गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीमध्ये स्ट्रोकची लक्षणं दिसल्यास काय करावे?

Brain Stroke
अभिनेते आणि नेते मिथुन चक्रवर्ती यांना 10 फेब्रुवारीला रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.
एमआरआयसह आवश्यक असलेल्या काही चाचण्या केल्यानंतर त्यांना सेरेब्रल इस्केमिक अॅक्सिडेंट (स्ट्रोक) झाल्याचं समजलं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते पूर्णपणे शुद्धीत आहेत.
 
शनिवारी (17 फेब्रुवारी) रात्री गुजरातचे कृषीमंत्री राघवजी पटेल यांना बोलायला त्रास होऊ लागला तसंच त्यांच्या पाठीत वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं त्याठिकाणी सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचं लक्षात आलं. पण सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजलं.
 
पण ब्रेन स्ट्रोक म्हणजे नेमकं काय आहे? त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यावर उपचार कसे केले जातात?
 
भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, स्ट्रोक हे जगभरातील मृत्यूचं दुसरं मोठं कारण आहे. तसंच 2013 मध्ये यामुळं अंदाजे 65 लाख मृत्यू झाले आहेत.
 
आयसीएमआरनं नुकताच एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यानुसार 2016 मध्ये स्ट्रोक हे भारतातील मृत्यूच्या कारणांमधील चौथं महत्त्वाचं कारण होतं.
 
ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय?
यूएस सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, जेव्हा एखाद्या कारणामुळं मेंदूमध्ये रक्ताचा पुरवठा थांबतो किंवा अचानक मेंदूत रक्तस्राव होऊ लागतो तेव्हा त्याला 'ब्रेन स्ट्रोक' म्हटलं जातं.
ब्रेन स्ट्रोकच्या संदर्भात जर वेळेवर रुग्णालयात पोहोचून उपचार घेतले किंवा डॉक्टरांशी संपर्क साधला तर नुकसान टाळता येऊ शकतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
 
पण ब्रेन स्ट्रोक झाल्यास मेंदूला इजा होऊ शकते किंवा ब्रेन डेडची स्थिती निर्माण होऊ शकते. स्ट्रोकमुळं मेंदूला तात्पुरती इजा, दीर्घकालीन अपंगत्व, पक्षाघात किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो.
 
भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार स्ट्रोक प्रामुख्यानं दोन प्रकारचे असतात.
 
1. इस्केमिक स्ट्रोक:
 
मेंदूमध्ये होणारा रक्तप्रवाह खंडीत झाल्यानं होणाऱ्या स्ट्रोकला 'इस्केमिक स्ट्रोक' म्हटलं जातं. रक्त मेंदूपर्यंत पोहोचलं नाही तर मेंदूला रक्ताद्वारे ऑक्सिजन आणि पोषक तत्वं मिळत नाहीत.
 
ऑक्सिजन आणि पोषक तत्वांच्या अभावामुळं मेंदूच्या पेशींचा काही मिनिटांत मृत्यू होऊ लागतो. प्लाक म्हणून ओळखला जाणारा फॅटसारखा पदार्थ रक्त वाहिन्यांमध्ये साचल्यामुळंही रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो.
 
2. हॅमरेजिक स्ट्रोक:
 
मेंदूतील एका रक्तवाहिनीतून रक्तस्त्राव होऊ लागतो, तेव्हा हॅमरेजिक स्ट्रोक होत असतो. स्त्राव झालेलं रक्त मेंदूच्या पेशींवर खूप जास्त दबाव निर्माण करतं आणि त्यामुळं त्यांचं नुकसान होतं.
 
शरीरात उच्च रक्तदाब, रक्त वाहिन्या प्रसरण पावतात तेव्हा म्हणजे फुग्यासारख्या फुगतात तेव्हा त्या फुटण्याची शक्यता असते, तेव्हा हॅमरेजिक स्ट्रोकची समस्या उद्भवते.
 
तज्ज्ञांच्या मते, 90 टक्के स्ट्रोक हे रक्त वाहिन्या ब्लॉक झाल्यामुळं (इस्केमिक) होतात तर उर्वरित 10 टक्के अंतर्गत रक्तस्त्रावामुळं होतात.
 
गुजरातमधील न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह आणि डॉ. हेली शाह यांनी त्यांच्या पुस्तकात याबाबत माहिती दिली आहे.
 
"80 ते 85 टक्के प्रकरणांमध्ये पक्षाघात किंवा अर्धांगवायू रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिनीतील अडथळ्यांमुळं होत असतो. 15 टक्के प्रकरणांमध्ये याचं कारण रक्त वाहिनी फुटल्यामुळं होणारा रक्तस्त्राव असतं. यापैकी 25 टक्के प्रकरणांमध्ये,मेंदूमधील लहान रक्त वाहिन्यांमध्ये समस्या असते. त्याला स्मॉल वेसल डिसिज म्हटलं जातं."
 
स्ट्रोक होतो तेव्हा मेंदूमध्ये काय होते?
यूएस नॅशनल हार्ट, लंग्ज अँड ब्लड इन्स्टिट्यूटनुसार, मेंदू शरीराच्या वेगावर नियंत्रण ठेवत असतो. आपल्या आठवणींचा संग्रह करत असतो तसंच मेंदूच आपले विचार,भावना आणि भाषेचा स्त्रोत असतो.
 
शिवाय मेंदू श्वसन आणि पचन अशा अनेक शारीरिक कार्यांवरही नियंत्रण ठेवत असतो.
 
मेंदूला व्यवस्थित काम करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. रक्तवाहिन्या मेंदूच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन असलेलं रक्त पुरवठा करत असतात.
 
काही कारणामुळं रक्त प्रवाह खंडित झाला तर मेंदूच्या पेशींचा काही मिनिटांमध्ये मृत्यू होऊ लागतो. कारण त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. तेच स्ट्रोकचं मुख्य कारण असतं.
 
स्ट्रोकबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी
1. वैशिष्ट्ये:
 
स्ट्रोकची लक्षणं ही अगदी वेगानं विकसित होत असतात. ते काही तासांत किंवा काही दिवसांतही घडू शकतं.
 
स्ट्रोकचे प्रकार आणि मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम झाला आहे, त्यानुसार विविध परिस्थितीमध्ये विविध प्रकारची लक्षणं असू शकतात.
 
2. स्ट्रोकच्या लक्षणांमध्ये यांचा समावेश असू शकतो :
 
- अचानक संभ्रम वाटणे, शब्द बोलण्यात किंवा समजण्यात अडचण
 
- सुन्नपणा किंवा अशक्तपणा, विशेषतः शरिराच्या एका बाजुला
 
- काही कारण नसताना अचानक प्रचंड डोकेदुखी
 
- एका किंवा दोन्ही डोळ्याच्या दृष्टीमध्ये अचानक फरक पडणे
 
- चालण्यात अडचण येऊ लागले, चक्कर येणे किंवा तोल जाणे
 
स्ट्रोकची प्राथमिक लक्षणं कशी ओळखावी?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार जर स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणं लक्षात आली तर त्यामुळं अपंगत्व किंवा मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो.
 
तुम्हाला स्ट्रोक झाला असेल तर तीन लक्षणांवर प्रामुख्यानं लक्ष ठेवायला हवं -
 
चेहरा एका बाजुला झुकलेला आहे का? किंवा एका हातात अशक्तपणा जाणवत आहे का? बोलणं अस्पष्ट आहे का? वरिलपैकी एखाद्या किंवा सर्व प्रश्नांची उत्तरं हो असतील तर व्यक्तीला स्ट्रोक असू शकतो. त्यावर त्वरित उपचार गरजेचे असतात.
 
एखाद्या व्यक्तीमध्ये स्ट्रोकची लक्षणं दिसल्यास काय करावे?
तज्ज्ञांच्या मते, लवकरात लवकर अॅम्ब्युलन्सला बोलवायला हवे. रुग्णाला स्वतः रुग्णालयात नेऊ नका. त्वरित उपचार सुरू होण्यासाठी अॅम्ब्युलन्स बोलवावी.
 
"मेंदूमध्ये रक्त पुरवठ्यातील अडथळ्यावर लवकर उपचार केले नाही तर दर सेकंदाला मेंदूतील 32,000 पेशी नष्ट होत असतात," असं हेली शाह बीबीसीबरोबर बोलताना म्हणाल्या.
 
"जर पक्षाघाताच्या पहिल्या तीन तासांमध्ये टीपीए नावाचं इंजेक्शन दिलं तर पक्षाघाताचा धोका बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकतो. तसंच त्याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो."
 
"त्याशिवाय रक्त पातळ करण्याची औषधं, मेंदूच्या पेशींचं संरक्षण करण्याची औषधं, गरजेनुसार शस्त्रक्रिया आणि योग्य व्यायाम यामुळंही स्ट्रोकचं गांभीर्य कमी होऊ शकतं."
 
हे इंजेक्शन मेंदूच्या हानी झालेल्या भागात रक्तप्रवाह पुन्हा सुरू करण्यात मदत करतं.
 
कोणत्या चाचण्या केल्या जातात?
रुग्णाला स्ट्रोक झालेला असेल तर डॉक्टर लगेचच सीटी स्कॅन किंवा एमआरआय करण्यास सांगतील.
 
स्ट्रोकची मुख्य कारणे कोणती?
स्ट्रोकचं प्रमाण कमी करण्यासंबंधीच्या आरोग्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशांनुसार रुग्णाला अशा परिस्थितीची माहिती हवी आणि त्यावर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पावलं उचलायला हवी.
 
- उच्च रक्तदाब
 
- मधुमेह
 
- लठ्ठपणा
 
- कमी शारीरिक हालचाल
 
- तंबाखू
 
- हृदयरोग
 
- अधिक मद्यसेवन
 
- आरोग्यासाठी घातक भोजन आणि पोषण
 
- रक्तातील फॅटचं अधिक प्रमाण
 
स्ट्रोकपासून संरक्षण कसं करावं?
स्ट्रोकचे बहुतांश प्रकार हे निरोगी जीवनशैली आणि उपचार सुरू असलेल्या आजारांवर नियंत्रण ठेवून रोखता येऊ शकतात. ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार आणि जीवनशैलीत बदल करायला हवे. बहुतांश वेळा आरोग्य तज्ज्ञ रुग्णांना खालील सल्ला देतात.
 
अॅस्परिन : अॅस्पिरिन रक्ताच्या गाठी बनणं कमी करून स्ट्रोकचा धोका कमी करण्यात मदत करू शकतं. पण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अॅस्परिन घ्यावं.
 
रक्तदाब : निरोगी जीवनशैलीत बदल करून तुम्ही रक्तदाबावर नियंत्रण ठेवू शकता.
 
कोलेस्टेरॉल : कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवल्यास आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेतल्यास स्ट्रोकचा धोका कमी होईल.
 
धूम्रपान : धूम्रपान आणि इतर प्रकारच्या तंबाखूचं सेवन कमी करणं आरोग्यासाठी चांगलं ठरू शकतं.
 
जीवनशैलीत बदल करावा
 
निरोगी आहार : रक्तदाब कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी निरोगी आहार घ्यावा.
 
कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी फायबरचं भरपूर प्रमाण असलेले पदार्थ आणि डाळींब खावं.
 
नियमित शारीरिक हालचाली करा : नियमितपणे शारीरिक हालचाली केल्यास तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. तसंच त्यामुळं हृदय आणि रक्त वाहिन्या निरोगी राहतात.
 
आरोग्य मंत्रालयानुसार लोक जीवनशैलीत बदल करून या आजारापासून दूर राहू शकतात.
 
Published By- Priya Dixit