शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (13:26 IST)

मुंबई महापालिकेचे लाखो लसीचे डोस आयात करण्यासाठी प्रयत्न सुरु

मुंबईत काही दिवसांपासून संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेला यश मिळत आहे. मात्र देशात आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे  संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता लाखो लसीचे डोस आयात करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याबाबत मुंबईचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी  एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, जागतिक उत्पादकांकडून निविदा मागविण्यासाठी परवानगी घेण्यासाठी महापालिका राज्य सरकारशी चर्चा करीत आहे.
 
यावर बोलताना चहल म्हणाले की. लसीचा डोस संदर्भात राज्य सरकारची निविदा ४० लाख पेक्षा अधिक असू शकते त्यामुळे ही संख्या कोणत्याही एका परदेशी पुरवठादाराला देणे शक्य होणार नाही, त्यामुळे आम्ही दोन ते तीन परदेशी कंपन्यांकडून ५ लाख लसीचे डोस घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत यावर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल असेही चहल म्हणाले.
 
तसेच मुंबईत केंद्राने मंजुर केलेल्या कोणत्याही लसीला परवानगी दिली जाणार आहे. मग ती रशियाचे स्पुतनिक असो, मॉडर्ना इंक आणि जॉन्सन अँड जॉन्सनची असो किंवा फाइजरची लस असो. दरम्यान या लसींना सुरक्षित आणि योग्य वातावरणात ठेवण्यासाठी मुंबई या कंपन्यांना जादा पैसे देण्यास तयार आहे.