रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (18:28 IST)

अयोध्या विवाद : सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या सर्व पुनर्विचार याचिका

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं अयोध्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सर्व पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. या प्रकरणी एकूण 18 पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
 
बंद चेंबरमध्ये पाच न्यायायाधीशांच्या घटनापीठासमोर सर्व याचिकांवर सुनावणी झाली.
 
सर्वोच्च न्यायालयातील घडामोडी कव्हर करणारे ज्येष्ठ पत्रकार सुचित्र मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी 9 याचिका पक्षकारांच्या वतीने करण्यात आल्या होत्या, तर अन्य 9 याचिका इतर याचिकाकर्त्यांनी केल्या होत्या.
 
या याचिकांच्या मेरिटवरही विचार करण्यात आला. यापूर्वी निर्मोही आखाड्यानंही पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.
 
निर्मोही आखाड्यानं आपल्या याचिकेत म्हटलं होतं, की अयोध्या विवादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला एक महिना झाला, मात्र अजूनही राम मंदिर ट्रस्टमधील त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. मात्र त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे.