Budget 2021 : अर्थमंत्री सितारमन यांनी केला ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या विजयाचा उल्लेख
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये मिळवलेल्या विजयाचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की भारतीयांचा निर्धार हा ठाम असतो, त्यांनी हा विजय भारतीय तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारा असल्याचं म्हटलं.
निर्मला सितारमन यांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेमध्ये मिळवलेला विजय तरुणांमधील जिद्द आणि देशातील जनतेमधील इच्छाशक्ती दाखवणारा विजय असल्याचं म्हटलं. त्यांनी असेच करोनाच्या लढ्यामध्ये भारतीयांनी दाखवलेली जिद्दला सलाम केला.
उल्लेखनीय आहे की ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाच्या ३२८ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करीत तीन गडी राखून झुंजार विजय मिळवला. भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेवर २-१ असा कब्जा केला. २००० नंतरच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा हा विजय होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हे स्वप्न साकारले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या वचनाची आठवण करून दिली. ज्यावेळी पहाट अंधारलेली असते त्यावेळी विश्वास हाच आशेचा किरण असतो, आणि भारताची अर्थव्यवस्था अशाच प्रकारे झेप घेईल असा विश्वास दाखवला.