक्रमे १६,४०९ कोटी रुपये, १६,६५२ कोटी रुपये आणि ३६,६९४ कोटी रुपये असे नुकसान झाले आहे, अशी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी लेखी उत्तरादाखल दिली. २०१७-१८ सालातील ३६,६९४ कोटी रुपयांमध्ये फेब्रुवारीत उघडकीस आलेल्या पंजाब नॅशनल बँकेशीसंलग्न कुख्यात नीरव मोदी-मेहुल चोक्सीप्रणीत १४,००० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचाही समावेश आहे.
हे घोटाळे कर्जमंजुरीतील गैरव्यवहार, हमी पत्रांचे वितरण याच्याशी निगडित असून, ते ज्या वर्षांत सूचित करण्यात आले त्यानुसार त्या त्या वर्षांत त्यांची रक्कम जमेस धरण्यात आली आहे. प्रत्यक्षात हे गैरव्यवहार आधीही घडले असण्याची शक्यता शुक्ला यांनी व्यक्त केली.