शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक करा, अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवर राजकारण तापले आहे. आता त्यांच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणात समोर येऊन बोलायला सुरूवात केली आहे. जोपर्यंत मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक करत नाही, तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आता कुटूंबीयांनी घेतली आहे. मनसुख हिरेनच्या कुटूंबीयांनी पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना ही माहिती दिली आहे. अॅटॉप्सी अहवाल, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि शवविच्छेदनाचे छायाचित्रिकरण आम्हाला द्या अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असे स्पष्ट केले आहे. दरम्यान मनसुख हिरेन प्रकरणातील प्राथमिक पोस्टमार्टन रिपोर्ट ठाणे पोलिसांना प्राप्त झाला आहे. पण यामध्ये मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. त्यामुळेच मनसुख हिरेन यांचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे.
मनसुख हिरेन यांच्या मृतदेह जेव्हा ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथे आढळला होता, तेव्हा त्यांच्या शरीरावर कोणत्याही खुणा नसल्याचे स्पष्टीकरण ठाणे पोलिसांनी दिले होते. तसेच मृत्यूच्या वेळी त्यांचे हात बांधले नव्हते असाही खुलासा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हिरेन यांच्या तोंडात कोंबलेल्या रूमालामुळेही या प्रकरणात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. तर हिरेन यांच्या शवविच्छेदनाच्या वेळीही मुंबई पोलिसांमधील अधिकारी सचिन वाझे हजर होते असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला होता.