शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019 (10:26 IST)

‘दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा मराठी ट्रेलर लाँच

अडीचशे वर्षांनंतरही राणी लक्ष्मीबाई यांची शूरगाथा आणि त्यांनी गाजवलेले पराक्रम आजच्या पिढीसाठी आदर्श आहेत. राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा लोकांच्या मनात कोरली गेली आहे. स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी सेनानी असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर आधारित, स्वाती भिसे दिग्दर्शित, केयेन पेपर प्रॉडक्शन निर्मित आणि पीव्हीआर पिक्चर्स घेऊन येत आहे ‘दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’ हा हॉलिवूड चित्रपट. हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबर रोजी मराठी आणि इंग्लिशमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 
या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पुण्यात नुकताच पार पडला. या वेळी दिग्दर्शिका स्वाती भिसे यांच्यासह झाशीच्या राणीची भूमिका साकारणारी देविका भिसे, अजिंक्य देव, आरिफ झकारिया, दीपल दोशी, नागेश भोसले, यतीन कार्येकर, औरोशिखा डे, मंगल सानप, नयना सरीन, पल्लवी पाटील उपस्थित होते. 'दि मॅन हू क्न्यु इन्फिनिटी'चे निर्माता आता ‘दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’ हा एक अद्भुत कथा घेऊन येत आहेत. धाडसी आणि सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या 'राणी लक्ष्मीबाई' यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. जिने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी ब्रिटिशांविरोधात लढ्याचे रणशिंग फुंकले. अशा या धाडसी स्त्रीची यशोगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वाती भिसे म्हणतात, " या रणरागिणीच्या शूरकथा ऐकत आपण सर्व लहानाचे मोठे झालो. माझ्या मते भारतातील प्रत्येक लहान मुलाने गोष्टीच्या किंवा अभ्यासाच्या स्वरूपात झाशीच्या राणीची कथा ऐकली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मला संपूर्ण जगाला या हुशार, हिंमतवान, चाणाक्ष स्त्रीची ओळख करून द्यायची आहे. यापूर्वी मी अनेकवेळा राणी लक्ष्मीबाई यांची गोष्ट एक स्त्री, पत्नी, राणी म्हणून सांगितली आहे. मात्र सरतेशेवटी त्या एक स्वातंत्र्यसेनानी होत्या. ज्यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. अशा या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची गौरवगाथा मला माझ्या मातृभाषेत सादर करताना अतिशय आनंद होत आहे.''
 
या चित्रपटात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारणारी देविका भिसे तिच्या अनुभवाबद्दल सांगते, " 'दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’ हा हॉलिवूड मधील पहिला असा अ‍ॅक्शन सिनेमा आहे, ज्यात एका भारतीय स्त्रीच्या पराक्रमाची गाथा पाहायला मिळणार आहे. अशा भव्य आणि प्रेरणादायी चित्रपटाचा भाग असणे ही माझ्यासाठी खरंच खूप आनंददायी गोष्ट आहे. या चित्रपटातून राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाचे विविध पैलू पाहता येणार आहेत. या सर्व पैलूंना आजच्या काळातील सर्व स्त्रिया अगदी सहज स्वतःसोबत जोडू शकतात. मी अगदी  उत्सुकतेने हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल, याची वाट बघत आहे. १८५३ ते १८५८ या काळात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या झाशीचे ब्रिटिशांपासून रक्षण करण्यासाठी केलेल्या चळवळीचे चित्रण या चित्रपटात आपल्याला दिसेल.''