पाचवी-सहावी रेल्वे मार्गिका महिन्याभरात पूर्ण क्षमतेने सुरू होणार; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कामाची पाहणी!
उद्यापासून मर्यादित वेगाने होणार सुरू .गेल्या अनेक वर्षांपासून चर्चिले जात असलेल्या पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गिकेवरून पूर्ण क्षमतेने लोकलसेवा सुरू होईल, अशी माहिती कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. उद्यापासून मर्यादित वेगाने यावरून लोकल सुरू होतील. या आजच्या कामानंतर आणखी तीन वेळा रेल्वे मेगाब्लॉक घेईल, यात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा वापर सुरू होईल, असेही डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रविवारी सांगितले.
कल्याण-ठाणे दरम्यान पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. गेल्या काही वर्षात या दोन मार्गिकांसाठी सातत्याने पाठपुरावा करत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कामाला गती दिली. काम मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही या कामाला गती दिली. रविवारी या मार्गिकांच्या तपासणीचे आणि महत्त्वाचे अभियांत्रिकी कार्य सुरू होते. त्यासाठी रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला. यादरम्यान कामाच्या प्रत्यक्ष ठिकाणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली.
यावेळी मध्य रेल्वेचे मुंबई व्यवस्थापक शलभ गोयल, एमआरव्हीसीचे विकास वाडेकर उपस्थित होते. त्यांनी कामाची पाहणी केली. या प्रसंगी माध्यमांशी बोलत असताना पाचवी सहावी मार्गिका येत्या महिनाभरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण क्षमतेने वापरात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. दिवा आणि ठाणे दरम्यान असलेल्या या साडे ९ किलोमीटरच्या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गाला २००७-०८ या वर्षात प्रथमच मंजुरी देण्यात आली होती. मात्र याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात २०१५-१६ मध्ये झाली. यापूर्वी तीन वेळा मेगाब्लॉक मध्ये या प्रकल्पाची महत्वाची कामे पूर्ण करण्यात यश आले होते. आजही ट्रॅक लेन ,ट्रॅक अलायनमेंट आणि पुलाची क्षमता तपासण्याचे काम सुरू असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.