झाडे सत्तेवर आली की
माणसे
निरपराध झाडांवर प्राणांतिक हल्ले करतात
त्यांचे हातपाय तोडून त्यांना
बेमुर्वतखोरपणे
उघड्यावर रचून ठेवतात…
माणसांच्या राज्यात हे असेच चालायचे.
उद्या झाडे सत्तेवर आली की तीही
तोडलेल्या माणसांची हाडे
अशीच उघड्यावर रचून ठेवतील;
वृक्षकुळातील कुणी मेला तर
माणसांचा सर्पण म्हणून उपयोगही करतील;
फिरून माणसांचे राज्य येण्यापूर्वी
खुनांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्याची कला
झाडेही आत्मसात करतील…
फक्त एकदा
त्यांचे राज्य आले पाहिजे
द. भा. धामणस्कर