शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Modified: रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (17:48 IST)

विक्रम गोखले- कंगना म्हणाली ते खरंय, 1947 मध्ये स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालं

अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं आहे.
75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राह्मण महासंघाच्यावतीने विक्रम गोखले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
 
"भारताला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य भीक असून खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं," असं कंगना राणावतने म्हटलं होतं.
कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन करताना विक्रम गोखलेंनी म्हटलं, "कंगना राणावत जे म्हणाली आहे ते खरं आहे. ते स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलं गेलेलं आहे बरं का. ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना फाशी देताना मोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही. आपले लोक ब्रिटिशांविरोधात उभे आहेत हे पाहूनसुद्धा वाचवलं नाही."
 
'देश कधीही हिरवा होणार नाही'
यासोबतच विक्रम गोखले यांनी आणखी एक खळबळजनक वक्तव्य केलं.
 
ते म्हणाले, "हा देश कधही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे."
 
ते पुढे म्हणाले, "जे 70 वर्षांत झालं नाही ते मोदींनी केलं. पक्षाचं काम सर्वच करतात पण ते देशासाठी काम करतात."
 
"आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. केवळ लाल बहादूर शास्त्री सोडून. त्यांची जयंती 2 ऑक्टोबरला येते. ती हेतूपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो,"
माझ्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर या देशाला कळाले नाहीत. आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.
 
"ब्राह्मण समाजावर टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्राह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे, हे काय चाललं आहे? कुणबी,क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणं मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरू होतो हे छापलं जाणं दुर्देव आहे. त्यापूर्वी कोणी नव्हतं का?"
 
"या देशासाठी झटणारा माझा मुसलमान आहे, त्यात मी कधी भेदाभेद करत नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
'भाजप-शिवसेनेने एकत्र यावं'
भाजप आणि शिवसेनेने एकत्र यावं अशी इच्छा विक्रम गोखले यांनी व्यक्त केली. युतीची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.
 
यासंदर्भात मी स्वत: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन असंही त्यांनी म्हटलं.
 
कंगना राणावतनं नेमकं काय म्हटलं होतं?
खरं स्वातंत्र्य 1947मध्ये नाही, तर 2014 मध्ये मिळालं, असं मत अभिनेत्री कंगना राणावतनं एका मुलाखतीवेळी व्यक्त केलं होतं.
 
नोव्हेंबरला टाइम्स नाऊ या खासगी वृत्त वाहिनीनं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं नाव 'सेलिब्रेटिंग इंडिया @75' असं होतं. त्या कार्यक्रमात कंगनालाही आमंत्रित करण्यात आलं होतं.
 
'बॉलिवूडचा जागतिक (ग्लोबल) परिणाम' या मुद्द्यावर चर्चेसाठी कंगनाला बोलावण्यात आलं होतं.
 
कंगना राणावत खरंच भाजपच्या इशाऱ्यावर बोलत आहे का?
 
कंगना-उर्मिला वाद : 'भाजपला खूष करण्याच्या नादात माझ्यावर 25-30 केसेस आल्या'
 
त्यावेळी वीर सावरकरांबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं कंगनानं फार मोठं उत्तर दिलं. त्या उत्तरात स्वातंत्र्य लढ्यापासून ते अनेक स्वातंत्र्यवीरांचाही उल्लेख होता.
हा संपूर्ण प्रश्न आणि त्याचं उत्तर टाईम्स नाऊ हिंदीच्या ट्विटर हँडलवर उपब्ध आहे. जवळपास साडे सात मिनिटांचं ते आहे.
कंगनाच्या वक्तव्यापैकी 24 सेकंदाची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड शेअर केली जात आहे. त्यात तिनं '1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य' ही आपल्याला मिळालेली 'भीक' असल्याचं वक्तव्य केलं आहे.
 
"1947 ला जे मिळालं, ते स्वातंत्र्य नव्हतं तर भीक होती आणि जे स्वातंत्र्य मिळालं आहे, ते 2014 मध्ये मिळालं आहे," असं टाइम्स नाऊच्या संपादक नाविका कुमार यांना दिलेल्या एका मुलाखतीत कंगनानं म्हटलं होतं.
 
कंगनाचं स्पष्टीकरण
या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर कंगनानं स्पष्टीकरण दिलं होत.
 
इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या फोटोत तिनं म्हटलंय, "या मुलाखतीत स्पष्टपणे सांगण्यात आले की स्वातंत्र्यासाठी पहिले संघटित युद्ध हे 1857 मध्ये लढले गेले. मला 1857 ची माहिती आहे पण 1947 मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहित नाही. जर कोणी या प्रकरणावर मला माहिती दिली तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन, कृपया मला मदत करा."
 
कंगनानं पुढे लिहिलंय, "मी शहीद राणी लक्ष्मीबाई सारख्या चित्रपटात काम केलं आहे. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यावर बरंच संशोधन झालं आहे. राष्ट्रवादासोबत दक्षिणपंथाचा उदय झाला पण ते अचानक नष्ट कसं झालं? आणि गांधींनी भगत सिंग यांना का मरू दिलं?
 
"नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या का झाली आणि त्यांना गांधीजींचा पाठिंबा कधीच मिळाला नाही. इंग्रजांनी विभाजन का केले? भारतीय स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याऐवजी एकमेकांना मारत होते. मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ज्यासाठी मला मदत हवी आहे.
 
"त्या संपूर्ण मुलाखतीत मी कोणत्या शहीदाचा किंवा स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान केला आहे, हे जरी दाखवलं तरी मी माझा पद्मश्री परत करेन. मुलाखतीतल्या छोट्या छोट्या क्लिप व्हायरल करण्यात काही अर्थ नाही. संपूर्ण वाक्य दाखवा आणि पुढे येऊ सगळं सत्य सांगा. मी सगळे परिणाम भोगण्यासाठी तयार आहे."