शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

वय 98 पण अजूनही विद्यार्थी

आपला विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. बिहारमध्ये 98 वर्षे वयाच्या पण मनाने तरुण असणार्‍या राज कुमार वैश्य यांनी आता अर्थशास्त्रातील एम.ए. ही पदवी मिळवली आहे. त्यांनी त्यासाठी नालंदा मुक्त विद्यापीठात परीक्षार्थी म्हणून नाव नोंदवले होते. त्यांचा हा शिक्षणातला उत्साह बघून त्यांच्या मानाने तरुण असलेल्या 70 आणि 80 वर्षांच्या वृद्धांनीही आश्चर्यांने तोंडात बोट घातली आहेत.
 
वैश्य हे 1980 साली एका मोठ्या कंपनीचे सरव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले तेव्हापासून त्यांनी आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेचा विचार करायला सुरूवात केली होती. भारतातली गरिबी हटवायची असेल तर काय करावे लागेल यावर त्यांचे चिंतन सुरु झाले होते. त्यांना हा विचार करताना काही गोष्टींचा खुलासा होत नव्हता. तेव्हा आपण अर्थशास्त्रातली उच्च पदवी घेतली पाहिजे या निष्कर्षाप्रत ते आले. ते उत्तरप्रदेशातल्या बरेलीचे राहणारे आहेत आणि त्यांनी आपल्या तरुण वयात उत्तरप्रदेशातून बी.ए. ही पदवी मिळवली होती. त्यांचा विषय अर्थशास्त्र हाच होता. आता आपण याच विषयातली पदव्युत्तर पदवी मिळवायची असे त्यांनी ठरवले.
 
2015 साली त्यांनी नालंदा विद्यापीठात आपले नाव नोंदले आणि दोन वर्षात एम.ए. ही पदवी प्राप्त केली. 98 व्या वर्षी अशी पदवी मिळवणारे ते जगातले पहिलेच विद्यार्थी असावेत असे वाटते. यापूर्वी याच विद्यापीठातून 78 वर्षांच्या तरुणाने पदवी मिळवली होती.
 
98 वर्षांचे राजकुमार वैश्य हे नेहमी हसतमुख असतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांना दोन मुले असून तीही आता सत्तरीपार गेली आहेत. एक मुलगा सेवेतून निवृत्त होऊन घरी बसला आहे. त्याची पत्नी म्हणजे राजकुमार वैश्य यांची सूनही 60 वर्षांची असून तीही मोठ्या सरकारी नोकरीनंतर निवृत्त होऊन घरात बसली आहे.