शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (07:43 IST)

अवकाळीचा मिरची, मसाला बाजाराला फटका

नवी मुंबई : या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतक-यांना फटका बसला आहेच. परंतु याचा विपरित परिणाम शहरी जनजीवनावरही होणार आहे. या पावसाने मसाल्यासाठी लागणा-या लाल मिरचीचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे बाजारात येण्यासाठी सज्ज आणि रोपांवर तयार असलेली लाल मिरची पाण्याखाली गेली आहे.
 
परिणामी, मुंबईच्या बाजारात येण्यासाठी सज्ज असलेल्या लाल मिरचीचे आगमन आता लांबणीवर पडले आहे. त्यामुळे घरोघरी वर्षभरासाठी मसाला तयार करण्यासाठी लागणा-या लाल मिरचीची टंचाई भासून त्यांचे दर वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात दिवाळीनंतर मसाल्याच्या मिरचीची आवक सुरू होते. दररोज दोन-चार गाड्यांपासून सुरू झालेली आवक फेब्रुवारी ते मेपर्यंत १०० गाड्यांवर पोहोचते.
 
मसाला बाजारात महाराष्ट्रातील नंदुरबारसह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात आवक होते. यासाठी येथे मोठ्या प्रमाणात मिरची साठवून ठेवली जाते.
मात्र या सर्व ठिकाणी मोठा पाऊस झाल्यामुळे येथील मिरची पूर्णपणे भिजली आहे. मिरचीचे आगर समजल्या जाणा-या नंदुरबारमधून मसाल्यासाठी लागणारी मिरची मोठ्या प्रमाणात येत असते. मात्र या सर्व ठिकाणी आलेल्या अवकाळी पावसाने ही लाल मिरची भिजवली आहे. त्यामुळे मिरचीचे आणि पर्यायाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात असलेल्या ३० हजार क्विंटलहून अधिक मिरचीचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. हे फार मोठे नुकसान असल्याने मुंबईसारख्या बाजारात मसाल्याच्या हंगामात मिरचीची टंचाई भासण्याची शक्यता आहे.