सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 3 जून 2024 (20:06 IST)

केदार जाधव निवृत्त : पुण्याचा क्रिकेटर असा झाला टीम इंडियाचा 'मॅचविनिंग' खेळाडू

kedar jadhav
टीम इंडियात एकेकाळी महाराष्ट्राचा झेंडा फडकवत ठेवणारा क्रिकेटर केदार जाधवनं आता निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधनं निवृत्ती स्वीकारत असल्याचं केदारनं सोशल मीडियावर जाहीर केलं.
 
केदारनं आपल्या निवृत्तीची घोषणा करताना लिहिलं, “माझ्या कारकीर्दीत तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. आज दुपारी तीन वाजल्यानंतर मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झालो आहे, असं समजा.”
 
आपली निवृत्ती जाहीर करण्याची केदारची ही पद्धत टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारी आहे. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा करताना असाच एक संदेश प्रसारीत केला होता.
 
केदारनं धोनीच्या पद्धतीनं निवृत्ती जाहीर केली, याचं क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य वाटणार नाही. कारण केदारच्या कारकीर्दीत धोनीची महत्त्वाची भूमिका आहे.
 
महाराष्ट्राच्या संघासाठी खेळून मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केदारला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. पण रणजी ट्रॉफीतली फलंदाजी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील अष्टपैलू कामगिरी यासाठी तो चाहत्यांच्या लक्षात राहिला.
 
संघर्षमय कारकीर्द
उत्क्रांतीच्या संदर्भात एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे. "It is not the strongest of the species that survives, not the most intelligent that survives. It is the one that is most adaptable to change."
 
सर्वांत शक्तिशाली किंवा सर्वांत बुद्धिमान प्रजाती टिकेल याची शाश्वती नाही पण कालानुरूप बदल घडवणारी प्रजाती मात्र नक्की टिकू शकते असा या विधानाचा अर्थ आहे.
 
केदार जाधवच्या एकूण कारकीर्दीकडे पाहिलं तर आपल्याला देखील हे दिसू शकतं.
 
आपल्या दर्जेदार आणि तंत्रशुद्ध खेळाच्या जोरावर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ठसा उमटवला. भारतीय क्रिकेट संघासारख्या जगातील तगड्या संघांपैकी एक असलेल्या संघात केदारनं स्थान मिळवलं, ते टिकवलं आणि तिथे तो बहरला देखील.
 
2014-15नंतर महेंद्र सिंग धोनीला साथ देऊ शकेल, अशा खालच्या फळीतल्या म्हणजे अगदी शेवटी येऊन खेळू शकेल अशा खेळाडूची, ‘फिनिशर’ची भारताला गरज होती.
 
हे हेरून केदार जाधवनं आपला खेळ बदलण्यास सुरुवात केली. वन डे आणि ट्वेन्टी20मध्ये आपण संघात कुठे बसू शकतो, याचा तो विचार करू लागला.
 
तंत्रशुद्ध खेळ आणि कौशल्याचा वापर करून त्याने त्याच्या खेळाची व्यापकता वाढवण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी जे फटके त्याने मारले नव्हते, ज्या झोनमध्ये रन्स काढल्या नव्हते तिथून देखील कशा रन्स कमवायच्या याचा विचार त्याने केला.
 
2014च्या आयपीएलच्या रूपाने त्याला त्याने आत्मसात केलेलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. या आयपीएल सीझनमध्ये त्याचा नवा अवतार पाहायला मिळाला.
 
मग 2014-15मध्ये केदार जाधव भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात आला. इंग्लंडविरोधात 2017मध्ये केलेल्या शतकानं त्यानं आपण काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं.
 
पण भारतीय संघात टिकून राहण्यासाठी हे पुरेसं नव्हतं. आपण याहून अधिक काही आहोत हे सिद्ध करणं आवश्यक होतं. त्यामुळे त्यानं आपल्या बॉलिंगवर कष्ट घेण्यास सुरुवात केली. गोलंदाजीतही तो सातत्यपूर्ण कामगिरी करू लागला.
 
मर्यादित षटकांच्या खेळातील लवचिकतेमुळे तो जर आयपीएल संघाचा आवडता खेळाडू नसता झाला तर नवलच होतं. आपल्या खेळात प्रयोगशीलता, नाविन्य आणि सातत्य या गोष्टीच्या आधारे केदार जाधव भारतीय टीमचा एक मॅचविनिंग खेळाडू बनला.
 
जानेवारी 2020 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यानंतर मात्र त्याला पुन्हा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कोव्हिडमुळे क्रिकेट काही काळ बंद झालं, त्याच दरम्यान पस्तिशीजवळ पोहोचलेल्या केदारला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवता आलं नाही.
 
पण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, रणजी ट्रॉफीमध्ये तो खेळत राहिला आणि महाराष्ट्रासाठी त्यानं धावा जमा केल्या.
 
अलीकडेच केदारनं क्रिकेट समालोचन करण्यास सुरुवात केली आहे, तेही मराठीत. क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती घेतली, तरी क्रिकेटशी जोडलेलं नातं असंच जपून ठेवायचा प्रयत्न तो नक्कीच करेल.
 
Published By- Priya Dixit