मुंबई कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत मंदिरात पूजाअर्चा, प्रार्थना, आरती होणार
ब्रेक द चेन अंतर्गत मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सुधारित मार्गदर्शक तत्वे असलेले परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, आता शाळांपाठोपाठ मंदिरातही “घंटानाद” होणार आहे. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करूम मंदिरात पूजाअर्चा, प्रार्थना, आरती होणार आहे तर मस्जिदमध्ये अजान, नमाज पाठण, चर्चमध्ये प्रार्थना सुरू होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून कोरोनाविषय नियम पाळून भक्सांसाठी मंदिरे खुली होणार आहे.
मात्र धार्मिक स्थळांमध्ये अधिक गर्दी झाल्यास कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता पाहता धार्मिक स्थळांच्या क्षमतेच्या ५०% नागरिकांनाच उपस्थिती दर्शविण्यास परवानगी असणार आहे. म्हणजेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये उपस्थितांची संख्या त्या धार्मिक स्थळांच्या एकूण क्षमतेच्या ५० पर्यंत मर्यादित असावी तसेच, कोरोनाबाबतच्या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
मंदिरात मूर्ती दर्शन लांबून करावे लागणार आहे. देवतेच्या मूर्तीला हस्तस्पर्श करण्यास मनाई असणार आहे. मंदिरात, अन्य धार्मिक स्थळी नागरिकांनी सहा फुटांचे अंतर राखणे बंधनकारक असणार आहे. तसेच, कोणत्याही परिस्थितीत धार्मिक स्थळाच्या ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. गर्दीत तिर्थप्रासाद वाटप करता येणार नाही. कोरोनासंदर्भातील नियमानुसार, धार्मिक स्थळी प्रत्येकाने सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे व हात स्वच्छ ठेवणे बंधनकारक असणार आहे. गरोदर महिला, १० वर्षांखालील लहान मुले यांनी धार्मिक स्थळीं शक्यतो जाऊ नये, असे आवाहनही सदर परिपत्रकात करण्यात आले आहे. जर नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
मात्र नियम न पाळणाऱ्या व्यक्तीविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता १८६० मधील १८८ कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. हे आदेश ७ ऑक्टोबर २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य़ातील धार्मिक स्थळे भक्तांसाछी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्य़ाचे म्हटले आहे.