बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 12 मार्च 2022 (22:32 IST)

विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसची महत्त्वाची बैठक, सोनिया-राहुल गांधींच्या भूमिकेकडे लक्ष

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
 
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पराभवावर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रविवारी दुपारच्या 4 वाजता काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावली आहे.
 
या बैठकीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेस मधील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.
 
पाच राज्यात काँग्रेसला कुठे फटका बसला?
उत्तरप्रदेशमध्ये 403 जागांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येणार आहे.
 
तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र केंद्राच्या राजकारणात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसच्या फक्त 2 जागा आल्या. अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणीही काँग्रेसचा पराभव झाला आहे.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकूण 7 जागा मिळाल्या होत्या आणि पक्षाची मतांची टक्केवारी 6.25 टक्के इतकी होती. यावेळी मात्र निवडणुकीत त्यांची मतांची टक्केवारी घसरून 2.34 टक्क्यांवर आलीय.
 
विशेष म्हणजे पंजाबसारखं मोठं राज्य काँग्रेसच्या हातून निसटलं आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला 117 पैकी 92, तर काँग्रेसला 18 जागांवर विजय मिळाला आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसनं 77 जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली होती.
 
याशिवाय गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या तिन्ही राज्यांत भाजपनं काँग्रेसला धूळ चारली आहे.
 
राहुल-प्रियंका यांनी स्वीकारला पराभव
निवडणुकीचा निकाल आल्यानंतर प्रियंका गांधींनी ट्वीट करुन मान्य केलंय की पक्षाला आपल्या मेहनतीचं मतांमध्ये रूपांतर करण्यात यश आलं नाही.
 
त्या म्हणतात की, "लोकांचं मत लोकशाहीत सर्वस्वी आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी खूप कष्ट घेतले. पक्ष संघटन मजबूत केलं. जनतेच्या प्रश्नांवर लढा दिला. पण, आमच्या मेहनतीचे रूपांतर मतांमध्ये करण्यात आम्हाला यश आलं नाही."
 
दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केलं की, "मी नम्रतेने निकाल स्वीकारतो. ज्यांना जनादेश मिळाला त्यांचे अभिनंदन करतो. मी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या मेहनतीबद्दल आभार मानतो. यातून आम्ही धडा घेऊ. लोकांच्या हितासाठी कायम काम करत राहू."
पाच राज्यांतील या पराभवानंतर गांधी परिवारावरच्या कामगिरीविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता उद्याच्या बैठकीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
राजीनाम्याची चर्चा
उद्याच्या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे तिघेही आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू होती.
मात्र या बातमीत कोणतेही तथ्य नसल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून दिली आहे.