1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (22:26 IST)

IndvsEng : हेडिंग्ले टेस्टमध्ये जो रूटची शतकी खेळी; इंग्लंड मोठ्या आघाडीच्या दिशेने

पराग फाटक
इशांत शर्माच्या गोलंदाजीवर चौकार खेचत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने कारकीर्दीतील 23व्या शतकाची नोंद केलीय. यंदाच्या कॅलेंडर वर्षातलं रूटचे हे सहावं शतक आहे.
 
या मालिकेतील रूटचं हे सलग तिसरं शतक आहे. नॉटिंगहम, लॉर्ड्सपाठोपाठ हेडिंग्लेतही रूटने भारतीय संघाला शतकी तडाखा दिला. रूटचं भारताविरुद्धचं हे आठवं शतक आहे.
 
बिनबाद 120 वरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडने रूटच्या शतकी खेळीच्या बळावर 349/3 अशी मजल मारली आहे. रॉरी बर्न्स (61) आणि हसीब हमीद (68) या सलामीवीरांनी 135 धावांची सलामी दिली.
 
बर्न्सला मोहम्मद शमीने तर हसीबला जडेजाने बाद केलं. डॉम सिबलेच्या जागी संधी मिळालेल्या डेव्हिड मलानने 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
 
लॉर्ड्स टेस्टमधला फॉर्म कायम राखत रूटने मलान आणि बेअरस्टोबरोबर भागीदाऱ्या करत धावफलक हलता ठेवला. मोहम्मद सिराजने मलानला बाद केलं.
 
खेळपट्टीवर स्थिरावून आक्रमक पवित्रा स्वीकारलेल्या जॉनी बेअरस्टोला शमीने बाद केलं. त्याने 29 धावा केल्या. हेडिंग्ले टेस्टचा हा दुसराच दिवस असून, मोठी आघाडी घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न आहे. अजूनही 23 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे. नॉटिंगहम कसोटी पावसामुळे ड्रॉ झाली होती तर लॉर्ड्स टेस्ट भारताने जिंकत पाच टेस्टच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे.
 
जो रूटचं आणि महाराष्ट्राचं नातं तुम्हाला माहिती आहे का?
अहमदाबाद टेस्टमध्ये जो रूटने टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच डावात पाच विकेट्स घेण्याची किमया केली.
 
रूटने ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, वाॅशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांना बाद करत कारकीर्दीत पहिल्यांदा डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली.
 
6 फेब्रुवारी रोजी जो रूटने 100व्या टेस्टमध्ये द्विशतकी खेळी साकारली होती. शंभराव्या टेस्टमध्ये द्विशतक झळकावणारा रूट पहिलावहिला बॅट्समन ठरला होता.
 
रवीचंद्रन अश्विनच्या बॉलिंगवर षटकार खेचत रूटने द्विशतकाला गवसणी घातली. रूटच्या कारकीर्दीतलं हे पाचवं द्विशतक आहे.
 
काही दिवसांपूर्वीच रूटने श्रीलंकेत गॉल इथे 227,186 अशा मॅरेथॉन खेळी साकारल्या होत्या. सलग तिसऱ्या टेस्टमध्ये रूटने शतक झळकावलं आहे.
 
शु्क्रवारी शंभराव्या टेस्टमध्ये शतकी खेळी करणारा रूट हा नववा बॅट्समन ठरला होता. माईक कॉऊड्रे, जावेद मियाँदाद, गॉर्डन ग्रीनिज, अलेक स्टुअर्ट, इंझमाम उल हक, रिकी पॉन्टिंग, ग्रॅमी स्मिथ, हशीम अमला यांच्या मांदियाळीत रूटने स्थान पटकावलं आहे.
 
पण, इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या कारकीर्दीत भारताचं स्थान नेहमीच खास आहे. जाणून घेऊया रूटचा प्रवास.
 
ही गोष्ट 2012च्या डिसेंबर महिन्यातली. कोणत्याही संघाला विदेशात जाऊन टेस्ट मॅच जिंकणं तसंच टेस्ट सीरिज जिंकणं अवघड मानलं जातं. विशेषत: भारतीय उपखंडात जिंकणं फारच अवघड मानलं जातं.
 
घरच्या मैदानावरची भारतीय संघाची कामगिरी, बॅट्समनची भंबेरी उडवणारे फिरकीपटू, प्रचंड उकाडा आणि आर्द्रता, प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा यामुळे प्रतिस्पर्धी संघ भारतात येऊन गुडघे टेकतात असं सर्वसाधारण गेल्या दशकभराचं चित्र आहे.
 
अलिस्टर कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ 2012 भारत दौऱ्यावर आला होता. भारतीय खेळपट्ट्या आणि वातावरणाची सवय व्हावी याहेतूने काही युवा खेळाडूंना अभ्यासदौरा म्हणून आणण्यात आलं होतं. दौऱ्यातली पहिली टेस्ट अहमदाबादला झाली, पाहुण्यांनी ती गमावली. मालिकेत पुढेही हेच सुरू राहील असं वाटत असतानाच इंग्लंडने मुंबई आणि कोलकाता अशा दोन टेस्ट जिंकत आघाडी जिंकली.
 
शेवटची टेस्ट नागपुरात होती. ही टेस्ट जिंकून किंवा अनिर्णित राखून भारतात टेस्टमध्ये मालिका विजयाचा दुर्मीळ क्षण इंग्लंडला अनुभवायचा होता. इंग्लंडच्या निवडसमिती आणि संघव्यवस्थापनाने या टेस्टसाठी बॅटिंग बळकट करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यापुढे तीन पर्याय होते. एका नावावर पसंतीची मोहोर उमटवण्यात आली.
 
निळे डोळे, ब्राऊन रंगाचे भुरभुरणारे केस, मिश्कील हसणारा, शिडशिडीत बांध्याचा हा पोरगेला तरुण खरंच टेस्ट खेळण्यासाठी तयार आहे? असं वाटायचं.
 
इंग्लंड काऊंटी क्रिकेटमध्ये यॉर्कशायरसाठी तो मुलगा सातत्याने चांगलं खेळत होता. इंग्लंड अ संघाच्या बांगलादेश आणि श्रीलंका दौऱ्यातही त्याची कामगिरी उत्तम होती. त्याच काळात इंग्लंड लायन्स म्हणजे इंग्लंडचा युवा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. त्या मुलाकडे या संघाच्या नेतृत्वाची धुरा दिली जाणार होती.
 
नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं, चक्रं फिरली. त्या मुलाला अभ्यासदौरा सदराअंतर्गत भारतात पाठवण्यात आलं. नागपुरात जमठ्याला अचानकच इंग्लंडची टेस्ट कॅप मिळालेला तो मुलगा होता- जो रूट.
 
अष्टपैलू समित पटेलला वगळण्यात आलं आणि जो रूटला संधी मिळाली. त्या क्षणापासून आतापर्यंत म्हणजे 8 वर्षांत समित फक्त एक टेस्ट खेळला आणि रूट शंभराव्या टेस्टच्या उंबरठ्यावर आहे.
 
नियती म्हणा, योगायोग म्हणा किंवा विचारी लोकांचं द्रष्टेपण म्हणा- रूटला खेळवण्याचा निर्णय इंग्लंड क्रिकेटसाठी अतिशय मोलाचा ठरला. त्या निर्णयात धोका होता, आव्हान होतं. भारताने त्या टेस्टमध्ये चार फिरकीपटू खेळवले.
 
खेळपट्टी अर्थातच फिरकीला पोषक अशीच होती. नागपुरात गरम किती होतं याचा आपल्याला अंदाज आहे. पण रूटने पहिल्याच डावात खणखणीत आत्मविश्वासासह अर्धशतक झळकावलं. फिरकीपटूंसमोर त्याचं पदलालित्य विशेष भावणारं होतं.
टेस्ट अनिर्णित राहिली आणि इंग्लंडने भारताला भारतात 2-1 असं नमवण्याचा पराक्रम केला.
 
जो रूटच्या पदार्पणावेळी संघव्यवस्थापनासमोर अन्य दोन पर्याय होते- आयोन मॉर्गन आणि जॉनी बेअरस्टो. मॉर्गनची टेस्ट कारकीर्द बहरली नाही मात्र वनडे आणि ट्वेन्टी-20त तो संघाचा कणा झाला. मॉर्गनच्याच नेतृत्वात इंग्लंडने पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला.
 
रूटला समांतर अशा पद्धतीने कारकीर्द घडवणारा बेअरस्टो इंग्लंडच्या टेस्ट,वनडे, ट्वेन्टी-20 तिन्ही प्रकारात बॅट्समन आणि विकेटकीपर म्हणून संघाचा अविभाज्य भाग आहे. बेअरस्टो रूटच्या नेतृत्वात खेळतो तर वनडे आणि ट्वेन्टी-20मध्ये रूट, मॉर्गनच्या नेतृत्वात खेळतो. टेस्टचा टिळा माथी लागण्यासाठी शर्यतीत असणारं हे त्रिकुट सध्याच्या इंग्लंड संघाचे अग्रणीचे शिलेदार आहेत.
 
रूटने नागपुरात पदार्पण केलं त्याच टेस्टमध्ये भारताने रवींद्र जडेजाला पदार्पणाची संधी दिली. बदलत्या संघसमीकरणांमुळे जडेजा रूटच्या निम्म्या टेस्ट खेळला आहे.
 
नागपूर हा भारताचा केंद्रबिंदू. खंडप्राय देशाच्या मध्यातून जो रूटच्या क्रिकेट प्रवासाची नांदी झाली. देशविदेश, शतकं-द्विशतकं, भोपळे, फिरकी गोलंदाजी, अफलातून कॅचेस, यशापयश, कर्णधारपद, कडूगोड आठवणी, अभिमानास्पद क्षण, वनडे आणि ट्वेन्टी-20 अशी मुशाफिरी करून भारतातल्या दक्षिणाभिमुख चेन्नईत जो रूट शंभरावी टेस्ट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
 
इंग्लंडसाठी शंभर टेस्ट खेळणारा रूट 15वा खेळाडू ठरणार आहे. अलिस्टर कुक, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, अलेक स्टुअर्ट, इयन बेल, ग्रॅहम गूच, डेव्हिड गावर, मायकेल आथर्टन, कॉलिन काऊड्रे, जेफ्री बॉयकॉट, केव्हिन पीटरसन, इयन बोथम, अँड्यू स्ट्रॉस, ग्रॅहम थॉर्प या दिग्गजांच्या पंक्तीत रूटचा समावेश होतो आहे.
 
अपेक्षांचं ओझं पेलणारा नायक
जो रूटचे आजोबा, बाबा आणि भाऊ क्रिकेट खेळायचे. त्यामुळे क्रिकेटचे बाळकडू घरातूनच मिळालेले होते. रूट शाळेपासून क्रिकेट खेळू लागला. कॉलेजच्या टीमचंही तो प्रतिनिधित्व करायचा. हा टप्पा ओलांडल्यानंतर रूट यॉर्कशायरसाठी खेळू लागला. इंग्लंड क्रिकेटचे भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे जेफ्री बॉयकॉट यॉर्कशायरचे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनही यॉर्कशायरचाच.
चांगल्या बॅटिंगचा वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येतो असं म्हणतात. यॉर्कशायर क्रिकेट तसंच इंग्लंड क्रिकेट वर्तुळातल्या जाणकारांचं रूटकडे बारीक लक्ष होतं. कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच रूटकडे नेक्स्ट बिग थिंग म्हणून पाहिलं गेलं.
 
हा इंग्लंडचा मुख्य बॅट्समन असेल, हा भावी कर्णधार आहे अशा अपेक्षांची झूल रूटच्या खांद्यावर लहान वयातच ठेवली गेली. एकप्रकारे कर्तृत्वाने मोठं होण्याचा सक्तीवजा आग्रह भवतालातून होत होता. चुका करण्याची संधी रूटला मिळालीच नाही.
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून हा बॅटिंगचा आधारवड असेल, हाच आमचा भविष्यातला नेता असंच रूटबद्दल बोललं गेलं. उदयोन्मुख, होतकरू अशी विशेषणं रूटच्या नावाला चिकटलीच नाहीत. त्याने परिपक्व स्वरुपाची बॅटिंग करावी, सर्वसमावेशक राहून संघाची मोट बांधण्यासाठी योजना आखाव्यात अशा अपेक्षा ठेवण्यात आल्या.
 
दडपणाखाली, दबावात मोठमोठी माणसं स्वत्व हरवून बसतात. लौकिकाला साजेसं काम त्यांच्या हातून होत नाही. काही नैराश्य, चिंतेची शिकार होतात. रूटने या अपेक्षांची ढाल केली आणि प्रत्येक मॅचगणिक स्वत:ला सुधारत गेला.
 
अदुभत सातत्य
जो रूट खास का? याचं उत्तर आकड्यांमध्ये आहे. पदार्पण ते शंभर टेस्ट (2012-2021) या प्रवासादरम्यान जो रूट फक्त 2 टेस्ट खेळू शकला नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर रूटच्या पदार्पणापासून त्याच्या शंभराव्या टेस्टपर्यंत इंग्लंडने 101 टेस्ट खेळल्या, रूट त्यापैकी 99 मध्ये संघाचा भाग होता.
 
रूट 101पैकी 99 टेस्ट खेळू शकला याचाच अर्थ कामगिरी आणि फिटनेस या दोन्ही आघाड्यांवर तो मजबूत होता. रूटला 2014मध्ये फक्त एकदा टेस्ट संघातून वगळण्यात आलं. पुढच्याच टेस्टमध्ये संघात परतल्यानंतर द्विशतक झळकावत रूटने निवडसमितीला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध एका टेस्टवेळी त्याने पॅटर्निटी लिव्ह घेतली होती.
रूटने 8 वर्षांत 99 टेस्ट खेळल्या आहेत. दरवर्षी सरासरी 12 टेस्ट रूट खेळला आहे. याव्यतिरिक्त तो वनडे आणि ट्वेन्टी-20 प्रकारातही खेळतो. प्रत्येक संघांचं कॅलेंडर भरगच्च असतं. विश्रांतीसाठीही फारसा वेळ नसतो. याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ, बॉलर बॅट्समनच्या तंत्रातील उणीवा शोधून काढतात आणि त्यानुसार आक्रमण केलं जातं. दशकभरापेक्षा कमी कालावधीत रूट टेस्टच्या शंभरीत पोहोचला आहे. याचाच अर्थ प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या आक्रमणाला पुरुन उरत रूटने हा मैलाचा दगड गाठला आहे.
 
आशियाई राजा आणि विदेशातही शेर
बॅट्समनच्या तंत्रकौशल्यांची खरी परीक्षा विदेशात होतं असं म्हटलं जातं. घरच्या मैदानावर शेर असणाऱ्या अनेक बॅट्समनची विदेशात गेल्यानंतर गाळण उडते. मायदेशातली कामगिरी आणि विदेशातली कामगिरी यामध्ये जमीन-अस्मानचं अंतर राहतं. जो रूट याबाबतीत अपवाद आहे.
 
भारत, श्रीलंका, बांगलादेश, दुबईत फिरकीला अनुकूल खेळपट्यांवर फिरकीपटू करामत दाखवत असतानाच जो रूटने आपली बॅट परजली आहे.
 
रूट ज्या पद्धतीने फिरकीपटूंना सामोरा जातो ते आम्ही सगळ्यांसाठी वस्तुपाठ आहे अशी प्रतिक्रिया इंग्लंड संघातले बाकी बॅट्समन देतात. मागच्याच आठवड्यात रूटने श्रीलंकेतल्या गॉल इथे 228, 186 अशा मॅरेथॉन खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेत बॉलला प्रचंड उसळी मिळणाऱ्या खेळपट्या असतात. रूटने तिथेही सराईतपणे रन्स केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये आग ओकणाऱ्या फास्ट बॉलर्सची चौकडी, त्यांना पोषक खेळपट्ट्या, बोचरे वारे यांचा समर्थपणे सामना करत रूटने द्विशतकी खेळी साकारली होती.
 
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया हे पारंपरिक द्वंद्व अॅशेस नावाने प्रसिद्ध आहे. रूट हा इंग्लंडचा हुकूमी एक्का आहे हे लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने त्याला लक्ष्य केलं. ऑस्ट्रेलियाने रूटला त्यांच्या देशात शतक करू दिलं नाही मात्र रूटने झगडत, संघर्ष करत, सुधारणा करत रूटने धावांचं रतीब घालणं सोडलं नाही.
 
फॅब फोर कलाकार
एकाच कालखंडात, साधारण एकाच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकणाऱ्या समवयस्क चौकडीला फॅब फोर अशी उपमा न्यूझीलंडच्या मार्टिन क्रो यांनी दिली. या चौकडीत भारताचा विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ, इंग्लंडचा जो रूट आणि न्यूझीलंडचा केन विल्यसमन यांचा समावेश होतो.
 
हे चौघं आपापल्या संघाचे प्रमुख बॅट्समन आहेत, कर्णधारही आहेत. चौघंही जगभर धावांच्या राशी ओतत असतात. खेळपट्टी, वातावरण, तिखट आक्रमण या सगळ्याचा यशस्वीपणे सामना करत हे चौघं धावांची टांकसाळ उघडतात आणि आपापल्या संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावतात.
विराट कोहली यंत्रवत सातत्य आणि प्रदर्शनासाठी ओळखला जातो. स्टीव्हन स्मिथ अनाकर्षक आणि प्रतिस्पर्धी बुचकळ्यात पडतील अशा पद्धतीने बॅटिंग करतो. केन विल्यमसनच्या बॅटिंगमध्ये देखणेपण आहे. त्याची बॅट कलात्मक नजाकत पेश करते.
 
जो रूट हा सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी आहे. तो मेहनती कलाकार आहे. जगावेगळं कौशल्य त्याच्याकडे नाहीये, एकेक धाव जमा करत तो धावांची तिजोरी उभी करतो. त्याच्या डावात भरपूर एकेरी-दुहेरी धावा असतात.
 
खेळपट्टीचा अंदाज आला की फटक्यांची पोतडी उघडतो. गवताला झिंग देणारा कव्हर ड्राईव्ह मारतो, बॉलरला हुकमत गाजवणारा पूलचा फटका मारतो. फिरकीपटूंना स्वीप करून जेरीस आणतो. खणखणीत स्ट्रेड ड्राईव्ह खेचतो. आधुनिकतेची साक्ष देणारा रॅम्पचा फटका खेळतो.
 
कॉमेंटेटर त्याचं वर्णन 'बिझी प्लेयर' असं करतात. स्वत:ही असतो आणि प्रतिस्पर्ध्यांनाही बिझी राहायला भाग पाडतो. प्रदीर्घ काळ खेळपट्टीवर ठाण मांडून मोठी खेळी केल्यानंतरही रूट ताजातवानाच दिसतो. कंटाळलाय, मरगटलाय असं होतच नाही.
लहान मुलांमध्ये निरागसता आणि उत्सुकता असते तशी रूटच्या व्यक्तिमत्वात आहे. त्याची धावांची भूक आटत नाही. त्याला प्रत्येक आव्हानासमोर स्वत:ला सिद्ध करायचं असतं. प्रतिस्पर्धी संघ त्याच्या बॅटिंगचा अभ्यास करतात. त्याच्यासाठी सापळे रचले जातात. सापळ्यात अडकू लागला की रूटचे सरावाचे तास वाढतात.
 
जादुई फिरकी
प्रमुख बॅट्समन आणि कर्णधारपद अशी दुहेरी जबाबदारी अंगावर असतानाही रूट बॉलिंग करतो. प्रमुख बॉलर्सना विश्रांती देऊन तो बॉलिंगला येतो.
आपल्या बॉलिंगवर बॅट्समन भरपूर रन्स लुटणार याची कल्पना असलेला रूट चतुराईने बॉलिंग करतो. चांगली जमलेली भागीदारी फोडतो. बॅट्समनला मोठा फटका खेळण्याच्या मोहात अडकवतो.
 
कर्णधारपदाचा काटेरी मुकूट
कर्णधारपद मिळाल्यानंतर अनेक खेळाडू कोशात जातात. खेळणारे अकराजण, राखीव खेळाडू, संघव्यवस्थापन, निवडसमिती, बैठका, प्रसारमाध्यमं, चाहते ही तारेवरची कसरत सांभाळून स्वत:ची कामगिरी उत्तम राखून संघाला जिंकून देणं हे अवघडच आहे.
साडेचार-पाच वर्षांपूर्वी जो रूटच्या हाती इंग्लंडचं नेतृत्व आलं. इंग्लंड क्रिकेट वर्तुळात अन्य देशातून क्रिकेटपटू येऊन स्थायिक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. इंग्लंड संघात विविध संस्कृतीचे, विविध देशांमधून आलेले क्रिकेटपटू दिसतात.
 
बहुविविधतेचा कालवा होऊ न देता माणसं जोडत संघबांधणीचं काम रूटने केलं. त्याला कोच आणि सपोर्ट स्टाफची साथ मिळाली. खेळाडूंशी सुसंवाद साधणं हे रूटचं कौशल्य असल्याचं अनेक इंग्लंडचे आजी-माजी खेळाडू सांगतात.
 
कर्णधारपदाचा काटेरी मुकूट मिळाल्यानंतरही रूटची बॅट म्यान झाली नाही उलट ती आणखी त्वेषाने तळपू लागली. कर्णधार म्हणूनही रूटची कामगिरी समाधानकारक आहे.
 
वर्कलोड मॅनेजमेंटनुसार इंग्लंडने दोन कर्णधार नेमण्याचा निर्णय घेतला. मी टेस्ट कॅप्टन आहे, मॉर्गनच्या नेतृत्वात कसा खेळू? असा अहंकारी मुद्दा रूटने मांडला नाही. अगदी सहजतेने तो मॉर्गनच्या नेतृत्वात खेळतो. इंग्लंडने वर्ल्डकप जिंकला त्या मोहिमेत इंग्लंडतर्फे सर्वाधिक रन्स रूटच्या नावावर होत्या.
 
आयपीएल नाही
भारतातल्या खेळपट्य़ांवर खेळण्यासाठी आवश्यक तंत्रकौशल्य, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं दमदार प्रदर्शन, फिटनेस, कामचलाऊ फिरकी, उत्तम फिल्डिंग, नेतृत्वगुण हे सगळं असूनही जो रूट इंडियन प्रीमिअर लीगपासून दूर राहिला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात सातत्याने रन्स करून, विकेट्स मिळवून, नेतृत्व करूनही आयपीएल न खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये रूटचा समावेश होतो. इंग्लंड संघाचं अतिव्यग्र वेळापत्रक लक्षात घेऊन इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला आयपीएल न खेळण्याची सूचना केली होती. काहीवेळेला त्यानेहूनच लिलावातून नाव मागे घेतलं. ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश स्पर्धेत खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही.
 
वादविवादांपासून दूर
हसताखेळता ऊर्जामय गमत्या स्वभाव ही रूटची ओळख आहे. मैदानावर त्याचा वावर जाणवतो. कर्णधार आणि संघातला मुख्य बॅट्समन असूनही रूटने शिताफीने वादविवाद टाळले आहेत. मात्र काहीवेळेला प्रतिस्पर्धी खेळाडूंनी रूटला लक्ष्य केलं आहे.
 
2013 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये असताना बर्मिंगहॅममधल्या एका बारमध्ये डेव्हिड वॉर्नरने जो रूटच्या श्रीमुखात भडकावली. रूट आणि इंग्लंड संघातील खेळाडू त्या बारमध्ये उपस्थित होते. त्यांची आपापसात मस्करी, विनोद, कोट्या सुरू होतं. वॉर्नरने गैरसमजतीतून रूटला मारलं. रूटने हे प्रकरण वाढवलं नाही. वॉर्नरने या वर्तणुकीसाठी माफी मागितली.
 
वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू शॅनन गॅब्रिएलने जो रूटला उद्देशून आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली होती. रूटने त्याला उत्तर दिलं. या उद्गारासाठी गॅब्रिएलवर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.