बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मे 2018 (08:37 IST)

आयपीएल : हैदराबाद प्ले ऑफमध्ये दाखल

यजमान दिल्लीचा ९ विकेट्सने दणदणीत पराभव करत हैदराबादने प्ले ऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. आयपीएलच्या ११ सत्रात प्ले ऑफमध्ये दाखल होणारा हैदराबाद पहिला संघ ठरला आहे.

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या १८८ धावांचे आव्हान हैदराबादने सहज गाठले. कर्णधार विलियम्सन आणि सलामीवीर शिखर धवनने दिल्लीची गोलंदाजी फोडून काढली. धवनने ५० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारसह नाबाद ९२ धावा केल्या, तर कर्णधार विलियम्सने ५३ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारसह नाबाद ८३ धावा केल्या. त्याआधी युवा फलंदाज ऋषभ पंतने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने सनरायझर्स हैदराबाद समोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या ऋषभ पंतने शक्तीशाली समजल्या जाणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने ६३ चेंडूत नाबाद १२८ धावा केल्या. आयपीएलच्या या सीझनमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ आणि जेसन रॉय झटपट परतले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरही पंतशी योग्य समन्वय न साधल्याने ३ धावांवर रन आऊट झाला. पंतने त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई केली. त्याने ५६ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांसह शतक झळकावले. पंतने ग्लेन मॅक्सवेल सोबत पाचव्या विकेट्ससाठी ६३ धावांची भागिदारी केली. भुवनेश्वरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आधी दोन  चौकार आणि नंतर सलग तीन षटकार खेचत त्याने २६ धावा केल्या. आयपीएलच्या या सीझनमधील हे तिसरे शतक आहे.